प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 93 of 235

त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाणे येथे झाले. नंतर ते मुंबईस भायखळा येथे राहिले. रेल्वे, पोस्ट खात्यात भांडारपाल म्हणून नोकऱ्या केल्या. सत्यशोधक समाजाच्या प्रारंभीच्या काळात लोखंडे यांनी बहुजन समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, शिक्षण प्रसार यांविषयी लिखाण केले. सत्यशोधक निबंधमाला, पंचदर्शन या पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या.
''1880 ते 1897 या काळात दीनबंधूचे संपादक असताना शेतकरी विशेषत: कामगारांची बाजू मांडली. 1884 मध्ये मुंबई सरकारने जे फॅक्टरी कमिशन नेमले होते त्या कमिशनने कामगारांची कैफियत ऐकावी, अशी मागणी त्यांनी केली! 'बॉम्बे मिल हॅडस असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करून तिच्या वतीने कामगारांच्या सभा घेऊन काही मागण्या मान्य करवून घेतल्या.''87
लोखंडे यांनी आपल्या लिखाणात सत्यशोधकी विचार आग्रहपूर्वक मांडले.
''स्त्री शिक्षणाबाबत पैसा नसेल तर पुरुष शिक्षणात येणाऱ्या खर्चात कपात करून त्याचा विनियोग स्त्री शिक्षणाकडे करावा, अशी सूचना त्यांनी केली.''88
''नायकिणीची गाणी मंगल कार्यालयात होऊ नयेत असे त्यांनी म्हटले. पुत्रप्राप्तीसाठी सत्यनारायण, पगारबढती, पीकवृध्दी, हरवलेला दागिना परत मिळवणे, पत्नीचा आजार वगैरे बाबतीत नवस बोलण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी हल्ला केला.''89
''आपल्यातील सधन समजदार लोकांनी शेतकरी व कारागीर लोकांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी आपल्या धनाचा उपयोग करावा, असा आग्रह लोखंडे धरतात.''90
''ज्या जाती पशुतुल्य आहेत त्यांना माणूसपणा का आणू नये व देशाचा फायदा का करून घेऊ नये, असा प्रश्न उपस्थित करून मागासलेल्या जातीस शिक्षण मिळाले म्हणजे देशहिताच्या कामास मोठी बळकटी येणार हे लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले.''91
याशिवाय डॉ. लोखंडे यांनी सत्यशोधक चळवळीच्या ध्येय उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी अनेक कार्य पार पाडल्याचे दिसून येते.
''शूद्रातिशूद्राला शिक्षणासाठी मराठा ऐकेच्छु सभा, कष्टकऱ्यांच्या आरोग्यासाठी मराठा प्रोव्हिडंट हॉस्पिटल या संस्था त्यांनी उभारल्या. केशवपन बंद व्हावे म्हणून लोखंडे यांनी मुंबईत न्हाव्यांचा संप घडवून आणला. 1893 च्या मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगलीच्या वेळी दंगलग्रस्तांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. 1896-97 च्या मुंबईतील प्लेगच्या साथीत रोग्याची ने-आण व देखभाल करण्याचे काम करतानाच लोखंडे यांना 1897 साली मृत्यू आला.''92
3.2.1.3 डॉ. विश्राम रामजी घोले
सत्यशोधक चळवळीतील फुले यांचे एक महत्त्वाचे सहकारी या नात्याने डॉ. घोले यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म खाटीक गवळी जातीत झाला. त्यांचे वडील 14 व्या इन्फन्ट्रीमध्ये सुभेदार होते. वडीलांच्या मृत्यूमुळे त्यांचे पालनपोषण व शिक्षण मामांकडे झाले. विविध नोकऱ्या करून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 1852 ला शासकीय हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन, पुढे आर्मी मेडिकल ऑफिसर, सिव्हील सर्जन, व्हॉईसरॉयचे ऑनररी सर्जन, फिजिशियन म्हणूनही त्यांनी काम केले. शस्त्रक्रियेत ते अत्यंत निष्णात होते. पुणे शहरातील पार्शी, युरोपियन व ब्राह्मणांचा त्यांच्या उपचारावर विश्वास होता. घोले यांना ब्रिटिश सरकारने 'रावसाहेब', 'रावबहादूर' या सन्मानदर्शक पदव्या दिल्या होत्या.
''1875 ला सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ झाला तेव्हा ज्योतिबांनी डॉ. घोले यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले.''93
डॉ. घोले यांच्याकडे सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद देत असताना त्यांची सरकार दरबारी असलेली प्रतिष्ठा व कुल, सर्जन म्हणून त्यांनी जो लौकिक मिळविला तोच विचारात घेतला असावा.
''घोले यांनी अज्ञानी शूद्र लोकांस आपण या जगात कसे वागावे, परमेश्वराने आपणास काय अधिकार दिले आहेत, हे समजावून सांगण्याचे काम अंत:करणपूर्वक केल्याचे दिसून येते.''94
''घोले यांच्या मते स्त्रिया निरक्षर व अडाणी असल्याने त्या कोणत्याही सुधारणेस, बदलाला विरोध करतात. स्त्रियांना आधुनिक शिक्षण दिले की, सर्व आपोआप बदलेल. अंधश्रध्दा, दैववाद, बालविवाह या सर्व प्रश्नांवर शिक्षण हा एकमेव उपाय आहे. सरकारने हस्तक्षेप केल्याने रूढी, परंपरा बदलणार नाही तर त्यासाठी आधुनिक शिक्षण पाश्चात्य संस्कृतीशी परिचय आवश्यक आहे, असे घोले यांनी इंग्रज सरकारला 1884 साली एका टिपणाद्वारे कळविले होते.''95
''सत्यशोधक समाजाच्या शैक्षणिक प्रकल्पास त्यांनी आर्थिक साहाय्य केले. ओतूर येथे ब्राह्मणांच्या मध्यस्थीशिवाय जे विवाह झाले तेव्हा कोर्टात ते अशा विवाहांच्या बाजूने उभे राहिले. घोले यांनी फुले यांच्या 'सार्वजनिक सत्यधर्म' पुस्तकाच्या मराठी आवृत्तीस अभिप्राय

संदर्भ प्रकार: