प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 92 of 235

यांच्यापेक्षा भालेकरांची भूमिका वास्तववादी होती.
''निराश्रित हिंदू हे आपले देशबांधव व धर्मबांधव आहेत, असे समजून त्यांना ब्राह्मणांनी ज्ञान द्यावे, असा आग्रह धरतात.''76
''अज्ञानी व निराश्रित हिंदू शहाणे झाले तर ते भटाभिक्षुकास देव मानणार नाहीत, सावकार व व्यापारी यांच्याकडून फसविले जाणार नाहीत, सरकारच्या दुराचारी नोकरांना घाबरणार नाहीत.''77
भालेकरांचे विचार फुले यांच्या विचारांशी अनुकूल होते. शिक्षणाने परिवर्तन होईल, अशी त्यांना खात्री होती. आपला ब्राह्मणांवर राग का आहे, याची कारणे ते खालीलप्रमाणे देतात.
''1) मानवी हक्क ब्राह्मणांनी अन्य हिंदूस कळू दिले नाहीत.
2) ब्राह्मणांनी इतरांकडून स्वत:ची पूजा करून घेऊन सर्वशक्तीमान परमेश्वराचा अपमान केला.
3) इतर लोकांना ब्राह्मणांनी धर्मग्रंथ वाचू दिले नाहीत.
4) परमेश्वराची आराधना ज्या पवित्र देवालयात होते तेथे सर्व हिंदूंना ब्राह्मणांनी प्रवेश दिला नाही.
5) ब्राह्मणांनी आपले धर्मशास्त्र व कायदे इतर हिंदूंवर लादले.
6) श्राध्दाच्या निमित्ताने त्यांनी मृतात्म्यांचा उपमर्द केला.''78
भालेकरांचा रोष जसा ब्राह्मणांवर आहे तसाच संस्थानिकांवरही आहे. ते म्हणतात,
''संस्थानिक क्षत्रिय हे निराश्रित हिंदूंच्या चळवळींना हातभार न लावता ब्राह्मणांच्या कलेने चालतात. संस्थानिकांच्या खजिन्यातील पैसा हा फक्त त्यांचे नातेवाईक, जातभाई, ब्राह्मण, नायकिणी व तमासगीर यांनाच उपभोगण्यास मिळतो.''79
भालेकरांनी माळी शिक्षण परिषद घेऊन फुले यांच्या कार्याची री ओढली.
''31 ऑक्टोबर 1909 रोजी भालेकरांचे 'माळी शिक्षण परिषदेची आवश्यकता' या विषयावर मुंबईत व्याख्यान झाले. दुसरे व्याख्यान पुणे शहरात झाले. प्रस्तुत परिषद पुणे किंवा मुंबई येथे भरवावी म्हणून लोकांना त्यांनी विनंती केली. नगर येथे जाऊनही हाच प्रश्न लोकांसमोर ठेवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे 2 जानेवारी 1910 ला पुणे येथे पहिली माळी शिक्षण परिषद भरली.''80
भालेकरांनी आपल्या कृतीयुक्त उपक्रमांनी चळवळीवर एक वेगळा प्रभाव पाडलेला दिसतो. ते स्वत: एक वेगळी चूल मांडीत होते; परंतु कार्याचा सार मात्र एकच होता.
''भालेकरांनी मे 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली. याकामी त्यांना विठ्ठलराव वंडेकर, रघुनाथ तारकुंडे, हरी चिपळूणकर, हरिश्चंद्र नवलकर, घोरपडे बंधू यांनी सहकार्य केले. लोकांच्या अडचणी सरकारपुढे मांडल्या. सरकारला कायदे करण्यापूर्वी जनतेची खरी स्थिती व मते याबाबत निवेदन सादर करणे, ब्राह्मणेत्तरांतील वाईट चालीरिती बंद करणे यासाठी या सभेची स्थापना करण्यात आली. शिक्षण हे सक्तीचे मोफत असावे, असा आग्रह या सभेने सतत चार वर्षे धरला. त्यासाठी भालेकरांनी एक लक्ष लोकांच्या सह्यांचा अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला. त्यांनी भांबुडर्यास 10,000 लोकांची सभा घेऊन दोन ठराव पास केले.''81
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे व काँग्रेस ही सर्व जातीच्या लोकांची सभा नाही, मूठभर उच्चवर्णीयांतल्या शिकलेल्या लोकांची ती सभा आहे. तिच्या मागण्याला आमची संमती नाही, ही भूमिका भालेकरांनी घेतली होती. भालेकर हे सत्यशोधक चळवळीतील निर्भीड कार्यकर्ते होते.
''1885 च्या गुढीपाडव्याच्या दिवशी भालेकरांनी सत्यशोधक समाजाच्या झेंडयाची मिरवणूक पुण्यातील प्रमुख रस्त्यावरून काढली. या मिरवणुकीत मुंबईचे रामय्या अय्यावारू, रामचंद्र हेजीब, पुण्यातील डॉ. भांडारकर, न्या. रानडे, सदोबा गावंडे, एल. के. घोरपडे, एच. एल. नवलकर इ. मंडळी सामील झाली होती. मिरवणुकीत फुले, रानडे, अय्यावारू यांची भाषणे झाली.''82
''1885 ला दयानंद सरस्वती पुण्यात आले असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांची मिरवणूक उधळून लावली. स्वामी दयानंदांची मिरवणूक उधळून लावल्यानंतर भालेकरांनी त्यांना भांबुडर्यास नेले व त्यांचा सत्कार करून तेथील धर्मशाळेत त्यांचे भाषण घडवून आणले.''83
कृष्णराव भालेकर व म. फुले यांच्या विचारात साम्य होते.
''भालेकरांनी भिक्षुकशाही व ब्राह्मणी ग्रंथ इत्यादींवर टीका करून शूद्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे.''84
''सावकारशाही, भटशाही व कुलकर्णी वतन यावर हल्ला करून शेतकरी व कारागीर हेच देशाचे आधारस्तंभ आहेत, असे त्यांनी म्हटले.''85
''कष्टकरी, शूद्र व शेतकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ व भटजी, सावकार, कुलकर्णी यांच्याविषयीची चीड त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते.''86
भालेकरांनी कंत्राट घेण्याच्या निमित्ताने वऱ्हाड व मध्यप्रांतात जाऊन सत्यशोधक चळवळ त्या भागात रुजविली.
3.2.1.2 डॉ. नारायण मेधाजी लोखंडे (1848-1897)
आद्य कामगार चळवळीचे जनक डॉ. ना. म. लोखंडे यांचा जन्म ठाणे येथे गरीब माळी कुटुंबात झाला.

संदर्भ प्रकार: