प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 91 of 235

भरणाऱ्या सभेच्या बहुदा शेवटी सांघिक प्रार्थना होई. धार्मिक बाबतीत मध्यस्थ, पुरोहित किंवा गुरुची आवश्यकता नाही. त्यांच्या आधाराविना किंवा मध्यस्थीविना कोणत्याही व्यक्तीला देवाची प्रार्थना आणि धार्मिक विधी करता येतात, अशी सत्यशोधक समाजाची शिकवण होती. त्यांचे मूळ आधारभूत तत्त्व ब्रह्मा किंवा मोक्ष नसून 'सत्य' हे होते. वेद हे ईश्वरनिर्मित ग्रंथ नसून मानवनिर्मितच आहेत, अशी ज्योतिबांची ठाम धारणा होती. त्याचप्रमाणे बायबल किंवा कुराण यासारखे धर्मग्रंथसुध्दा वेदांप्रमाणेच ईश्वरनिर्मित नाहीत असे ज्योतिबा मानत आणि तसे लोकांना समजावून सांगत.''73
सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचारक कसा होता, याविषयी कीर लिहितात,
''सत्यशोधक समाजाला फार मोठया बुध्दिवाद्यांचा पाठिंबा होता असे नाही. त्याचा तत्त्वज्ञानी पुरुष हा साधा प्रामाणिक शेतकरी होता. तो सामान्य शेतकरी असला तरी त्याला आंगीक प्रेरणा आणि बुध्दिप्रामाण्याची देणगी निसर्गत:च लाभली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान हृदय होते. त्याची भाषा जनतेची होती. त्याच्या प्रचाराची स्थळे, सभा बैठका व शेतावरील मळणीचे स्थान. सत्यशोधक प्रचारकांचा पोशाख म्हणजे एक घोंगडी, पागोटे व धोतर आणि हातात एक डफ. आपल्या भाषणात ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा उल्लेख करीत. धर्मविधी व संस्कार यांच्या जाचाखाली शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते व जो काही त्यांच्या गाठी पैसा असतो तो धूर्त ब्राह्मण भिक्षुक कसा लुबाडतो याकडे ते शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे लक्ष वेधीत असत. आपल्या मुलाला त्यांनी शिक्षण दिले पाहिजे, असे ते सांगत. तसे केले म्हणजे त्यांना चांगले काय नि वाईट काय, कायदा, धर्म व देव म्हणजे काय हे समजेल, असा त्यांना उपदेश करीत. सत्यशोधक समाजाचे हे प्रचारक शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांच्या कार्यात आणि प्रचारात पांडित्य व बुध्दिमत्ता यांचे तेज दिसून येत नसे, तथापि त्यांची कार्यशक्ती आणि तळमळ ही फार मोठी होती.''74
3.2.1 तत्त्वाच्या प्रचार व प्रसारार्थ फुले यांच्या सहकाऱ्यांचे कार्य
म. फुले यांच्या काळात त्यांना प्रामाणिक सहकारी लाभल्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार झपाटयाने झाला. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या काही सहकाऱ्यांचे कार्य सत्यशोधक तत्त्वांच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे.
3.2.1.1 कृष्णराव भालेकर (1850-1910)
भालेकरांचा जन्म 1850 साली पुण्यात भांबुर्डे (शिवाजीनगर) येथे झाला. त्यांचे आजोबा राणोजी गावात प्रतिष्ठित मानले जात. राणोजीच्या धाकटया भावाची मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले होय. कृष्णरावाचे वडील जिल्हा सत्र न्यायालयात कारकून होते. भालेकरांच्या वडीलांच्या मृत्यूच्या वेळी फुले यांनी 'सत्पुरुषाचा आत्मा' या विषयावर प्रभावी भाषण दिले होते. 1864-68 या काळात भालेकर पुण्याच्या रविवार पेठेतील मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. 1868 ला त्यांनी गरीबीमुळे शिक्षण सोडून दिले. मुंबईचे गुत्तेदार दादाभाई दुवाझा यांचे खेड जि. पुणे येथील कामावर देखरेख करण्याची नोकरी करताना धर्मभोळा, अज्ञानी व दरिद्री समाज त्यांनी जवळून पाहिला. ही परिस्थिती ज्या कारणांमुळे निर्माण झाली, त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. शेतकरी, शेतमजूर यांच्या सभा घेऊन सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान ते लोकांना समजावून सांगू लागले. धर्मातील अनिष्ट व खोटया रूढींची ते माहिती देत; पण आपल्या कार्यास तेथे मर्यादा आहे, हे ओळखून त्यांनी राजीनामा दिला व ते भांबुडर्यास परत आले.
''फुले - भालेकर यांची भेट मुठेच्या काठी रोकडोबांच्या मंदिरात मे 1872 ला झाली. या मंदिरात भालेकरांनी 'अज्ञानराव भोळे देशमुख' व 'श्रीसत्यनारायण पुराणिक' हे दोन उपहासगर्भ वग सादर केले होते. अज्ञानराव भोळे देशमुख या वगात जहागीरदार, इनामदार, देशमुख असे वैभवयुक्त लोक अज्ञानात असल्यामुळे त्यांच्या हाताखालचे कारभारी त्यांना कसे लुटतात, फसवितात, हे दाखविले. श्री सत्यनारायण पुराणिक या वगातील वेंधळया ब्राह्मणाचे काम मोरेश्वर कावडे हे करीत.''75
सत्यशोधक जलशाचे मूळ या भालेकरांच्या वगात सापडते. आज हे वग उपलब्ध नाहीत; परंतु सामाजिक प्रश्नावरील पथनाटयाचे उद्गाते म्हणून भालेकरांचा उल्लेख करावाच लागेल. हे वग सादर केल्याची बातमी समजल्यामुळे पुफ्ले भालेकरांना भेटावयास आले. फुले

संदर्भ प्रकार: