प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 87 of 235

एका मध्यवर्ती संस्थेची कशी आवश्यकता आहे, हे त्यांना पटवून दिले. त्या विषयावर दुसरी अनेक भाषणे झाली. भवती न भवती होऊन सर्वांच्या विचाराने एक संस्था 24 सप्टेबर 1873 रोजी स्थापण्यात आली.''38
ज्योतिरावांच्या सहकाऱ्यात या संस्थेच्या स्थापनेमुळे मोठा उत्साह निर्माण झाला. आपली चळवळ संघटित करून तिच्याद्वारे आपला संदेश सर्व ठिकाणी पोहोचवावा, अशा निर्धाराने व ध्येयाने ज्योतिरावांनी ही संस्था स्थापन केली होती.
''ज्योतिरावांनी तिचे नाव 'सत्यशोधक समाज' असे ठेवले. महाराष्ट्रव्यापी अशी समाजसुधारणेची महाराष्ट्रातील ही पहिली चळवळ होय.''39
''सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणून अर्थातच ज्योतिरावांना निवडण्यात आले तर कार्यवाह म्हणून नारायण गोविंद लडकत यांना निवडण्यात आले.''40
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेवेळी जे ध्येय ठरविले ते अर्थातच पुढीलप्रमाणे होते.
''1) शूद्र आणि अतिशूद्र यांची ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी पिळवणूक बंद करणे.
2) शूद्र आणि अतिशूद्र यांना मानवी हक्काची आणि अधिकाराची शिकवणूक देणे.
3) ब्राह्मणी शास्त्राच्या मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यास मुक्त करणे.''41
''सत्यशोधक समाजाचे सभासद होताना प्रत्येकाला विशिष्ट शपथ घ्यावी लागे. खंडोबा या दैवतापुढे बेलपान उचलून ही शपथ घेत. शिवाय इंग्रज सरकारशी निष्ठा ठेवण्याचीही शपथ घ्यावी लागे.''42
सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर 1911 साली सत्यशोधक समाजाचे जे ठराव प्रसिध्द झाले, त्यात सत्यशोधक समाजप्रणीत तीन तत्त्वे गोविली होती, ती अशी -
''अ) सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत व देव त्यांचा आईबाप आहे.
ब) आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज नसते, त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा गुरु यांची आवश्यकता नाही.
क) वरील तत्त्वे कबूल असल्यास कोणासही सभासद होता येते.''43
सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक सभासदाला पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा घ्यावी लागे.
''सर्व मानवप्राणी एकाच देवाची लेकरे आहेत. सबब ती माझी भावंडे आहेत, अशा बुध्दीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानधारणा करतेवेळी अगर धार्मिक विधीचे वेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. दुसऱ्यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करीन. मी माझ्या मुला-मुलींना सुशिक्षित करीन. मी नेहमी राजनिष्ठेने वागेन. परमेश्वरास व सत्यरूपी परमेश्वरास साक्ष ठेवून मी ही प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल. अशाप्रकारे आयुष्यक्रम गुदरल्यास योग्यप्रकारे मदत तो मला करो.''44
सत्यशोधक समाजाचे सभासदत्व सर्व जाती-धर्मातील लोकांना मोकळे ठेवले होते.
''ब्राह्मण, महार, मांग, ज्यू आणि मुसलमान हे त्या चळवळीच्या आरंभी सत्यशोधक समाजाचे सभासद होते.''45
सत्यशोधक समाजाची तत्त्वे पुढीलप्रमाणे होती.
''सार्वजनिक हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकांच्या वृध्दापकाळातील संकटाचे निवारण करणे. जात, धर्म, राष्ट्र इत्यादींचा विचार न करता पंगू व अनाथ लोकांना यथाशक्ती साहाय्य करणे, ही सत्यशोधक समाजाची काही तत्त्वे होत.''46
''परमेश्वराचे जनकत्व व मनुष्याचे बंधुत्व या तत्त्वावर भर देण्यात येत असे.''47
''इतरास अपाय न करणे, आई-वडीलांची सेवा करणे, त्यांच्या आज्ञा पाळणे या बाबी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वात अंतर्भूत होत्या. ब्राह्मणी धर्माच्या आर्थिक व वैचारिक गुलामगिरीतून शूद्र शेतकऱ्यांची मुक्तता करणे तसेच जमीनदार व सावकार यांच्या तावडीतून त्यांची मुक्तता करणे हे सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट होते.''48
3.1.4 सत्यशोधक समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी
सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बाल्यावस्थेतच नख लावण्याच्या उद्देशाने ब्राह्मणांनी सत्यशोधक समाजाविरुध्द प्रचार करण्यास प्रारंभ केला.
''ब्राह्मणांनी घाबरवून सोडलेले हे गरीब व अज्ञानी लोक ज्योतिरावांकडे येऊन त्यांना विचारीत, 'अहो मराठीत केलेली प्रार्थना देवाला कशी ऐकू जाईल?' ज्योतिरावा त्यांना समजावून सांगत की, 'मराठी, गुजराती, तेलगू किंवा बंगाली भाषेत परमेश्वराची प्रार्थना केली तर ती परमेश्वराला पोहोचत नाही किंवा रूजू होत नाही, असे मानणे ही चुकीची गोष्ट आहे. विधाता हरएक मनुष्याचे मन जाणतो. त्याची आंतरिक इच्छा, प्रार्थना त्याला कळतात. लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतून केलेल्या प्रार्थना देवाला ऐकू गेल्या नाहीत काय? तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी यांच्या प्रार्थना देवाच्या कानी गेल्या नाहीत काय?''49
सत्यशोधक समाजाचे कोणी सभासद होऊ नये असा प्रचार ब्राह्मण लोक खेडयापाडयात करीत आणि त्याबरोबर धाकही दाखवीत. सत्यशोधक समाजाचे जे सभासद होत

संदर्भ प्रकार: