प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 86 of 235

ज्योतिरावांना त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे वाटू लागले. त्यासाठी त्यांनी आपल्या वैचारिक कार्यातून सत्यशोधक समाजाची पूर्वपिठीका तयार केली होती. त्याविषयी धनंजय कीर म्हणतात,
''सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वी पंधरा वर्षे ते आपला विचार जाहीर सभा, पत्रके आणि पुस्तिका यांच्याद्वारे व्यक्त करीत होते. कनिष्ठ वर्गांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन ते त्यांनी आपल्या मुलास द्यावे, असा ते उपदेश करीत राहिले होते. देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली भटाभिक्षुकांनी व शास्त्री-पंडितांनी धार्मिक ग्रंथांद्वारे त्यांच्या मानेभोवती मानसिक गुलामगिरीचे पाश गुंडाळले होते. त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी व त्यांच्यात प्रसृत केलेल्या दुष्ट चालीरिती व धर्मभोळया, वेडगळ समजूती या झुगारून देऊन स्वत:स मुक्त करावे, असा सतत आक्रोश त्यांनी चालविला होता.''34
ज्योतिरावांनी आपल्या साहित्यातून सत्यशोधक समाजाचा पाया रचला होता. त्यातून त्यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांच्या मनावर असे ठसविण्याचा प्रयत्न केला की, ''ब्राह्मणी शास्त्रांनी त्यांच्यावर लादलेली मानसिक गुलामगिरी ही काही ललाटलिखित नाही. तसेच ती देवनिर्मित नाही. जन्मत:च ती गुलामगिरी त्यांच्यासंगे येते. फुले यांनी काबाडकष्ट करणाऱ्या वर्गामध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान याविषयीची जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला. दारिद्रय आणि जातीयुक्त सामाजिक अन्याय, जुलमी, अन्यायी आणि जातीभेदजन्य सामाजिक व्यवस्था यांच्याविरुध्द त्यांनी बंड करण्यास उठावे म्हणून त्यांच्या ठायी धैर्य निर्माण केले. मानव प्रतिष्ठेच्या नवीन कल्पना, मानवी समानता आणि आत्मोध्दार याविषयीच्या नवीन विचारांनी त्यांनी त्यांना नवीन प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.''35
ज्योतिरावांनी आपल्या भाषणातून व विविध ग्रंथांच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार यांच्या गाऱ्हाण्यांकडे सरकारचे लक्ष वेधावे, यासाठी प्रयत्न केले.
''सरकारच्या निरनिराळया खात्यातून लाचलुचपतीचे व्यवहार कसे चालतात, गोरगरिबांची कशी पिळवणूक होते, अधिकाऱ्यांचे न्यायाकडे कसे दुर्लक्ष होते या सर्व गोष्टी ते सतत उघडकीस आणीत राहिले होते. आपले बुध्दिप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचार आपले अनुयायी, शेतकरी आणि कामगार यांच्यात प्रसृत व्हावे म्हणून त्यांनी संघटना करण्यास प्रारंभ केला. शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होत आहे आणि दारिद्रयाच्या चिखलात ते कसे अधिकाधिक रूतत चालले आहेत, सामाजिक अन्यायाखाली ते कसे पिचत चालले आहेत हे त्यांना सरकारच्या लक्षात आणून द्यावयाचे होते. तसेच अतिशूद्रांना म्हणजे महारामांगादी अस्पृश्यांना शूद्रांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करून द्यायचा होता.''36
कनिष्ठ वर्गाने एकजूट होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांना मानवी अधिकार प्राप्त होणार नाहीत, हे फुले जाणून होते. त्यामुळे त्यांनी समाजाचे संघटन करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याविषयी जोशी लक्ष्मणशास्त्री लिहितात,
''हिंदू समाजात राहून हिंदू धर्मग्रंथांना अप्रमाण मानून आणि अन्यायपूर्वक सामाजिक बंधनाचा त्याग करून समतावादी विचारांचा व मूलभूत मानवी हक्कांचा विचार करण्याचा कार्यक्रम सांगणारे सुधारक निर्माण झाले. श्रुतीस्मृतीपुराणादी सगळे ग्रंथ हे ब्राह्मणांच्या दास्यात राहिले पाहिजेत, हा दृष्टिकोन धर्मग्रंथात असल्याने हे धर्मग्रंथ व त्यातील आचारधर्म यावर बहिष्कार टाकून सर्वसामान्य नितीनियम व मानवी मूल्ये हाच खरा धर्म मानावा, हेच सत्य आहे, या मताच्या प्रचाराकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना केली.''37
3.1.3 सत्यशोधक समाजाची स्थापना
सुखवस्तू वरिष्ठ जातीचे लोक आणि मुख्यत: ब्राह्मण हे शूद्रातिशूद्राला, बहुजन समाजाला समानतेचे अधिकार प्राप्त होऊ देणार नाहीत. उलट ते अधिकाधिक असहिष्णू बनतील. ते स्वत:ला मिळालेले पिढयान् पिढयांपासूनचे विशेष अधिकार, सवलती, सत्ता आणि उच्च दर्जा या गोष्टी सहजासहजी सोडणार नाहीत, अशी ज्योतिरावांना पूर्ण कल्पना होती. या वर्गाशी झगडा करण्याइतके सामर्थ्य या कनिष्ठ जातीच्या ठिकाणी नव्हते. मानसिक, राजकीय, आर्थिकदृष्टया ते सारे कनिष्ठ वर्गातले लोक दुर्बल होते. त्यांना संघटित करणे हाच एक उपाय समोर दिसत होता. हे लक्षात घेऊन आपल्या मतप्रणालीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक संस्था निर्माण करण्याचा बेत त्यांनी निश्चित केला.
''24 सप्टेबर 1873 रोजी महाराष्ट्रातील आपले सर्व चाहते आणि अनुयायी यांची पुण्यात एक सभा बोलाविली. महाराष्ट्रातल्या निरनिराळया महत्त्वाच्या केंद्रांतून सुमारे साठ कार्यकर्ते जमले. ज्योतिरावांनी त्यांच्यापुढे एक मोठे परिणामकारक भाषण करून आपल्या चळवळीच्या मार्गदर्शनाला

संदर्भ प्रकार: