शिवसेना कशासाठी?: Page 2 of 2

तरी मरेल किंवा मी तरी मरेन. इतकी जिद्द असल्याशिवाय मराठयाला मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही! म्हणून तुम्ही आज जमला आहात. आपल्याला सीमोल्लंघन करायचंय. ते करताना प्रत्येक ठिकाणी छत्रपतींचं नाव घेऊन, संकटात उडी घालून अन्यायाचा फडशा पाडायचा, असा निश्चय केला पाहिजे. बसमध्ये जाताना एखाद्या महिलेला कुणी धक्का मारला, तर एक फाऽडकन वाजली पाहीजे. इतकी जेव्हा जरब तुम्ही निर्माण कराल, त्याचवेळेला रस्त्यातून, चाळीतून-बिल्डिंगमधून होणारे गैरप्रकार थांबतील. ‘अहिंसा परमो धर्म:’ हे तिथे चालणार नाही.

अहो, अशा अहिंसेने कुठे कामं होतात काय? मी सांगतो तुम्हाला पुराण. एखादा पुराणिक काय माझ्यापुढे पुराण सांगेल! ब्रम्ह आहे नी माया आहे! ठीक आहे! पण आमचं-आमचं कर्म आहे, ते आम्हाला सुधारायचंय. (टाळया) तेव्हा आज ही शिवसेनेची सगळी गर्दी पाहून तुमचं दर्शन घेऊन मला तर असं वाटायला लागलं की, जो अर्जुन धनुष्यबाण टाकून एखाद्या नपुंसकासारखा उभा राहीला; तेव्हा त्याला भगवान कृष्णानी, गीतेचा उपदेश केला. त्यावेळी भगवंतानं त्याला जसं विश्वरूप दाखवलं, तसं हे विश्वरुप आज हतबल झालेल्या मराठयाला, आपल्याला शिवरायानं दाखवलं आहे. ही विश्वरुपाची पुण्याई फुकट जाता कामा नये. तुम्ही जर शिवरायाचे खरे भक्त असाल, जातिवंत मराठे असाल, मराठयाचं नाव सांगत असाल, महाराष्ट्राबद्दल खरंखुरं प्रेम असेल, तर आजपासून निश्चय करा :- अन्यायाला कधीही मी क्षमा करणार नाही आणि जे न्याय्य आहे त्याच्याकरता झगडतना प्राण गेला तरी बेहत्तर! पण महाराष्ट्राचं नाव मी बद्दू करणार नाही! अशी बुध्दी तुम्हाला छत्रपती शिवराय देवो, इतकं सांगून मी माझं भाषण संपवतो.