स्वाध्याय संदेश: Page 10 of 74

`नमो बुद्धाय’ म्हणून बुद्धदेवाला प्रणिपात करीत असतात. असे असता, हिंदुस्थानचा बुद्धदेव की बुद्धदेवाचा हिंदुस्थान, हा सोपा प्रश्न सुद्धा हिंदू म्हणविणारांना कधी सुचू नये, हे कालमाहात्म्य होय. परंतु या कालमाहात्म्यावर विचारशक्तीची मात करून बुद्धदेवाच्या कामगिरीची कृतघ्न हिंदुस्थानाला आठवण देण्याचा उपक्रम यंदा मुंबईच्या काही विचारी सज्जनांनी ता. १०-५-२२ रोजी बुद्धजयंती साजरी करून केला, याबद्दल प्रबोधन त्या सर्व सज्जनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालीत आहे. गेल्या जयंतीचा विशेष हा होता की बुद्धदेवाचे स्मरण करण्यासाठी जमलेल्या मंडळींत अनेक पक्षांचे, अनेक मतांचे आणि अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी एकाच भावनेने एकत्र झाले होते. भेदांतच अभेद हे जे बुद्धदेवाच्या कामगिरीचे रहस्य ते या ठिकाणी यदृच्छेने प्रत्यक्ष व्यक्त झालेले दिसले. जपान राष्ट्राचे दरबारी वकीलसाहेब आपल्या पत्नीसह हजर होते. सारांश, पृथ्वीवरील निरनिराळी राष्ट्रे एकजीव होण्याचा संभव जितका बुद्धदेवाच्या चरित्ररहस्यात आहे, तितका श्रीकृष्णाच्या नाही आणि क्रिस्ताच्या तर नाहीच नाही, हे लक्षात येईल. बुद्धदेवांनी आपल्या कामगिरीचे क्षेत्र हिंदुस्थानापुरतेच आकुंचित ठेविले नाही. त्यांनी सर्व भेदांचा पूर्ण संन्यास करून हिंदुस्थानाची कोंडी फोडली आणि एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः । स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ।। या व्यापक धोरणाने त्यांनी सा-या जगाला `आपले’ केले. प्रस्तुत जयंतीचा उपक्रम असाच दरसाल नियमित होईल आणि त्याबरोबरच बुद्धदेवाच्या संप्रदायाचा इतिहास अध्ययन करण्याची अभिरुची तरुणतरुणीत बळात जाईल, तर हिंदुंच्या प्राणत्राणपरायण विविध चळवळीत लुप्त झालेले मिशनरी चैतन्य खात्रीने पुनश्च थरारल्याविना राहणार नाही. सांप्रत हिंदुराष्ट्र पुनरुज्जीवनाच्या संक्रमणावस्थेत आहे. त्याचे सामाजिक व धार्मिक जीवन सडलेले असून, राजकीय बाबतीत ते गुलाम बनलेले आहे. अनेक मतांतरांचा सर्वत्र गोंधळ माजल्यामुळे विवेकवादाची बीजे रुजविण्याचेकार्य कठीण होऊन बसले आहे. अनेक शतकांच्या भिक्षुकशाही वर्चस्वामुळे सारी जनता अक्षरशत्रू राहिली आहे आणि त्यांच्या अज्ञानावर चरणा-या भिक्षुकी पोळांनी तिच्यात धर्मांच्या नावावर मानसिक दास्याचे जहर फैलावून आपल्या वर्चस्वाची कडेकोट तटबंदी केलेली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सध्या चालू असलेल्या नानाविध चळवळी एकपक्षी, एकांगी व एकाक्ष असल्यामुळे, मूढ जनतेच्या जागृतीने उत्पन्न झालेला दास्यविरोधी ज्वालामुखी त्या चळवळींना ठिकठिकाणी विरोधाच्या ज्वाळांनी अडवून धरीत आहे. अशा प्रसंगी हिंदु राष्ट्राला बुद्धदेवाचे विस्मरण होताच कामा नये. ज्या बुद्धदेवाने एक वेळ याच भरतखंडाला असल्याच परिस्थितीत तारले व सा-या दुनियेचा सम्राट बनविले, तो बुद्धदेवच आता हिंदू राष्ट्राच्या धुरेवर येऊन उभा राहिला पाहिजे. बुद्धपूर्वकाली हिंदुराष्ट्राची जी स्थिती होती तीत आणि आताच्या स्थितीत रूपभिन्नतेपेक्षा कसलाही फरक नाही. भिक्षुकशाहीचे बंड आताप्रमाणेच त्या वेळी फार शिरजोर झाले होते. धर्माच्या नावाखाली वाटेल तसले अत्याचार करण्यास ब्राह्मण लोक पक्के निर्ढावलेले होते. क्षत्रिय, वैश्यांच्या तेजोभंग करून, त्यांना सर्व बाबतीत ब्राह्मणांचे गुलाम बनविण्याचे भिक्षुकी कारस्थान त्यावेळी पूर्ण यशस्वी झाले होते. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांतच केवळ नव्हे, तर राजकीय क्षेत्रांतही, ब्राह्मण आपल्या भूदेवत्वाच्या सबबीवर श्रक्षियांना खेटराप्रमाणे लेखू लागले होते. खुद्द क्षत्रिय, वैश्यांची जेथे ही स्थिती, तेथे गरीब बिचा-या शूद्रांची व अस्पृश्य जनांची काय बडदास्त ब्राह्मणांनी ठेविली असेल, याची कल्पना आम्ही करून दिलीच पाहिजे असे नव्हे. सर्वच बाबतीत भिक्षुकशाही शिरजोर झाल्यामुळे ब्राह्मणेतरांच्या नशिबाला शारीरिक व मानसिक गुलामगिरीपेक्षा दुसरे काय येणार? ब्राह्मण म्हणजे भूदेव, ब्राह्मण जात म्हणजे राष्ट्र, त्यांच्या ब-यावाईट स्वार्थी आत्मस्तोमाच्या चळवळी म्हणजे राष्ट्रीय चळवळी, आणि ब्राह्मणेतर जनता, तिच्या आकांक्षा, तिचे हक्क इत्यादी प्रकार म्हणजे ब्राह्मणांच्या पायातली पायतणे, या वर्तमान भिक्षुकशाही कल्पनेचा राक्षसी धागा थेट बुद्धपूर्वकालीन इतिहासापर्यंत बिनतोड जाऊन भिडलेला आढळतो. धर्माच्या क्षेत्रातल्या भिक्षुकी वर्चस्वाच्या कल्पना हुबेहूब मनुस्मृति टायपाच्या. मंत्रतंत्राचे बंड बेसुमार माजलेले. सर्व जग देवाच्या स्वाधीन, देव मंत्रांच्या आधीन, मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन, म्हणून जेहत्त ब्राह्मण हे भूदेव होत, ही जी मनुस्मृतीची भिक्षुकी घमेंड आजचेही ब्राह्मण निःशंकपणे मारण्यास शरमत नाहीत, तिची अक्षरशः अंमलबजावणी त्या वेळी ब्राह्मणेतरांवर ब्राह्मण गाजवीत असत.