स्वाध्याय संदेश: Page 9 of 74

म्हणजे पॉझिटिव निगेटिवचा संयोग होय. हृदयरूपी डायनामोमध्ये अमोघ विद्युतशक्ति निर्माण झालेली आहे, पण निगेटिव पॉझिटिवचा संयोग झाला नाही तर ठिणगी कशी पडणार? शिवाजीच्या महाराष्ट्राने आपल्या शिवमय हृदयाची तार मस्तकातल्या विचारयंत्राशी जोडून देण्याचा यत्न करण्यातच त्याच्या राष्ट्रीय भाग्योदयाची खरी गुरुकिल्ली आहे, हेच महाराष्ट्राला सक्रीय व सप्रमाण पटवून देण्यासाठी १७व्या शतकाच्या दुस-या दशकात श्रीशिवछत्रपति महाराज या पुण्यश्लोक राष्ट्रवीराचा जन्म झाला. या पुण्यप्रभावशील जन्मदिवशी महाराष्ट्राच्या ख-याखु-या राष्ट्रीय संस्कृतीचे बिनतोड जातकर्म निश्चित ठरले गेले. महाराष्ट्रीयांनी आपले हृदय मस्तकांत मेंदूच्या अगदी शेजारी आणून स्थापन केल्याशिवाय त्यांचा राष्ट्रीय भाग्योदय होमार नाही, हा संदेश घेऊनच आमच्या राष्ट्रवीर छत्रपतीची स्वारी महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षितिजावर बरोबर २९३ वर्षांपूर्वी उदय पावली, आणि आपल्या अनुपमेय पराक्रमांनी हा भूगोल त्यांनी दणाणून सोडला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा कोठे आहे व तो कोणत्या प्रयत्नांनी उद्दीपित होऊन आपल्या मायदेशाचे पांग फेडण्यास शक्त होईल, हे अचूक उमगणारा धन्वंतरी जर कोणी गेल्या अनेक शतकांच्या विस्तीर्ण कालावधीत जन्मला असेल तर तो एकच – अगदी `अनामिकासार्थवती बभूव’ करणारा एकच – भोसले कुलदीपक राष्ट्रवीर श्रीशिवाजी हाच होय. राष्ट्राचे नायकत्व पत्करून काजव्याप्रमाणे चटकन् चमकून पटकन् लुप्त होणारे किंवा तेरड्याप्रमाणे तीनच दिवसांत जन्मताच मृत्यु पावणारे नामधारी राष्ट्रवीर आजवर अनेक झाले, रोजच्या रोज धड्यापासरी उत्पन्न होत आहेत व पुढेही होत राहतील; तथापि राष्ट्रवीर या शब्दांत ज्या उदात्त रमणीय भावनांचा समावेश होतो, त्या सर्व भावनांचे एकीकरण झालेला सकल गुणालंकृत असा असामान्य बुद्धिमत्तेचा पुतळा या भाग्यवान महाराष्ट्रभूच्या कुसव्यात जर कोणी जन्मला असेल तर तो आमचा प्यारा प्राण शिवबाच होय. श्रीशिवजयंत्युत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे हृय फुरफुरू लागले. शीशिवाजीचा हा उत्सव घरोघरी करा असा आदेश करण्याचे वास्तविक काहीच कारण नाही. महाराष्ट्राच्या दिनचर्येचा असा एकही क्षण नाही की ज्या क्षणी अस्सल महाराष्ट्रीयांच्या श्वासोच्छवासात शिवो हम् शिवो हम् असा ध्वनि निघत नाही. श्रीशिवाजीमहाराज हे लोकमान्य, महात्मा किंवा दे. भ. या शुद्ध लौकिकी भावनेच्याही वरच्या कोटीतले होते. ते महात्मा होते किंवा नव्हते, ते देशभक्त होते किंवा नव्हते हा काथ्याकूट करणा-यांना शिवाजीची वास्तविक योग्यताच समजली नाही, असे म्हणणे भाग पडते. ते लोकमान्य होते पण अर्वाचीन लोकमान्यांप्रमाणे शुद्ध लोकछंदानुवर्ती मुळीच नव्हते. ते गोब्राह्मण-प्रतिपालक होते परंतु ब्राह्णांचा शिरजोरपणा मान्य करणारे नव्हते. श्रीशिवाजी महाराजांची चरित्रे आजवर बरीच झाली; परंतु या अननुभूत राष्ट्रवीराच्या चारित्र्याचे मर्म महाराष्ट्राने अजून पूर्णपणे जाणलेले नाही. हे मर्म ज्या दिवशी महाराष्ट्राला नीट उमगेल, त्या दिवशीच त्याचा भाग्योदय होईल. या मर्माची ओळख पटवून देणा-या `राष्ट्रवीर’ साप्ताहिक पत्राचा आज श्रीशिवरायाच्या जन्मदिवशीच जन्म होत आहे, याबद्दल त्याचेकोणीही राष्ट्राभिमानी अभिनंदनच करील, या राष्ट्रवीराच्या पहिल्या अंकांत माझ्या सारख्या दुबळ्या सेवकाची वेडीवाकडी सेवा अवश्य रूजू झाली पाहिजे, असा निकडीचा विद्युसंदेश आल्यामुळे तात्कालिक भावनेचे हे अक्षरशः वेडेवाकडे विचार-व्यक्तीकरण राष्ट्रवीराच्या चरणी अर्पण करून, सध्या वाचकांची मी रजा घेतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परि त्या शिवराये बोलविले!!! [राष्ट्रवीर, ९-५-२१] 000 बुद्धदेवाची कामगिरी बरोबर २५११ वर्षे झाली. वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस. हिंदू राष्ट्राच्या चरित्रातला एक परम मंगल, स्फूर्तिदायक आणि अभिमानोत्तेजक दिवस होय. अडीच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी हिंदु राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, नैतिक व राजकीय जीवनात आत्मतेजाचे चैतन्य ओतून प्रबोधनाचे अननुभूत चळवळ निर्माण करणारा महात्मा गौतमबुद्ध बुद्धदेव म्हणून जगद्रंगभूमीवर येऊन उभा ठाकला. या दिवशी सर्व जगभर ठिकठिकाणी बुद्धानुयायी बांधव बुद्धदेवाचे भजनपूजन करण्यासाठी एकत्र होतात व त्याने निर्माण केलेल्या विश्वव्यापी प्रबोधनाच्या दिव्य कामगिरीचे मुमुक्षु वृत्तीने चिंतन करतात. वास्तवीक, बुद्धदेव आम्हा हिंदूंचा. हिंदू धर्मात मिशनरी चैतन्य ओतून त्याला सा-या जगाचा जगद्गुरु केले बुद्धदेवांनी. आज नाही नाही तरी जगाच्या पाठीवर पन्नासकोटींच्या वर बुद्धानुयायी भगिनी बांधव दररोज