स्वाध्याय संदेश: Page 8 of 74

मूळ सामर्थ्य दाखवी ।। रामदास म्हणे माझे । सर्व आतुर बोलणे । क्षणावे तुळजा माते । इच्छा पूर्णचि ते करी ।। अ ब ब ब! तीनशे वर्षं होत आली आं? आता काय तीनशेला अवघी सातच वर्षे कमी! केवढा हा अवाढव्य आणि विस्तृत कालावधी! या लांबलचक कालावधीचा – एक लक्ष सात हजार चारशे दिवसांचा – चित्रपट आपल्या जिवंत स्मृतीच्या तिखट नजरेसमोर भरभर भरभर पुन्श्च उघडून नाचविला, तर या भाग्यवान महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनातले नानाविध सुखदुःखांचे देखावे हृदयातील विकारांना रटरट रटरट उकळी फोडीन, आपल्या चिमुकल्या छातीची कपाडे खडाखड उघडून टाकल्याशिवाय रहात नाहीत! लाखों दिवसांच्या अनंत श्रेणींनी अपरंपार रंगून निघालेला हा चित्रपट क्षणभर तसाच गुंडाळून ठेवा आणि आपल्या हृदयस्थ आत्मारामाला विचारा की हे आत्मारामा, आमच्या महाराष्ट्राचा राष्ट्रवीर आमच्या राष्ट्रीय भाग्याला उज्वल करणारा स्वातंत्र्यसूर्य कधी रे उगवला? तर तो स्मृतीच्या मूकभाषेत हेच उत्तर चटकन देईल की आजच. आज? आज तारीख ९ मे सन १९२१ इसवी रोजी? आत्मारामा काय म्हणतोस हे इतिहासाचा चित्रपट तरी उघडून पाहा. आजचा शक १५३९ नव्हे, प्रभवनाम संवत्सर नव्हे, अश्विनी नक्षत्र नव्हे, गुरुवारही नव्हे आणि ६ एप्रिल सन १६२७ तर नव्हेच नव्हे! नाही म्हणायला वैशाख महिन्यातली तिथी मात्र जुळते खरी. पण ती वार्षिक उत्सवाची तिथी होय. आमची चंचल स्मृति, ही पुण्यतिथी आणि आमची सद्यःस्थिती, हा त्रिवेणी संगम झाल्यामुळे महाराष्ट्रीयांच्या रोमारोमात स्वाभिमानाचा कंप उत्पन्न करणारी स्फूर्ती तर तुझ्या तोंडून आजच असे वदवीत नाही ना? कालमर्यादेच्या शतकांची गोष्ट राहू दे, एका दशकाच्या तडाख्यात मोठमोठ्या मी मी म्हणणा-या महापराक्रमी राष्ट्रांचे तीनतेरा झाले. त्यांच्या राष्ट्रवीरांच्या चारित्र्यांच्या, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच, चिंधड्या चिंधड्या उडाल्या. ज्या राष्ट्रगीतांच्या नुसत्या धृपदाचा स्वर लष्करी वाद्यांतून प्रगट होताच शेळपटाचाही योद्धा बनून योद्धांच्या नसातले रक्त राष्ट्राभिमानाने तापून उसळ्या मारीत असे, तीच राष्ट्रगीते आजला कालव्यतीत आणि मृत ठरून गेली. सा-या पृथ्वीच्या गोलाला आवळ्याप्रमाणे स्वतःच्या मुठीत ठेवू म्हणून मिलिटरीझमच्या गर्जना करणा-या जर्मनीसारख्या उत्तान महत्त्वाकांक्षी राष्ट्राला आज प्राणान्ताचा घरघराट लागला आहे. हम करे सो कायदा असल्या दंडुकेशाहीच्या जोरावर सा-या रशियाच्या उरावर वरवंटा फिरविण्यातच आपल्या ऐश्वर्याची परमावधी मानणारी झारशाही बोलबोलता एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे कवडी किंमतीच्या सोल्जरांच्या बंदुकांनाच बळी पडून आमूलाग्र धुळीस मिळाली. काळाचा झपाटा असा तीव्र वेगाने सुरू आहे की सूर्याभोवतालच्या पृथ्वीच्या एकाच प्रदक्षिणाकालात सांप्रत महासागरांचे पर्वंत बनून पर्वतांचे पाणी पाणी होत आहे. इतका भयंकर स्थित्यंतराचा रारगाडा सुरू असतानाही आमच्या परमपूज्य परमप्रिय श्रीशिवछत्रपतीची स्मृती पूर्वी जशी होती तशीच्या तशीच आजलाही अक्षय जिवंत रहावी, या चमत्काराचे गूढ काय बरे असावे? राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र आजला जरी पतित आणि परावलंबी ठरलेला असला, तरी त्याचे अंतःकरण अजूनही श्रीशिवमय असल्यामुळे ते पूर्ण स्वतंत्रच आहे. त्याच्या हृदयाच्या अणुरेणूवर आद्य छत्रपतीची प्रतिमा णक्षय व खोलवर कोरली गेल्यामुळे, असल्या श्रीशिवमय झालेल्या महाराष्ट्राला जगातले कोणते राष्ट्र जिंकू शकेल? महाराष्ट्र अजिंक्य आहे! आमच्या शिवाजीचा महाराष्ट्र स्वतंत्र आहे. आमच्या तानाजीचा मावळा नेपोलियनांची खाण आहे. आमच्या बाजी प्रभूची पावनशिंड म्हणजे सा-या जगाला पावन करणारी स्वातंत्र्याची माता आहे. छत्रपति संभाजीचा हा महाराष्ट्र म्हणजे हिंदुधर्माचे जागतेजाग धर्मपीठ आहे. बा महाराष्ट्रा! बिचा-या महाराष्ट्रा!! व्यक्त सृष्टीवर खिळलेली तुझी नजर जरा अव्यक्ताकडे वळीव. तुझ्या विचारी दृष्टीचा कोन सध्या बहिर्मुख आहे तो अंतर्मुख करून क्षणभर घूंगटका पट खोल रे! म्हणजे यक्षिणीच्या कांडीप्रमाणे तुझी सध्याची मृण्मयावस्था सुवर्णाची छडी बनून, महाराष्ट्राच्या सात्विक पराक्रमाचा दरारा सा-या जगाच्या छातीवर हां हां म्हणता आपला धौशा गाजविल्याशिवाय खास राहणार नाही. आज महाराष्ट्राची दृष्टी बाहेरच्या व्यक्त सृष्टीवर खिळलेली असल्यामुळे त्याच्या राष्ट्रीय अंतःकरणाच्या संवेदनांची आणि त्याच्या मस्तकातील विचार-यंत्राची ताटातूट झालेली आहे. हा हृदयमस्तकाचा संयोग