स्वाध्याय संदेश: Page 67 of 74

राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्त कटाच्या फासात अडकवून जिवंत गाडण्याची नातुशाही या दोन्ही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातूकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तो थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकात आपल्या कारस्थानाची वेसण `खूप शर्तीने’ घातली. अर्थात् सर जेम्स कारनाकपासून तो थेट रेसिंडेट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूत्राच्या हालचालीप्रमाणे `लेफ्ट राइट’ `लेफ्ट राइट’ करू लागली. या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणास जाळून टाकण्यासारखा आहे. पंरतु तो प्रत्यक्ष घडवीत असताना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर यापैकी एकाचेही अंतःकरण चुकूनसुद्धा कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात ते हे असे असते. अनुयायांची गोष्ट काय विचारावी? जेथे खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्य सद्सद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळताना इतरांना कशाची भीती? प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राह्मणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेताच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचे सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीही कल्पना भासू नये काय, की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळे श्रीशिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरात घुसवीत आहोत? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना `स्वराज्यद्रोही छत्रपति’ म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहीत. या वरून एवढेच सिद्ध होते की, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. आम्हाला जर स्वराज्य मिळवावयाचेच असेल, आमचे उद्याचे स्वराज्य चिरंजीव व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहाच्या वेळी भिक्षुकशाहीने या साता-यात रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याच स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातू संप्रदायाचा आपणास प्रथम बीमोड केला पाहिजे. नव्हे, असे केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाही. बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, राजहत्या, स्वराज्यहत्या, आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसते बरबटलेले आहे. अर्थात जोपर्यंत हा नातू, किबे केळकर अँड को. चा संप्रदाय महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरेखुरे स्वराज्य लाभणार नाही. या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या पदरात पडणारे स्वराज्य म्हणजे ब्राह्मणभोजनातल्या खरकट्या पत्रावळी हे खूब ध्यानात ठेवा. छत्रपति प्रतापसिंहाने ब्राह्मणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठी खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळातलाच काटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आता वळू. हरप्रयत्नाने घरभेद करून फोडलेल्या अप्पासाहेब भोसल्याला ता. २४ मार्च १८३९ रोजी नातूने रेसिदंट ओवन्सच्या चरणांवर नेऊन घातले व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कटसेना भराभर जमा केली. कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन, हा राजा इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे, आम्ही सर्व पुरावा आपल्याला देतो, माबाप कंपनी सरकारची आम्हाला पूर्ण मदत असावी, असा मंत्र फुंकून रेसिदंट ओवन्सला नातू कंपूने आपले तोंड बनविले. राजकीय बाब ओवन्सच्या मार्फत अशी पेटवून दिली, तो इकडे (अ) धर्ममार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध, कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमाबद्दल फिर्यादीच्या अर्जाची भेंडोळी रवाना करण्यासाठी आपली ब्राह्मणसेना जय्यत उभी केली. आज ज्याप्रमाणे ब्राह्मणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचारांच्या खोट्यानाट्या फिर्यादीची दंगल उडालेली हे, त्याचप्रमाणे चिंतामणरावांच्या ब्राह्मणसैन्याने आपला शंखध्वनीचा संप्रदाय मोठ्या नेटाने चालू केला. हे राष्ट्रीय ब्राह्मण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहीत. निरनिराळ्या वेळी कंपनी सरकारच्या मोठमोठ्या अधिका-यांच्या छावण्यांपुढे हजारो ब्राह्मणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्याची सुरुवात केली. चिंतामणरावाने तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध नीळकंठ शास्त्री