स्वाध्याय संदेश: Page 66 of 74

स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकिता येतील. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणे सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याचे कामी किंचितसुद्धा शरमली नाही, त्यांचा खराखुरा इतिहास उजेडात आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचे पीक मनमुराद आलेले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाही. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण का गमावले, याचा नीट विचार केल्याससध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हाच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणे म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्याने आहेत; कारस्थानी वेदांत आहे; ठगांची ठगी आहे; स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे. शिवरायास आठवावे; गोष्ट खरी! परंतु आज शिवछत्रपतींचे स्मरण होताच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या -हासाचे पृथक्करण करम्याकडे आपली स्मरणशक्ती वळते, त्याला इलाज काय? तेव्हा आपण आता छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे करवीरकर शाहू छत्रपती होते. १८१८ साली रावबाजीचे व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचे उच्चाटण पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले. यापूर्वी याच अजिंक्यता-याच्या किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यंनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेत ठेवलेले होते. सिंहासनाधिष्ठित होताच, महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राह्मणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न हाती घेतला. थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्राह्मणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनी सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राह्मणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राह्मणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरे सहन होणार? ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीने कमरा कसल्या. त्यावेळी या कंपूचे पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढे झालेले त्यावेळचे `लोकमान्य’ म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होत. इंग्रजांकडून मिळणा-या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमाने स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागेपुढे पाहिले नाही तो चांडाळ, छत्रपतीच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल? असले हे लोकमान्य नातू शेंडी झटकून पुढे सरसावताच त्यांच्या पाठीमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ हाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा – अर इचिभन! हत बी भाऊ लेल्या?) असेल हे अस्सल ब्राह्मण वीर प्रतापसिंह छत्रपतीची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राह्मण, एकरकमी चित्पावन, अस्सल राष्ट्रीय. तेव्हा आपल्या पक्षाला `सार्वजनिकत्व’ आणण्यासाठी बाळाजीपंतांना एखाद्या फुल्याची गुंजाळाची किंवा औट्याची फारच जरूर भासू लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राह्मणेतर प्यादे हस्तगत झाले. ते कोणते म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले. खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्राच्या जाळ्यात सापडताच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचे स्वरूप तेव्हाच आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्री नातूकंपूने इंग्रजांच्या हातून छत्रपतीच्या सिंहासनाचे परस्पर पावणेतेरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यानी एकदोन शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले. नातूंनी विचार केला, की हा मरगट्टा छत्रपति ब्राह्मणेतरात धार्मिक आणि सामाजिक जागृती करून आम्हा भूदेवांचे वर्चस्व कढीपेक्षाही पातळ करणार काय? थांब लेका! तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितो, मग पहातो तुझ्या ब्राह्मणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना `स्वराज्यद्रोही’ ठरविण्याची केसरीकारांची