स्वाध्याय संदेश: Page 65 of 74

मुसलमानी गंडगिरी बेफाम बोकाळली म्हणून शिवाजी अवतरला आणि म्हणूनच संतमंडळींनी आपले भगवती टाळ जोरजोराने ठोकण्याचा धडाका सुरू केला. भिक्षुकांची भिक्षुकशाही ढुंगणाचे डोक्याला गुंडाळून बेताल नाचू लागली, म्हणून एकनाथस्वामी अवतरले. त्याच प्रमाणे मोंगलाईला पादाक्रांत करणारी मराठेशाही आंग्लाईने नेस्तनाबूद केली, म्हणून त्या क्रांतीचा साखळदंड उत्क्रांतीच्या नावाला बेमालूम अडकविण्यासाठी नाना शंकरशेट उत्पन्न झाले. पण किंचित् विचारांती ही `थिअरी’ चूक आहे, असेच अखेर कबूल करणे भाग पडते. `पुरुष असे अर्थाचा दास’ हे सूत्र भीष्माचार्याने म्हटले, तरी अर्थाला लाथ मारून, आपले पौरुषत्व गुलाम न बनविता, स्वयंविहारी वायूप्रमाणे ते दाही दिशांस उधळविणारे मर्द जसे आजही आहेत, तसे खुद्द भीष्माचार्यांच्या नाकासमोरही होतेच की नाही? मग काय राहिली त्या सूत्राची किंमत? परिस्थितीचा कुसवा वीरप्रभू असता, तर हे जग गुलामांचा पांजरापोळ का बनते? परिस्थितीच्या पायात कुलंगी कुत्र्याप्रमाणे शेपटीचे गोंडे घोळायला मर्द वीर कधी तरी इच्छील काय? परिस्थितीच्या पायाचे आंगठे गुलामांनीच चुंबावे, ते मर्दाचे काम नव्हे. मर्द वीर बेशिस्त परिस्थितीला कर्तबगारीच्या हंटरचे तडाखे लगाऊन, सर्कशीतल्या खुनशी सिंहिणीप्रमाणे, शिस्तवार कसरत करायला लावतो. वेळी परिस्थिती तुफान होऊन गुरकाऊ लागली तरी खरा वीर आपले पुढे टाकलेले पाऊल रेसभरही मागे न घेता, कधी चुचकारून तर कधी दरडावून, तिला ठरलेल्य कसरतीची गोलांटी उडी मारायला लावतोच लावतो; पण तिच्या नजरेला भिडलेली नजर लवमात्रही नरमवणार नाही. नानावर राज्यक्रांतीच्या धामधुमीत राजकीय बालंटांची भयंकर संक्रांत खवळली होती; पण त्यावेळचे त्यांचे सौजन्य आणि त्यांचा सत्याग्रही बाणा पाहिला, की परिस्थितीला वीर प्रसू समजणा-यांची कीव केल्याशिवाय कोण राहील? मराठेशाहीच्या जागी अंग्रेजशाही, बाजीरावीच्या ठिकाणी अल्पिष्टणी, अहम् वयम्च्या ऐवजी यस फ्यस; केवढा भयंकर परिस्थितीचा ट्रान्स्फर सीन! पण त्यातूनही नानांनी आपल्या अद्वितीय बुद्धिबलाने अक उमेदवार प्याद्यांचे फर्जी करून, शहाणपणाची मिजास मारणा-या अंग्रेज बहादुरांना महाराष्ट्राच्या बुद्धिमतेचे पाणी पाजून गार बसवले! 000 हिंदवी स्वराज्याचा खून [ता. २९ एप्रिल १९२२ रोजी सातारा येथे श्रीशिवजयंत्युत्सव प्रसंगी श्री. ठाकरे यांनी दिलेले व्याख्यान] भगिनीबांधवहो, आज पण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहो. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र आणि स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मराठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतक-यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षाही सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात असा मंगल प्रसंगी `शिवरायास आठवावे’ या विषयानुरुप शिवचरित्राबद्दल मी काही विवेचन करावे, अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाही उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारीत बसून मी साता-याकडे येऊ लागताच माझा तो बेत बदलला. शिवरायास आठवता आठवता सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतचक्षुसमोर भराभर फिरू लागला; आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्य द्रोही राजधानीत मी येऊन दाखल होताच, शिवाजीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसू लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला साता-याचा अभिमान असणे योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची –हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साता-यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीने या साता-यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हलवणारा, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकाप उडविणा-या हिंदवी स्वराज्याचे रक्त या साता-याच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायाचे गुणगायन करण्यापेक्षा, आमचे हिंदवीस्वराज्य का नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साता-यात पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधाराने विचार केला, तर सध्याच्या