स्वाध्याय संदेश: Page 7 of 74

अखिल मानव दुनियेचे हात भराभर वर व्हायला अवधी का लागणार आहे? जगातील इतर धर्मपंथांचा पाया उपयुक्ततावाद (Utility) वर सजविलेला आहे. जनता निष्क्रीय झाली म्हणून एका महात्म्याने कर्मयागाचा संदेश दिला, पण ज्ञान व भक्तीकडे पाहिले नाही. दुस-या महात्म्याने ज्ञानाचा संदेश जगाला सांगितले, पण भक्तिचा ओलावा आणि कर्माचा कणखरपणा यांचा समन्वय केला नाही. तिस-या महात्म्याने भक्तिचा कर्णा फुंकून सा-या जगाला बेभान नाचावयास लाविले, पण त्याचे कर्म व ज्ञान हे दोन डोळेच फोडून टाकले. याचा परिणाम असा होत गेला व अजूनही होत आहे की जनता कधी शुद्ध अध्यात्मवादी, कधी कणखर अर्थवादी व धर्मलंड, कधी केवळ वावदूक ज्ञानी परंतु शुष्कहृदयी, तर कधी `हे खरे का ते खरे’ असल्या अनिश्चित संशयवादात गुरफटलेली, कधी संन्यासी तर कधी संसारी, कधी विचारी तर कधी विकारी. याचे कारण त्या त्या पंथप्रवर्तक महात्म्याचा (युटिलिटॅरियन) उपयुक्ततावादी बाणा व धोरणाची एकांगी वाढ हे होय. परंतु श्रीकृष्णाचे गीतेत प्रतिबिंबित झालेले चारित्र्य, त्याच्या आचाराची व विचाराची परस्पर-संवादी एकतानता आणि मानवी जीवनाच्या उत्क्रांतीच्या नानाविध पाय-या क्रमवार आखून देण्याची त्याच्या तत्त्वज्ञानाची नानारंगी पण एकजिनसी धाटणी, नीट काळजीपूर्वक स्वाध्यायात घेतली म्हणजे, भक्तियोगाच्या ओलसर क्षेत्रात, कमी योगाची दणकट लागवड करून, ज्ञानयोगाच्या सर्वस्पर्शी जीवनाने, मानवांच्या सर्वांगीण उत्क्रांतीचा मळा चौफेर एकजात एकसारखा पिकविण्याची त्या भगवंताची योगकुशलता, आचरट अहंमन्यांशिवाय, वाटेल त्या विवेकी मुमुक्षूला संशयछिन्न केल्याशिवाय खास राहणार नाही. श्रीकृष्णाचे चारित्र्य एकांगी नव्हे, अनेकांगी आहे. गीतेचे तत्त्वज्ञान संसा-याला व संन्याशाला, अर्थवाद्याला व ज्ञान्याला, धार्मिकाला व राजकारण पंडिताला, जाणत्याला व नेणत्याला, सर्वांत पद्धतशीर समभावाने उत्क्रांतीचा मार्ग बिनचूक दाखविणारे सनातन होकायंत्र आहे. श्रीकृष्णाला पूर्णावतार व पुरुषोत्तम म्हणतात का, याचे कोडे उलगडू पाहणारांनी प्रथम या गीता-होकायंत्राची यंत्ररचना उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना सांगून ठेवलेला संदेश आज आपण कृष्णजयंतीच्या उत्सवकाली विचारात घेऊन आचारात उमटविला पाहिजे. कृष्ण भगवंताच्या जगद्गुरुत्वाची आज जगाला जरूर आहे. चालू जगातली सामाजिक, धार्मिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय प्रमेयांची अनेक खट्याळ खेकटी सुव्यवस्थित उत्क्रांतीच्या मार्गावर आणण्यासाठी श्रीकृष्ण सर्व अनुयायांना हाक मारून संदेश देत आहे – क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।। हे धनुर्धारी पार्था, हा निष्क्रिय नामर्दपणा सोडून दे. छेः! माझा भक्त म्हणविण-याला हा नेभळेपणा मुळीच शोभत नाही. दे दूर झुगारून तो मनाचा कमजोरपणा आणि ऊठ दंड थोपटीत जिवंत मर्दाप्रमाणे, भारता, कसल्या भिकारीड्या क्षुद्र कल्पनांचा तू गुलाम बनला आहेस! जा. यच्चयावत् जगाच्या कोनाकोप-यांत जाऊन भिडेल इतक्या जोराने माझ्या गीतेची भक्ति-ज्ञान-कर्मप्रधान संदेशाची तुतारी फूंक. अभेदभावाने त्या माझ्या गीताज्ञानाचा सा-या मानवी दुनियेवर मुसळधार पाऊस पाड आणि जातपात, वर्णभेद, देशभेद, राष्ट्रभेद इत्यादी सर्व भेदांचा कंस ठार मारून, सर्वांना गीतारहस्याचा जाहीरनामा वाचून दाखीव. सर्व मानवजातीतीतल व्यक्तिमात्राला ठासून सांग की बाबा, तुझ्यात पाप नाही, तुझ्यात दुःख नाही, तू हतबल नाहीस; तू मर्द आहेस, तू देवांचा देव – शक्तीचा खजिना आहेस, तो तूच आहेस. ऊठ, जागा हो आणि गीतेच्या प्रकाशाने आत्मज्ञानाची ओळख करून घे. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ! प्रिय बंधुभगिनी वाचक जनहो, आज कृष्णजयंतीच्या मंगल काली हा दिव्य संदेश येता जाता दिसेल अशा ठिकाणी मोठ्या अक्षरांत लिहून ठेवा. त्याचे क्षणोक्षणी चिंतन करा म्हणजे लवकरच असा योग येईल की याच कृष्णजयंतीच्या दिवशी जगात जेथे जेथे म्हणून मानव आहे, तेथून तेथून त्याच्या तोंडून हाच जयजयकार निघेल की:- कृष्णं वन्दे जगद्गुरुम् [प्रबोधन, १६-८-२२] 000 बरोबर २९३ वर्षांपूर्वी! येक या मागणें आतां । द्यावें तें मजकारणें । तुझा तूं वाढवी राजा । शीघ्र आह्मांचि देखतां ।। दुष्ट संहारिले मागें । ऐसे उदंड ऐकतों । परंतु रोकडे काही ।