स्वाध्याय संदेश: Page 6 of 74

सवाई गीता सांगण्याचे मर्त्य मानवाचे तोंड नसले तरी, भगवद्गीतेचे रहस्य आत्मद्धारार्थ आचरणात आणताना आपले हातपाय खचित कोणी बांधणार नाही. नकला करूनच उत्सव साजरा करायचा, तर त्या नकला निदान अशी तरी कृत्यांच्या करा की जेणेकरून आत्मोद्धारातच जगद्धुदाराची गुरुकिल्ली सापडेल. आज आपल्यापुढे भागवतातील व भारतातील अशी दोन परस्पर-विरुद्ध श्रीकृष्णाची चरित्रचित्रे आहेत. यापैकी पहिले एकांगी व काल्पनिक आहे आणि दुसरे इतिहाससिद्ध असून विवेकबुद्धीला पटणारे आहे. भागवती कृष्णरित्रात भिक्षुकशाही मूर्खपणा खच्चून भरला असून, त्याच्या प्रभावाचा पाया अज्ञ जनांच्या अंधश्रद्धेवर उभारलेला आहे; तर भारतांतर्गत श्रीकृष्णचरित्रात ऐतिहासिक सत्याचे उज्वल तेज अपरंपार झळकत असून, त्याची उभारणी विवेकमान्यतेच्या न्यायनिष्ठूर पायावर झालेली आहे. भागवत ही कादंबरी आहे व भारत हा इतिहास आहे. कादंब-या काल्पनिक अतएव असत्य असतात, इतिहास तपशील-शुद्ध म्हणून सत्य असतो. हा एवढा भेद जर आपण विचारात घेतला तर बनावट चलनी नाण्याप्रमाणे व्यासाच्या नावाखाली दडपलेल्या बोपदेवकृत भागवत कादंबरीतील कृष्णचरित्राचा त्याग करून, कोणीही विवेकी सज्जन भारतात उमटलेल्या जगद्गुरु कृष्णाच्या चारित्र्यावर आपली विवेकपूर्ण स्वाध्यायवृत्ति खिळविल्याविना खास राहणार नाही. भागवती कृष्णचरित्राने जनतेच्या अंधश्रद्धाळू भावनाप्रधान वृत्तीचा भरपूर फायदा घेऊन, भारतवासियांना पुरुषोत्तम श्रीकृष्माच्या ख-या चारित्र्याला सर्वस्वी पारखे केले आहे. या मुद्याकडे आता किती दिवस श्रीकृष्णभक्त डोळेझांक करणार? श्रीकृष्णाला पूर्णावतार मानतात. त्याला पुरुषोत्तम (Superman) म्हणतात. व्यासासारखे महर्षि त्याला जगद्गुरु असे संबोधून, कृष्णं वन्दे जगद्गुरुम म्हणून प्रणाम ठोकतात. हिंदुस्थान स्वत्वपराङ्गमुख झाला. स्वातंत्र्यातून पारदर्शक गुलामगिरीत अवनत झाला. राजकीय अधःपाताच्या जोडीने त्याच्या समाजघटनेच्या राईपेक्षाही क्षुद्र वृत्तीच्या परकीयांनी त्याच्या विपर्यासावर आपल्या विद्वत्तेची कंडु शमवून घेतली. इतके झाले तरी पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे जगद्गुरुत्व आजदिनतागायत एकजात विवेकी दुनियेने मान्य करावे; त्याच्या भगवद्गीतेची पारायणे गेल्या महायुद्धप्रसंगी फ्रान्सच्या समरभूमीवर अनेक इंग्रज, फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन लढवय्यांनी करून, आपल्या चित्ताला प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त करून द्यावा, आणि हजारो चिकित्सक पाश्चिमात्य विवेवकवाद्यांनी सर्व धर्मपंथांचा तुलनात्मक अभ्यास करून, अखेर आमूलाग्र गीतावादी बनावे; हा चमत्कार सर्व हिंदुंनी विचार करण्यासारखा आहे. आजला जगद्गुरु श्रीकृष्णाची गीता जगातील बहुतेक प्रगल्भ भाषांचे लेणे लेवून नऊखंड दुनियेच्या हृदयाला, गूढ तत्त्वरहस्याच्या निश्चित निर्णयाने, शांत करीत आहे. फ्रान्सातले फ्रेंचजन आज फ्रेंच भाषेत गीतेचे अध्ययन करीत आहेत जर्मनीतले जर्मन आज श्रीकृष्णाच्या गीतामुरलीचे सनातन मंजुल ध्वनी जर्मन भाषेत ऐकून आनंदाने डुलत आहेत. डॅन्टेच्या चिरंजीव काव्यववाणीने सालंकृता झालेल्या इटालियन वाग्देवीलाही, भगवद्गीतेने आपल्या अनुपमेय तत्त्वज्ञानाचे पैंजण तोड अर्पण करून, जीवशिवाच्या अभेद भावाची गाणी गात नाचावयास लाविले आहे. सा-या जगाला पुरून उरणा-या इंग्रजी भाषेच्या द्वारे श्रीकृष्ण जगद्गुरुंचा गीता-संदेश आज `पृथिव्यां सर्वमानवा’ची खासगत जहागीर होऊन बसला आहे. या सर्व दिग्विजयाचे श्रेय जर कोणाला असेल तर ते `जगद्गुरु’ म्हणून मिरवणा-या पुडीबहाद्दर मुंडितशीर्ष भिक्षुकप्रणींना नसून, थिऑसॉफिकल सोसायटी व कृष्णभक्त मिसेस आनी बेझंट यांच्याकडेच ते बिनचूक जाते, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करणे प्रबोधनाचे कर्तव्य आहे. जगद्गुरु श्रीकृष्णाच्या गीतारहस्याच्या बिनीच्या भगव्या जरतारी झेंड्याने आज सर्व विवेकी दुनिया काबीज केली आहे. अल्पसंख्य विवेकी दुनिया हस्तगत करण्याचेचकार्य मोठे कठीण. बहुसंख्य अविवेकी दुनियेचे पेंढार कितीही अफाट पसरलेले असले, तरी सच्चा रणशूर शिपाई त्याची केव्हाही क्षिति बाळगीत नाही. रानामोळ भटकणा-या शेकडो क्षुद्र कोल्ह्यांकडे दुर्लक्ष करून मर्द शिकारी एका वाघासाठीच आपल्या तिरंदाजीचा रोख सांभाळून जंगल तुडवीत असतो. बाजारबुणग्यांची पर्वा बाजारबुणग्यांनी करावी. जगज्जेता वीर आपल्या सामन्याच्या समतोल वीराला एकाच सरसंधानाने घायाळ करून चुटकीसरसा त्याच्या साम्राज्याच्या अधिपती बनतो. श्रीकृष्णाच्या कर्मज्ञानभक्तिप्रधान गीतेने याच धोरणाने आजही सारी दुनिया पादाक्रांत केली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. बिनीच्या भगव्या जरतारी झेंड्याने पुढचा मार्ग तर छान चोखाळून ठेवला आहे. आता कृष्णानुयायी भारतीयांनी एकच लगट करून त्या मार्गावर धडाडीची चाल केली, तर कृष्णं वन्दे जगद्गुरुम् या उच्चारासरसे श्रीकृष्ण भगवंताला प्रणिपात करम्यासाठी