स्वाध्याय संदेश: Page 5 of 74

`जो जो जो जोरे’ करण्याची महापर्वणी साधून घेऊ, म्हणून आबालवृद्ध स्त्रीपुरुष, हरिदासाच्या मुखगंगेतून स्रवणारा एकेक शब्द कानांच्या ओंजळीत झेलण्यासाठी आतुरचित्त स्तब्ध बसले आहेत. उघडाउघड ही सारी नक्कल, शुद्ध नाटकातली बनावट, कल्पनेलाही थांग न लागणा-या अशा प्राचीनतम इतिहासाची नुसती बतावणी. पण काय चमत्कार आहे पहा! या कृष्णजयंतीच्या प्रसंगी ते हजारो वर्षांचे जाडजूड कालपटल भक्तांच्या भावनेचा उदय होताच धुक्याप्रमाणे वितळून नष्ट होते आणि वर्तमान मानवांच्या मनोवृत्तीचा दुव्वा कृष्णजन्माच्या आद्य दिवसाला बेछूट भिडून, दुनियेच्या जागत्याज्योत भावनेच्या मुर्वतीसाठी, भूतकाळच वर्तमानकाळाचे लेणे पांघरून दरसाल उभा ठाकतो! एकूण भावनेचा पराक्रम विलक्षण खरा. पीतांबराचे गुंडाळे करून त्याचा बनविलेला बाळकृष्ण तो काय, पण त्यालाच पाळण्यात घालून हरिदास झोके घालू लागले व मधुर संगीताच्या गायनात `बाळा जो जो रे’ हे गीत गाऊन त्याला आळवू लागले की देवळाच्या एका अंधे-या अडचणीच्या जागेत दाटी करून बसलेल्या आमच्या मातांची, आमच्या भगिनींची चित्तवृत्ती किती उचंबळून येते बरे! स्त्रीजात म्हणजे मातृवत्सल्याचा जिवंत झरा. वयाच्या कमी अधिक प्रमाणानुसार हा झरा सूक्ष्म किंवा प्रौढ झालेला असतो. अर्थात या वेळी त्यांची मुखश्री प्रसन्नतेने डवरते. त्यांची काया पुत्रवात्सल्याने रोमांचित होते. श्रीकृष्ण-भक्तीचा सारा ठेवा त्यांच्या डोळ्यात एकवटतो व पाळण्याच्या प्रत्येक येरझारीबरोबर त्यातला एकेक बिंदु त्यांच्या गालावर टिबकतो. हा प्रकार शेकडो वर्षें दरसाल नियमित चालला आहे. वर्षातून एक दिवस भक्तीच्या भावनेला कढ येतो व उत्सव-समाप्तीबरोबरच तो थंड होतो. सांप्रतची कृष्णजयंती शुद्ध कवायती आहे. त्यात भावनावश अज्ञ जनतेला किंचित काळ जरी उदात्त अशा जीवशिवाच्या साधर्म्याची चुणूक भासते, तरी मानवजातीच्या उत्क्रान्तीसाठी व राष्ट्रधर्माच्या प्रगल्भतेसाठी श्रीकृष्ण भगवंताने धर्मवीर, राष्ट्रवीर आणि पुरुषोत्तम नरवीर अशा तीन निरनिराळ्या भूमिका स्वतःच्या चारित्र्यांत केंद्रीभूत करून धार्मिक, राजकीय आणि सामाजिक बाबतीत, अखिल मानव जातीचे-जगाचे-जगद्गुरुत्व केवढ्या अढळ यशस्वितेने मिळविले, याचा मात्र या उत्सवप्रसंगी कोणी फारसा विचार करीत नाही. पुराणकारांनी आपल्या काव्यमय मेंदूतून प्रसविलेल्या भागवतातील श्रीकृष्णचरित्राच्या अतिशयोक्तीपूर्ण बाललीला व यौवनक्रीडा आमच्या पचनी जशा लवकर पडतात, तशी त्या पुरुषोत्तमाची भारतांतर्गत इतिहाससिद्ध राष्ट्रसेवा किंवा त्या जगद्गुरुची गीता-प्रतिपादित प्रबोधनाची दिव्य कामगिरी आमच्या गळी उतरण्याची मारामार पडते. या दिशेने कोणी प्रयत्नच करीत नाही. आजकालचे हरिदास म्हणजे शुद्ध नर्मदेचे गोटे किंवा ठराविक परंपरेच्या मार्गातले धोटे. मोटेच्या बैलांप्रमाणे पुढे मागे हेलपाटे घालण्यापलीकडच्या अकलेची आणि त्यांची पुरी फारकत. श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर खोखोचा खेळ कसा खेळला, याचे साभिनय पोरकट प्रदर्शन करण्याऐवजी त्या आडाखेबाज मुत्सद्याने मोठमोठ्या मी मी म्हणणा-या राजकारणपटूंच्या स्वार्थी डावपेचांवर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा मात करून खो खो कसा घातला, हे या हरिदासांनी का सांगू नये? रासक्रीडेतील किंवा जलक्रीडेतील गोपिकांच्या नग्न विहाराच्या घाणेरड्या काल्पनिक गोष्टी रंगवून सांगताना, स्वतःच्या मनोवृत्तीला बीभत्स विकारांच्या खाते-यात चुबकण्यापेक्षा, गीतेतील भक्तियोगाच्या रहस्याची निरनिराळी प्रमेये हे रंगेल हरिदास जर श्रोत्यांच्या मनाव बिंबविण्याचा यत्न करतील, तर कोणी त्यांच्या जिभेस डाग का देणार आहे? उत्सवप्रसंगी मुद्दाम जमलेल्या काही खेळाडूंकडून दसपदरी गोफ विणण्याचा धांगडधिंगा करण्यापेक्षा, भगवंताने आपल्या गीतेत भक्ति, ज्ञान आणि कर्म या तीन योगांचा केलेला राष्ट्रोद्धारक संयोग श्रोत्यांना हरिदासाने नीट उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला, तर त्या टाळकुट्याला कोणी फासावर का लटकविणार हे हातातल्या टाळाने किंवा टिपरीने, छटाकभर दही आणि गाडगाभर पाणी भरलेली, दहीहंडी फोडून त्या खाली मुलांना नाचविण्याचा नाचरा प्रकार बंद करून, त्या ऐवजी कुकल्पनेची हंडी फोडून निश्चित तत्त्वनिर्णयाचा दुग्धवर्षाव श्रीकृष्णप्रभूने सा-या पृथ्वीवर कसा पाडला, याची विवेकशुद्ध माहिती हरिदास आपल्या श्रोत्यांना सांगण्याचा प्रघात पाडतील, तर त्यांचे कोणी डोके का फोडणार आहे? श्रीकृष्णाने केल्या म्हणून सांगण्यात येणा-या कृतीच्या नकला करण्यातच जयंत्युत्सवाचे सारसर्वस्व मानणा-यांना भगवंताच्या भारतग्रथित अनेक पराक्रमांच्या नकला करण्याची छाती का बरे होऊ नये? भगवंताने जगाच्या उद्धारार्थ गीता सांगितली, तशी दुसरी एखादी