स्वाध्याय संदेश: Page 3 of 74

पडतो. पण काही पत्रे, चिटोरी टिपणे वगैरे ललितवाङ्मय पदवीला पावलेली आहेत, म्हणून अशा प्रकारचे सर्वांचे लिहिणे ललितवाङ्मय होऊ शकते, असे मात्र नव्हे. जुन्या सर्व कागदपत्रांना ललितवाङ्मय मानणारांची येथेच चुकी होते. असो. प्रत्येक देशांत प्रथमतः निर्माण होणारे ललितवाङ्मय प्रायः पद्यरूप असते. कारण पद्य हे तालसुरावर म्हणता येते. अर्थात ते संगीत कलेत अन्तर्भूत होते. म्हणूनच ललितवाङ्मय म्हणजे कविता, पद्य किंवा काव्य असा समज होतो. पण पद्य हे ललित वाङ्मयाचे आवश्यक अंग आहे असे नाही. नव्हे, देशाच्या व भाषेच्या प्रगतीबरोबर गद्याचा प्रचार चालू होतो व काले करून पद्यापेक्षा गद्याचा प्रसार जास्त होतो. तेव्हा ललितवाङ्मयाचे पद्य व गद्य असे वर्गीकरण करणे बरोबर नाही. कारण अमरकोशासारखे पद्य ललितवाङ्मय अगर काव्य या रूपाप्रत पावत नाही; किवा शास्त्रीय ज्ञानाकरिता लिहिलेले गद्यही काव्य या पदवीस पावत नाही. ललितवाङ्मयाचा आत्मा म्हणजे सौंदर्याविष्करण होय. मग ते आविष्करण पद्यरूपाने झालेले असो की गद्यरूपाने झालेले असो. या ललित वाङ्मयाचे सामान्यतः पाच वर्ग करतात. पहिला प्रकार कविता, दुसरा प्रकार नाटके, तिसरा प्रकार कादंब-या, चवथा प्रकार छोट्या गोष्टी व रूपके आणि पांचवा प्रकार निबंध. मराठीतील निबंध शब्द मात्र संदिग्ध आहे. निबंध म्हणजे लहान आटोपशीर लेख. पण तो शास्त्रीयही असेल किंवा ललितवाङ्मयात्मक ही असेल. ललितवाङ्मयाच्या पाचव्या प्रकारातून अर्थात शास्त्रीय निबंध वगळले पाहिजेत. प्रबोधनकार रा. ठाकरे यांचे `स्वाध्याय-संदेश’ या नावने प्रसिद्ध होणारे निवडक निबंध ललितवाङ्मयाच्या पाचव्या प्रकारचे आहेत. हे निबंध एकंदर एकवीस बावीस आहेत. यापैकी निम्मे अधिक ऐतिहासिक-महाराष्ट्रैतिहासिक आहेत. पण ते ऐतिहासिक सत्य सांगण्याच्या बुद्धीने किंवा ऐतिहासिक सत्यान्वेषण बुद्धीने लिहिलेले नाहीत. काही निबंध तात्विक विषयावर हेत, पण ते तत्वान्वेषण बुद्धीने लिहिलेले नाहीत. काही निबंध क्षणिक तात्कालिक प्रसंगासंबंधी आहेत, पण तेथेही तात्कालिक वर्णनावर भर नाही. या सर्व निबंधांना एकत्र करणारे सूत्र म्हणजे ठाकरे यांच्या धार्मिक सामाजिक भावना होत. ते समाजाच्या प्रत्येक बाबीसंबंधी `नवमतवादी’ आहेत. त्यांना जुने भिक्षुकशाहीचे बंड मोडावयाचे आहे; त्यांना जातिनिर्बंध शिथिल करावयाचे आहेत; त्यांना आचारविधीचे वर्चस्व नाहीसे करावयाचे आहे; त्यांना समाजाचे गतानुतिकत्व घालवून टाकावयाचे आहे. नव्याजुन्याच्या कलहात नव्याचा पक्ष स्वीकारून त्यांना समाजामध्ये नव्याची आवड उत्पन्न करावयाची आहे. सारांश रा. ठाकरे हे समाजाच्या सर्वांगीण सुधारणेचे भक्त आहेत व ही समाजसुधारणा-भक्तिरूपी भावना तरुण पिढीत उद्दीपित करण्याचे त्यांच्या निबंधाचे ध्येय आहे. त्यांचे हे सर्व लेख भावनाप्रधान आहेत. त्यात जुन्या मतावर व जुन्या मताभिमान्यांवर मर्मभेदी कडक टीका आहे. त्यात नव्या मतांचा जोराचा व जोरदार भाषेत पुरस्कार केलेला आहे. त्यात ऐतिहासिक प्रसंगांच्या अनुषंगाने देशप्रीतीची ज्योत जनमनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अल्पसंतोषी निवृत्ती मार्गाचा निषेध करून, महत्त्वाकांक्षी प्रवृतिपरतेची दवंडी पिटविली आहे. तात्पर्य, हल्ली आपल्या समाजस्थितीत ज्या ज्या भावनांची व ज्या ज्या उच्च मनोवृत्तीची आपल्याला जरूर आहे, त्या त्या भावना व त्या त्या उच्च मनोवृत्ती तरुणतरुणीच्या अंतःकरणात उद्भुत व्हाव्या, अशा धोरणाने रा. ठाकरे यांनी आपल्या निबंधांची रचना केली आहे व ती रचना बरीच यशस्वी आहे, यात शंका नाही. प्रायः कवितेत दुग्गोचर होणारे रूपक, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष इत्यादि अर्थालंकार व शब्दालंकार गद्य वाङ्मयात खच्चून भरण्याचा संप्रदाय कै. गडक-यांनी घातला. विशेषतः अनुप्रासमय गद्य लिहिण्याची हातोटी गडक-यांना उत्तम साधली होती. हा गद्यप्रकार चमत्कृतिजनक असल्यामुळे त्याची गोडी जनमनाला फार लागलेली दिसते. यामुळे या गेल्या दहा वर्षांत असले गद्य लिहिण्याकडे लेखकांचा फार ओढा दिसून येतो. गडक-यांच्या या विशेषाचे जिकडे तिकडे अनुकरण होऊ लागले आहे व ठाकरे यांनी या निबंधात असा प्रयत्न पुष्कळ ठिकाणी केलेला आहे. पण या बाबतीत लेखकाची अतिशयतेकडे प्रवृत्ति होण्याचा संभव आहे. असे झाले असता भाषापद्धतीला कृत्रिमपणा जास्त येतो व मग पुष्कळ ठिकाणी अर्थहानि होते.