स्वाध्याय संदेश: Page 15 of 74

पुनश्च धुमसू लागेल. त्याच्या प्रज्वलित ज्वालांनी नामधारी देशभक्तांच्या धांगडधिंग्यांची राखरांगोळी होऊन, दांभिक राजकारणी धर्ममार्तंडांच्या शिरजोरपणाच्या ठिक-या ठिक-या उडतील. शिवाजी आला, आता महाराष्ट्रधर्माचा प्रतापसूर्य हिंदुस्थानावर पुनश्च प्रखर तळपू लागणार, या नुसत्या कल्पनेनेच आकाशातल्या बापाच्या एकुलत्या एका पोराने निर्माण केलेला `कुरुस’ बर्फाप्रमाणे वितळू लागले आणि तरवारीच्या जोरावर मोक्षप्राप्तीचा सौदा सवंग करणा-या इस्लामाच्या चांदता-याला अमावास्येची धडकी भरेल. या कविकल्पना नव्हत. ही इतिहासाची छातीठोक जबानी आहे. बखरकारांनो, `शिवाज आला’ हा मंत्र बोलताना किंवा लिहिताना त्याच्या परिणामाचा नीट विचार करीत जा. काय म्हणता? शिवजन्माच्या वेळी शिवनेरीवर शिवजयंतीचा काहीही थाटमाट उडाला नाही? तुम्ही आंधळे आहात. माता जिजाईचे सुवीणपण करायला खुद्द महाराष्ट्राची नियतिदेवी तेथे हजर होती. हातीपायी सुटका होताच बाळबाळंतिणीला पंचारती ओवाळण्याचा मान पांडवपत्नी देवी द्रौपदीने मिळविला. बाल शिवाजीचे नाळवार कापण्याचे पुण्यकर्म श्रीरामाच्या कौसल्या मातेने केले व मुलाच्या जिव्हेवर अमृताचे बिंदु घालण्याचे कार्य प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंताने केले. पुत्रजन्माच्या घटकेला शहाजी राजे हजर नसल्यामुळे लौकिकी तोफांची सरबत्ती जरी झडली नाही, तरी महाराष्ट्राचा स्वातंत्र्यरवि शिवनेरीच्या क्षितिजावर उदयोन्मुख होताच, सह्याद्रीच्या कोट्यवधी कडेकपाटांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून त्रिभुवनाच्या कानठळ्या बसवून टाकिल्या आणि त्या कडकडाटातून उत्पन्न झालेल्या प्रभंजनाने सा-या महाराष्ट्राच्या अणुरेणूत नवचैतन्याचा फुंकर घालून जिवंत करण्याची कामगिरी मोठ्या सोसाट्यात बजावली. जड सृष्टीत वावरणा-या व जड सृष्टीतील उलाढालीचेच निरूपण करणा-या बखरकरांना, अचेतन घडामोडींच्या पडद्यामागे धमधमणा-या चैतन्याची कल्पना होणार ती कशी!! शिवरायास आठवावे! होय. आठवावे म्हणजे काय? नुसते नामस्मरण करावे? शिव शिव शिव शिव किंवा शिवाजी शिवाजी म्हणून गोमुखीत हात घालून माळ ओढायची काय नव्हे, स्मरणाचा हा मार्ग खोटा आहे. ढोंगी आहे. माळेचे मणी ओढून आजपर्यंत एकही प्राणी मोक्षाला समर्थ झाला नाही. शिवाजीचे स्मरण नीट पद्धतशीर झाले की स्वराज्य आपल्या मुठीत आले, हीच त्याची साक्ष व तोच त्याचा दृष्टांत. शिवरायास का आठवावे? स्वराज्य पाहिजे असेल, स्वातंत्र्य हवे असेल, राष्ट्रीय इभ्रतीचे माहात्म्य पवित्र राखण्याची इच्छा असेल, तर शिवरायास आठवावे. परंतु समर्थांच्या या सूत्राबरोबरच दुसरे एक सूत्र आहे. ते विसरून चालणार नाही. शिवरायास आठवावे. आणि पुढे काय? जीवित तृणवत् मानावे. हां, येथे मात्र खरी ग्यानोबाची मेख आहे. शिवस्मरण फलदायी केव्हा होईल? जेव्हा स्वराज्यासाठी शिवभक्त आपल्या जीवितावरसुद्धा तुळशीपत्र ठेवण्यास सिद्ध होतील तेव्हा; एरवी नाही. शिवाजीचे अभिमानी भक्त मुबलक सापडतील. शिवाजीचे परमेश्वरवत् भजनपूजन करणारे भक्त हजारो आढळतील. शिवाजीच्या पुण्य नावाचा उपमर्द करणा-याचा कण्ठनाळ दातांनी काडकन् फोडणारे जवानमर्द बरेच असतील. शिवाजी जातीचा मराठा म्हणून आज सर्व जातमात्र मराठे शिवरायाच्या नामस्मरणाने बेहोष होऊन नाचू लागतील. शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याच्या पायात अनेक कायस्थ प्रभु नरनारींनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या, म्हणून इतिहास वाचल्याची चुकती माकती पुण्याई कमविलेले काही कायस्थ (ऐन वेळी स्मरणशक्तीने दगा दिला नाहीच तर) क्षणमात्र वाडवडिलांचे गुण सांगून आपले पढतमौख्य व्यक्त करतील. परंतु आज घटकेला शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेबरहुकूम स्वराज्य निर्माण करणारे कितीक तानाजी आणि नेताजी मराठा जातीतून पुढे येतात? किती दादजी बाळजी आणि बाजी कायस्थात उत्पन्न होतात? प्रश्न सोपा आहे, उत्तर मात्र बिकट आहे. ज्या दोनच साम्राज्यांच्या रक्ताच्या सिमेंटावर शिवरायाने आपल्या हिंदवी स्वराज्याची त्रिखंडव्यापी इमारत बोलबोलता उठविली, ते कायस्थ, मराठा समाज आज कोणत्या स्थितीत आहेत? दोघेही कर्मन्यायाने मानसिक दास्यात इडकलेले आहेत. शिवपूर्वकाली ते मुसलमानांच्या राजकीय गुलामगिरीत कुजत होते. ते निरनिराळ्या शाह्यांच्या सुलतानी नोकरीवर मिळणा-या हाडकांवर बहोत खुष राहणारे नोकरमाने कुत्रे होते. परंतु त्यांचे मन मेलेले नव्हते. म्हणूनच शिवाजीचा स्वराज्यस्थापनेचा कर्णा कानी पडताच ते मधमाशांच्या झुंडीप्रमाणे भराभर धावत आले. परंतु आजला हे दोनही समाज मन मेल्यामुळे असून नसून सारखे झाले आहेत. पैकी मराठा समाजाच्या खुरटलेल्या खोडाला नव्या मनुतील मराठ्यांची पालवी तरी फुटत आहे;