स्वाध्याय संदेश: Page 14 of 74

प्रतापगडची भवानी ती हीच. शहाजीराजांना अटकेत ठेवून राजकारणाच्या व्यभिचारी आडाख्यात शिवबाचे नाक दाबून तोंड उघडण्याचे कारस्थान रचणा-या विजापूर दरबारच्या मिंध्या शेंदाड मराठ्यांच्या पेचावर, स्वराज्यासाठी कौटुंबिक माया-मोहाचा होम करून, उलट्या पेचाची मेख मारण्याची अक्कल शिवाजीला कोणी शिकवली? याच देवतेने. हिंदुंच्या प्राचीन वैभवाचा चित्रपट शिवाजीसारख्या आपल्या अनन्य भक्ताच्या डोळ्यांपुढे भरभर फिरवून, त्याच्या रोमारोमात हिंदवी स्वराज्यवैभवाची कल्पना बिजलीप्रमाणे सणाणत कोणी ठेविली? हिनेच. या राष्ट्रवीराने जिजामाउलीच्या पुण्योदरातून या लोकी आपल्या आगमनाची पहिलीच कोSहमची किंकाळी फोडताच, शिवनेरीच्या शिवाईच्या बेहोष तांडवनृत्याला प्राचीन इतिहासाच्या स्मरणदेवतेनेच आपल्या कालिकानौबदीच्या दणदणाटाची साथ देऊन `हिंदवी स्वराज्यकर्ता राष्ट्रवीर जन्माला आला. महाराष्ट्रा भिऊ नकोस. तुझा महात्मा अवतरला!’ असा सा-या त्रिभुवनात डंका पिटला. अहाहा! श्रीशिवजयंतीचा केवढा तो महोत्सव. राष्ट्रवैभवाचे केवढे विश्वव्यापी विराट स्वरूप या दिवशी शिवनेरीवर संकलित झाले होते. स्मणशक्तीलाही मोजदाद करता त्रेधा उडाली, असे कितितरी असंख्य नरनारीजन या दिवशी शिवबालाचे दर्शन घेण्याकरिता शिवनेरीला जमले होते. नाना त-हेच्या कितीतरी वाद्यवाजंत्र्यांनी या दिवशी सारी चौखंड पृथ्वी दणाणून सोडली होती. बिचा-या जिजामाउलीला प्रत्येक पाहुण्याच्या प्रणिपाताला प्रतिप्रणिपात करता करता नकोनकोसे झाले होते आणि सवाष्णींनी भरलेल्या मंगल आहेरांच्या ओट्या देता घेता बिचारीचा प्राण कंठी आला होता. सारा शिवनेरी शिवभक्तांनी नुसता गजबजून गेला होता. पण या बेट्या बखरकारांची जबानी पहा. यांची डोकी व अंतःकरणे काय लाकडाची असतात की काय कोण जाणे! म्हणे `जिजाईला शहाजी राजांनी एकटी टाकल्यामुळे ती शिवनेरीच्या आश्रयाला गेली. तेथे ती बाळंत होऊन तिला शिवाजी नावाचा मुलगा झाला.’ झाSला यांचा इतिहास! थुःत् लेकाच्यानो तुमच्या जिनगानीवर. ही काय बखर, इतिहास, का तुमचे डोंबल? `शिवाजी जन्माला आला’ या उद्गारात केवढी शक्ती भरलेली आहे, याची जाणीव या बखरकारांना कोठली असणार! घडलेल्या गोष्टी शब्दांत मांडल्या की झाले यांचे काम. `शिवाजी जन्माला आला’ या उद्गारांत महाराष्ट्राचे भाग्य आहे. नवजीवन देवतेचा आत्मा आहे. महाराष्ट्रधर्माचा जिवंत अग्नि आहे. या उच्चाराची पारायणे करताच मूर्तिमंत शिवाजी महाराज आपल्यापुढे दत्त म्हणून उभे ठाकतील. जुन्यापुराण्या गोष्टी जाऊ द्या; या विसाव्या शतकात, ब्रिटिश रियासतीत, स्वराज्याच्या उषःकाळी, गुलामगिरीच्या आपत्तीचा जहरी प्याला काठोकाठ भरला असता, स्वातंत्र्याच्या जहानेने महाराष्ट्राचा घसा कोरडा पडला असता, शिवाजी जन्माला आला या बातमीचा मंत्र सह्याद्रीपासून विंध्याद्रीपर्यंत गोफणीच्या गोट्याप्रमाणे भिंगरीसरसा रोंरावत जाऊ द्या आणि पहा त्याचा काय परिणाम होतो तो! बखरकरांनो, खुद्द धारातीर्थी मरण पावलेल्या योद्ध्यांच्या रक्तात आपल्या बहाद्दर लेखण्या बुचकळून तुम्ही जरी मोठमोठ्या महायुद्धांचे इतिहास खरडलेत, तरी `शिवाजी’ या नुसत्या नामोच्चाराने राष्ट्रात जे शौर्यचैतन्य निर्माण होईल, त्याच्या कोट्यंशाने तुमच्या खरडेघाशीला ते साधणार नाही. `शिवाजी जन्माला आला’ हा मंत्रसंदेश महाराष्ट्राच्या, नव्हे, सबंध हिंदुस्थानच्या, वातावरणात घुमत घुमत जाऊ द्या-आता, आज, या विसाव्या शतकात, माँडफर्ड रिफॉर्म्सच्या युगात, खादीकाळात, गांधी महात्म्य हंगामात – भिंगरीप्रमाणे गुं गुं करीत जाऊ द्या, असा चमत्कार होईल की, `शिवाजी’ या शिव मंत्रापुढे तुमच्या त्या रिफ़र्म्सचे धुके वितळून जाईल; अत्याचार बरा की अनत्याचार बरा या वादाच्या किसण्या मसणाची वाट धरतील; खादी वापरून स्वराज्य मिळेल की गादीवर लोळतो लोळता अवचित ते उरावर येऊन बसेल, याचा काथ्याकूट करणारे चातुर्मासे पंडित भेदरून कोनाकोप-यात छपतील. `शिवाजी आला’ ही शिववार्ता कानी पडताच आमच्या गोमाता कान टवकारून स्वागताचा हंबरा फोडीत, शिवाजी कोठून येतो हे पाहण्यासाठी दाही दिशांकडे काव-याबव-या पाहू लागतील. महाराष्ट्रातल्या पडीत किल्ल्यांचे बुरुज आपल्या प्राणांचा प्राण पुन्हा येणार म्हणून आकाशाला भिडे इतकी आपली मान उंच करतील. ब्रिटीश रियासतीच्या सुधारलेल्या अमदानीत अन्नपाण्याला मोताद होऊन पाठीला पोट लागलेल्या शेतक-यांच्या कच्च्याबच्च्यांतून तानाजी, नेताजी, येसाजी निर्माण होतील. भिक्षुकशाहीने शूद्र ठरविलेल्या मराठ्यांचा क्षत्रिय बाणा भिक्षुकशाहीला नेस्तनाबूद करून सा-या हिंदुस्थखानाला पुरून उरेल. राष्ट्रीय गुंडांच्या स्वार्थी खटपटीच्या उकिरड्याखाली गाडलेल्या महाराष्ट्रधर्माच्या स्फुल्लिंग