स्वाध्याय संदेश: Page 13 of 74

चमकत होती. बुद्धदेवाच्या नवमतवादी प्रचंड चळवळीने भिक्षुकशाहीचे वर्चस्व सर्वस्वी जमीनदोस्त झाले व त्यामुळे बुद्धदेवावर भिक्षुकशाही जळफळाट करू लागली, हे खरे; परंतु ज्या वेदप्रणीत धर्माच्या प्रतिनिधत्वाची ऐट भिक्षुकशाही मारीत असे त्याच धर्माचे शुद्ध स्वरूप बुद्धदेवाने सर्वत्र प्रसृत केल्यामुळे ब्राह्मणांना आपली बाजू सावरता सावरता नकोसे झाले. बुद्धदेवाने वेदप्रणीत कल्पनांच्या आधारावर आर्यसंघाची व्यापक धोरणावर पुनर्घटना केली आणि कालमानाला अनुसरून धर्माचे द्वार सर्वांना अभेदभावाने मुक्त सोडले. शुद्ध आचारविचारांची महती धर्माप्रमाणे राजकारणाच्या क्षेत्रांत त्याने विशेष प्रतिपादन केल्यामुळे राष्ट्राच्या जीवनात अध्यात्माच्या जोडीने अर्थवादही थरथरला. तत्त्वज्ञानाच्या शुष्क अवडंबरापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग राष्ट्राच्या चारित्र्यात केल्यामुळे राष्ट्राच्या भाग्योदयाचा प्रवास भराभर होत गेला. बुद्धदेव आमचे आहेत. त्यांची धर्मतत्त्वे आमची आहेत. कालविपर्यासामुळे आम्ही आजवर बुद्धदेवाला विसरलो होतो. आज त्यांची आम्हाला आठवण झाली. हिंदुस्थान बुद्धदेवांचा आहे, बुद्धदेव हिंदुस्थानचे आहेत. ते हिंदू राष्ट्राला कसे विसरतील? आपल्या एकदेशियत्वाची कोंडी फोडून हिंदुस्थान आशिया खंडातील बुद्धानुयायी राष्ट्रांशी सहकारिता करील तर, `एशियन्स नेशन्स लीग’सारख्या प्रचंड पराक्रमी संघ निर्माण होऊन त्याच्या द्वारे बुद्धदेवांची मिशनरी चळवळ सा-या जगाला पुन्श्च पादाक्रांत करून हिंदू धर्माला जगाचे जगद्गुरुपद प्राप्त व्हायला उशीर लागणार नाही. बुद्धदेवा, लवकर या. [प्रबोधन १-६-२२] 000 शिवरायास आठवावे आज श्रीशिवरायाचा जन्मदिवस. आम्हा मराठ्यांचा अत्यंत मंगळ दिवस. सायन निरयण पंचागवादाच्या धुमश्चक्रीत हिंदूचे सगळे सण जरी फाल्गुन पौर्णिमेच्या होळीत जळून खाक जाले तरी खुशाल होऊ द्या, पण आम्ही मानी मराठे हा श्रीशिवाजयंतीचा सण आचंद्रार्क नष्ट होऊ देणार नाही. या सणात आमच्या प्रेमाचा आत्मा आहे. या मंगल दिवसांत आमच्या भूतकालच्या वैभवाप्रमाणेच भविष्यकालीन वैभवाचे मांगल्य बीजरूपाने धगधगत आहे. या पुण्य सणात आमच्या कलम-समशेर-बहाद्दर वाडवडिलांची पुण्याई नंदादिपाप्रमाणे अखंड तेवत असून, तिच्याच कालभेदी शोधनप्रकाशाच्या (सर्चलाइट) अनुरोधाने आम्हाला भविष्यकालचे महा-राष्ट्र निर्माण करावयाचे आहे. या जयंतीत आमच्या उद्यांच्या दिग्विजयाचा गुप्त संदेश साठविलेला आहे. आमच्या भाग्योदयाची किल्ली तेथेच आहे आणि गुलामगिरीतून स्वातंत्र्यात येण्याचा महारुद्राचा मंत्रही तेथेच आहे. म्हणूनच समर्थ आपल्या समर्थ वाणीत सांगतात की, शिवरायास आठवावे. त्या पुण्यश्लोकाचे स्मरण करावे. स्मरण? नुसत्या स्मरणाने काय होणार! स्मरणाने काय होणार? काय वाटेल ते होईल. होत्याचे नव्हते होईल. स्मरणशक्ती ही एक अजब चीड आहे. मानवसृष्टीला परमेश्वराने बहाल केलेली दिव्य देणगी आहे. हिच्याच जोरावर साधुसंतांनी चिंतन करून परमेश्वराला बिनतोड हुडकून काढले. श्रीराम-कृष्ण-पांडवादिकांच्या पराक्रमाच्या स्मरणानेच बालशिवाजीची मनोभूमिका तयार झाली. त्यांच्या आपत्तींच्या चिंतनानेच तरुण शिवाजीचे हृदय तटबंदी बनले. त्यांच्या नैतिक सत्वाने शिवाजीचे बाहू फुरफुरले आणि `सत्यमेव जयते नानृतम्’ या रहस्याने त्याच्या भवानी समशेरीला पाणी चढून, तिने महाराष्ट्राच्या गुलामगिरीवर ऐश्वर्याची मिजास मारणा-या सुलतानशाहीला अखेर पाणी पाजले. स्मरणशक्तीचा पराक्रम अगाध आहे. राष्ट्राच्या इतिहासाची ही माता. काळाचे कलम आत्मतेजाच्या शाईत बुडवून मानवसृष्टीच्या हृदयफलकावर त्यांच्या भल्या बु-या भवितव्यतेचे चित्र हीच देवता रेखाटीत असते. गुलामगिरीच्या रौरव नरकात किड्याप्रमाणे लोळण्यातच जीवितसार्थक मानणा-या माणसांना त्यांच्या पूर्वसंचिताचा दिव्य संदेश सांगून, स्वातंत्र्याच्या धवलगिरीला हां हां म्हणता सर करण्याची स्फूर्ति व सामर्थ्य देणारी बिजली हीच. भर दरबारात शिष्टजनांच्या डोळ्यांसमोर साध्वी द्रौपदीच्या विटंबनेचा सूड उगवल्याखेरीज त्रैलोक्याच्या साम्राज्य-सिंहासनाचाही स्वीकार करू नकोस, असला जळजळीत मंत्र पांडवांच्या कानात फुंकून, त्यांच्या इभ्रतीच्या मर्दानी रक्ताला रटरटा रहाळ्या मारण्यास लावणारी चैतन्यशक्ती हीच. विजयनगरच्या हिंदू बादशाहीच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी दाताला दात आणि लाथेला लाथ हाणून, हिंदुचे हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याशिवाय राहू नकोस; असा सत्याग्रही कानमंत्र शिवबालकाच्या कानात फुंकणारी राष्ट्रदेवता हीच. प्रतिकारी परिस्थितीच्या बेफाम ज्वाला आंगलट चाटू लागताच, `हां, शिवबा, घाबरू नकोस. ही छिनाल माया आहे. राष्ट्राचे रक्त शोषून गलेलठ्ठ बनलेली ही शूर्पणखा आहे. श्रीरामचंद्राचा इतिहास स्मरण कर, आणि बेटा, हूं चढव भवानीचा पट्टा न् जा तिच्या छाताडावर चाल करून.’ असा धीराचा इषारा ऐनवेळी देणारी