स्वाध्याय संदेश: Page 12 of 74

जात्याच संकुचित मनोवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या कार्याचा व्याप शंकराचार्यांच्या संप्रदायाप्रमाणे गावठाण्याच्या कुंपणाइतकाच असतो आणि क्षत्रियाची मनोवृत्ती त्याच्य महत्त्वाकांक्षेप्रमाणे मोकाट दिलदार असल्यामुळे त्याच्या कार्याची पकड महात्मा बुद्धदेवाप्रमाणे सा-या पृथ्वीला कवटाळते. ब्राह्मणांचे वाचीवीर्यत्व आणि क्षत्रियांचे सव्यसाची धनुर्धारित्व इतिहासप्रसिद्ध आहे. धर्मस्थापना करावी क्षत्रियांनी आणि तिचा विध्वंस करण्याच पुण्य मात्र मिळवावे ब्राह्मणांनी. क्षत्रियांनी स्वराज्य कमवावे आणि ब्राह्मणांनी ते गमवावे, हा अनुभव तर अगदी कालपरवाचा; मात्र परंपरा फार प्राचीन काळची. गौतम बुद्धाच्या चरित्रात असा एक विशेष आहे की त्याला जगाच्या इतिहासातच दुसरी तोड नाही. एकूणएक तत्त्ववेत्त्यांची प्रवृत्ती तत्त्वशोधनाकडे वळविण्यास त्यांची आपत्ती कारण झालेली आढळते; पण गौतम बुद्ध राज्यवैभवाच्या उत्कृष्ट उत्कृष्ट सुखोपभोगात गुलाबाच्या फुलाप्रमाणे झेलला जात असता आजूबाजूला पसरलेल्या जगाच्या दुःखाने विव्हळ झाला आणि तत्त्वशोधनाकडे वळला. जगाच्या दुःखासाठी स्वतःच्या सुखावर निखारे ठेवणारा देवाचा अवतार मानण्यापेक्षा प्रत्यक्ष देवच का मानू नये? राजपुत्र असताना त्याने स्वधर्माचे शक्य तेवढे शिक्षण भिक्षुकशाही विद्वानांपासून मिळविलेच होते. पुढे सर्वसंगपरित्याग केल्यानंतर त्ये तत्कालीन पंडितांपाशी तत्त्वज्ञान व योग यांचेही ज्ञान मिळविले; परंतु त्याच काही समाधान झाले नाही व ज्या दुःस्थितीचे उच्चाटन करण्यासाठी त्याने एवढा आत्मयज्ञ केला, ते साधन तर त्याला हस्तगत होण्याची मुळीच आशा दिसेना! अखेर पंडितांच्या पोपटपंची परंपरेला आणि देह विनाकारण झिजवून आत्मज्ञानाची आशा लावणा-या हटयोगाच्या हट्टाला त्याने लाथाडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निश्चय केला. अर्थात आत्मसामर्थ्याचा जोर उत्पन्न होताच त्याला गयेस आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊन, त्याच्या नवमतवादाची योजना सिद्ध झाली व आत्मविश्वासाच्या बळावर या योजनेची मात्रा जगाच्या दुःखावर देण्याचा त्याने कृतसंकल्प केला. बुद्धदेवाच्या संप्रदायाची तत्त्वे काय होती व त्याने त्यांच्या जोरावर रुधिरप्रिय व दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीच्या कचाट्यातून आर्यधर्माचा बचाव कसा केला, याची विस्तृत माहिती येथे देणे शक्य नाही. परंतु इतके म्हटले पाहिजे की भूतदयेच्या भांडवलावर आणि सुरुवातीला फक्त पाच अनुयायी मिळवून बुद्धदेवाने आपल्या नवमतवादाचा प्रसार एवढा जबरदस्त केला की वादविवादाची एकही सरबत्ती न झाडता, त्याने थोड्या वर्षांतच भिक्षुकशाहीला चीं चीं करायला लावले. त्याने आपल्या संघाचे दरवाजे आब्राह्मणचाण्डाळांना मोकळे सोडून मानवजातीचा अभेदभावाचा एक विश्वव्यापक भ्रातृसंघ तयार केला. सर्वांना आत्मज्ञानाची मुबलक खैरात समसमान झाल्यामुळे श्रेष्ठकनिष्ठ, उच्चनीच, स्पृश्यास्पृश्य या भेदांना तात्काळ गति मिळाली व आर्यधर्माचे खरे विशुद्ध, लोकसंग्रही व उदात्त स्वरूप जगाच्या निदर्शनात आले. बौद्धधर्म हा आजला जरी निराळा धर्मपंथ असा आपणास भासतो तरी बुद्धदेवाने निराळा धर्म मुळीच काढला नाही. जुन्या धर्मावर चढलेले कुविचारांचे कीट काढून टाकले मात्र. म्हणजे बौद्धधर्म हा सुधारलेला हिंदुधर्म होय. बुद्धदेवाच्या उदार क्षत्रियवृत्तीचे त्याच्या आत्यंतिक भूतदयेत उत्तम मिश्रण झाल्यामुळे, त्याच्या संघाची तत्त्वे क्षत्रिय लोकांना तात्काळ मानवली व ते भराभर त्याचे अनुयायी झाले. वैश्यांचाही हाच प्रकार. बिचा-या शूद्रांचा व अस्पृश्यांचा आनंद काय विचारावा! त्यांना बुद्धदेव ईश्वरापेक्षाही प्रिय वाटला. क्षत्रियादी त्रैवर्णिकच बुद्धाचे अनुयायी झाले असे नव्हे, तर धर्माच्या नावाखाली होणा-या भिक्षुकशाहीच्या अत्याचारांस विटलेले आणि युद्धाचा विवेकवाद विचारान्ती पटलेले हजारो ब्राह्मणसुद्धा अखेर बुद्ध जगद्गुरुचा संघात सामील झाले. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्यांना धर्म फक्त आर्यांकरिता, इतरांकरिता नव्हे, ही जी संकुचितपणाची कोंडी भिक्षुकशाहीने निर्माण केली होती, ती कोंडी फोडून पृथ्वीवर वाटेल त्या राष्ट्रांतला, वाटेल त्या संस्कृतीचा मनुष्य, त्याची इच्छा असेल तर, आपल्या संघात बिनतक्रार समाविष्ट करून घेण्याचा मिशनरी उपक्रम प्रथम बुद्धदेवाने चालू केला आणि लोकसंग्रहाच्या या तत्त्वांच्या जोरावर पुढे त्याच्या एकनिष्ठ अनुयायांनी सारी उपलब्ध दुनिया पादाक्रान्त केली. बुद्धदेवाच्या चळवळीला धार्मिक बंड म्हणण्यापेक्षा सामाजिक बंड हेच नाव अधिक शोभते. त्याने वेदप्रणीत धर्मतत्त्वांचा निषेध केला नाही, तर त्यांचा खरा अर्थ काय आहे तो जनतेला उघड करून दाखविला. यज्ञयागांचा खरा अर्थही त्याने शिकविला. स्वतः प्रबुद्ध राजपुरुष असल्यामुळे, बुद्धदेवाच्या उपदेशात राजकारणाची दूरदृष्टी तर विशेष