स्वाध्याय संदेश: Page 11 of 74

आताप्रमाणेच त्या काळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादि जाती जन्माच्या अपघातावरूनच ठरविण्यात येत असत. खुद्द ब्राह्मणांची दिनचर्या पाहिली तरी मंत्रवेत्तेपणाची व मंत्ररक्षणार्थ लागणा-या आत्मशुद्धीची जरी ते तोंडी वल्गना पष्कळ करीत, तरी त्यांचे आचारविचार आताच्या नामधारी ब्राह्मणांइतकेच क्षुद्र व निकृष्ट असत. तथापि बहुजनसमाज आताप्रमाणेच निरक्षर, मूढ व भोळसट असल्यामुळे, त्याची मनोवृत्ती अंधश्रद्धेची धूळ फेकून आंधळी करणे तत्कालीन भूदेवांना फारसे कठीण गेले नाही. उलट या अंधश्रद्धेच्य जोरावर ब्राह्मणेतरांना मंत्रतंत्रांच्या यंत्रांत सफाई पिळून त्यांची चिपाडे करण्याची कामगिरी ब्राह्मण भूदेव दिवसाढवळ्या करीत असत. मंत्रतंत्राच्या जोडीला दुसरे एक शस्त्र ब्राह्मणांनी हस्तगत करून ठेवले होते. ते म्हणजे दैवी शक्ती मिळविण्यासाठी यज्ञयाग करणे हे होय. यज्ञयागाने देव संतुष्ट होतात व माणसांच्या दैवाच्या उलट्या कवट्या सुलट्या बसवितात ही आर्य लोकांची कल्पना वेदकाळापासूनची आहे. तिचा पोकळपणा हडसून खडसून सिद्ध झाला असून, पुत्रासाठी कामेष्टी यज्ञ करणारे भाट्ये आणि जर्मनीचा नायनाट होण्यासाठी फणसवाडीत खंडोगणती तूप जाळणारे हरेश्वर महादेव पंडित, असले यज्ञयागप्राण्याचे भक्त अजूनसुद्धा बरेच आढळतात; मग तुळशीची हजार पाने सत्यनारायणारा वाहून, किंवा शेंदराच्या पट्ट्याने धोंड्यात उद्भवलेल्या म्हसोबाला कोंबड्या बक-यांचा नैवेद्य दाखवून भरभराटीची फलश्रुति मागणारे लोक कितीतरी असतील! असो, अनेक शतकांच्या प्रघातामुळे पशुहत्येचे निरनिराळे यज्ञ यशासांग करणे, ही एक त्यावेळी मोठ्या कुशलतेची कला होऊन बसली होती व ती सफीत वठविण्याची गुरुकिल्ली आपल्या हातीच ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी दाखविलेली धूर्तता त्यांच्या लौकिकाला शोभेशीच होती. हल्ली जसे बारसे असो, बारावे असो, मुंज असो, लग्न असो, नाहीतर स्मशानक्रिया असो, तेथे भट हा पाहिजेच, तसेच त्याकाळी यज्ञ म्हटला की भटाची पायधरणी केल्याशिवाय गत्यंतरच नसे. मग हा भट नुसत्या कवाइत्या असला तरी त्याची आताप्रमाणेच कोणी खंत मानीत नसत. यज्ञात कोणत्या पशुंची किती हत्या करावी, याज्ञिकाने सोमदारूचे किती बुधले फडशा पाडावे, कोणत्या यज्ञात यजमानाकडून किती दक्षिणा हबकावी, इत्यादी मामले शुद्ध `वेदोक्त’ असल्यामुळे भट सांगेल ती पूर्व दिशा असा प्रकार सर्वत्र असे. मंत्रतंत्राप्रमाणेच यज्ञयागांच्या बाबतीत तत्कालीन भिक्षुकशाहीचे वर्तन इतके रानटी, राक्षसी व रुधिरप्रिय होते की त्याची वर्णने वाचून कसाईखान्यातल्या खाटकांच्या हृदयालासुद्धा द्रव आल्याविना राहणार नाही. मंत्रतंत्र, उपासतापास, यज्ञयाग इत्यादिकांत होणा-या अत्याचारांनीच त्यांची विफलता ब-याच विवेकी लोकांना त्या वेळीसुद्धा पटली होती व ते त्याविरुद्ध निषेधाचा पुष्कळ जळफळाटही करीत. परंतु भिक्षुकशाहीने `सार्वत्रिक’ केलेल्या, कित्येक शतकांच्या प्रघाताने रुढिमान्य झालेल्या, बहुजनसमाजाच्या नित्य आचरणाने आंगवळणी पडून `लोकमान्य’ बनलेल्या धर्मकल्पना किंवा सामाजिक चालीरीती कितीही बाष्कळ व निरर्थक वाटल्या तरी त्याविरुद्ध सक्रीय प्रतिकाराची चढाई करण्याचे धारिष्ट कोणासही होईना. हल्लीसुद्धा विधवाकेशवपनासारखी घाणेरडी चाल अविचारी व अनीतिची आहे, हे पटलेले असूनसुद्धा, वेळ येताच चांगले शहाणेसुर्ते त्या रूढीला मान देतातच ना? एखाद्य पातकाची नुसती जाणीव होऊन भागत नसते, तर त्याला बेदम चोपून जिवंत गाडण्यितका आत्मविश्वासाचा जोर निषेधकाच्या मनगटात असावा लागतो. तथापि गुपचूप निषेधाची शक्ती अगदीच काही वाया जात नाही. एखाद्या जुलमाविरुद्ध उघडउघड बंड झालेले पुरवले, कारण त्याचा मोक्ष तडकाफडकी लावता तरी येतो; पण गुप्त असंतोष जर का जनतेच्या हृदयात घर करू लागला, तर त्याच्या आकस्मिक स्फोटाने ब्रह्मांडाचेही राईराई एवढे तुकडे होतात. भिक्षुकशाहीने धर्माला अट्टल दारूबाज, मांसाहारी व अत्याचारी बनविल्यामुळे उत्पन्न झालेल्या गुप्त असंतोषाच्या स्पोटांतून बुद्धदेवाचा अवतार झाला आणि त्याने आत्मसंशोधित नवमतवादाच्या एकाच मुसंडीने भिक्षुकशाहीचा मुर्दा पाडला. नवमतवादाच्या इतिहात एकगगोट विशेष स्पष्ट आढळून येते की, जेव्हा जेव्हा जनेला भिक्षुकशाही दास्यांतून मुक्त करण्याचे पर्संग आले, तेव्हा तेव्हा क्षत्रिय वीरच पुढे सरसावलेले दिसतात. धर्मस्थापना घ्या, सामाजिक पुनर्घटन घ्या किंवा राजकीय स्वातंत्र्य घ्या, क्षत्रियांची उडी त्यात पडल्याशिवाय ते कार्य यशस्वी झाल्याचा दाखला नाही. शिवाय ब्राह्मणातील उत्तम पुरुषांची कार्ये आणि क्षत्रिय वीरांची कार्ये यात एवढा भेद असतो की पहिला