स्वाध्याय संदेश: Page 2 of 74

जुनी लिहिलेली चिटोरी सापडतील त्याला सुद्धा वाङ्मय म्हणून कवटाळणारे लोक सापडतात. परंतु या अत्यंत व्यापक अर्थी वाङ्मयाचे स्वरूप निश्चित करणे कठीण आहे व ते निरुपयोगी आहे. असले किरकोळ लेख वास्तविक वाङ्मयाच्या व्यापक अर्थात सुद्धा येत नाहीत. असले लेख इतिहासाची साधने किंवा इतर शास्त्रीय वाङ्मयाची साधने असतील, पण ते वाङ्मय पदवीस पोचत नाही. वास्तविक ` वाङ्मय’ शब्दाच्या व्यापक अर्थाला सुद्धा थोडीशी मर्यादा आहे. ज्ञान, मनोरंजन किंवा उपदेश करण्याच्या बुद्धीने मुद्दाम लिहिलेले लेख किंवा ग्रंथ म्हणजे व्यापक अर्थाने वाङ्मय होय. अशा वाङ्मयाचे दोन वर्ग होतात. एक शास्त्रीय वाङ्मय, दुसरे ललित वाङ्मय. सृष्टिकृत किंवा मनुष्यकृत वस्तुजाताचे किंवा त्याच्या एका भागाचे ज्ञान किंवा माहिती वर्णन करणारे वाङ्मय ते शास्त्रीय वाङ्मय होय. सत्यस्वरूप यथातथ्य कथन करणे हा या वाङ्मयाचा मुख्य उद्देश असतो. या सत्य स्वरूपाचे आकलन, अवलोकन व तर्क या मानवी मनाच्या शक्तीच्या योगे होते. अर्थात असले शास्त्रीय वाङ्मय हे त्या त्या विषयांची गोडी अगर गरज असणाराकरता असते. गणितशास्त्राचे वाङ्मय गणित्याला उपयोगी. वनस्पतिशास्त्राचे वाङ्मय तज्ञाला उपयोगी, सामान्यजनाला त्याचे काय होय? असल्या वाङ्मयाचा उपयोग सामान्य जनाकरिता नसतो. पण ललित वाङ्मय हे सर्वांकरिता असते. ते सर्व स्त्री पुरुषांच्या प्रीतीस पात्र होण्यासारखे असते. त्यातील विषय सर्वांना समजण्यासारखे असतात; सर्वांच्या अनुभवाचे असतात; व सर्वांना त्याची आवड असते. ललित व सर्वांना त्याची आवड असते. ललितवाङ्मयाचा उद्देश ज्ञान देणे किंवा माहिती देणे हा नसतो; तर मनुष्याचे मनोरंजन करणे व त्याच्या मनोवृत्ती उद्दीपित करणे हा असतो. या ललित वाङ्मयोदयाच्या बुडाशी मानवी मनाच्या चार प्रवृत्ती असतात. पहिली, आपल्या मनातील विचारविकार दुस-यास व्यक्त करून दाखविण्याची उत्कट इच्छा; दुसरी मानवजात तिच्या हातून घडणारी कृत्ये यांबद्दलचा आपलेपणाचा भाव; तिसरी, आपण राहतो ती सत्यसृष्टि व मनुष्याने कल्पनेने निर्माण केलेली कल्पना. सृष्टि यांची आवड; व चवथी, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा रमणीय रूपरंग वगैरे सौंदर्यपोषक गुणांची गोडी. काही लेखकांच्या मते तर ललितवाङ्मय मानवी मनाची सौंदर्यप्रतीति हा खरा आत्मा आहे. कारण ललितवाङ्मय ही ललितकलासप्तकापैकी एक कला आहे असे मानण्यात येते. आता ललितकलांचा उद्देश सृष्टीतील वस्तुजातामध्ये गूढ असलेले सौंदर्य व त्यात भरलेली भव्यता यांचे आविष्करण करणे होय. वस्तुजातातील सत्याविष्करण हा शास्त्राचा उद्देश आहे, तर वस्तुजातीतील सौंदर्याविष्करण हा ललितकलांचा उद्देश आहे. मनुष्य आपल्या बाह्य डोळ्यांनी व आपल्या बुद्धीने वस्तुंच्या स्वरूपाचे आकलन करतो. बुद्धि ही पृथक्करणात्मक आहे. ती अवलोकनाने वस्तूचे अवयव, अन्तर्भाग व ज्ञानेंद्रियांनी कळणारे रूपरसादि गुण इत्यादि जाणू शकते, व अशा त-हेचे पृथक्करणात्मक व इंद्रियगोचरगुणात्मक स्वरूप सांगणे हे शास्त्रीय वाङ्मयाचे काम आहे, तर मानवी प्रतिभाशक्तींना गोचर होणारे वस्तुजातातील अतिंद्रिय सौंदर्य व भव्यता यांचा सर्वांना प्रत्यय आणून देणे हे ललितकलांचे काम आहे. अर्थात ललितवाङ्मयाचेही तेच कार्य आहे. म्हणून ललितवाङ्मय हे बुद्धिप्रभावाने उत्पन्न होत नाही. बुद्धीने मनुष्य शास्त्रीय ज्ञान मिळवील, किंवा शास्त्रीय ज्ञानाचे आकलन करू शकेल. पण बुद्धिवान मनुष्य ललितवाङ्मय निर्माण करू शकणार नाही. त्याला प्रतिभाशक्ती किंवा कल्पनाशक्ती यांची जरूरी आहे. हिलाच कविप्रतिभा म्हणतात. ही दिव्य दृष्टीप्रमाणे आहे. ती सर्व मनुष्यात असतेच असे नाही. ही एक उपजत शक्ति आहे. ती मेहनत करून साध्य होणार नाही. म्हणूनच ललितवाङ्मय निर्माण करण्याला त्या जातीचेच मनुष्य पाहिजे. ते येरा गबाळाचे काम नाही. ही दिव्य दृष्टी ज्याला आहे त्याला प्रत्येक वस्तुंतील अन्तर्गूढ सौंदर्य दिसते. म्हणून ललित वाङ्मयाला कोणताही विषय वर्ज्य नाही. प्रतिभावान माणूस कशाबद्दलही लिहो, त्याचे लिहिणे ललितवाङ्मय बनते. याच कारणाने कित्येक कवींची यदृच्छया लिहिलेली पत्रे, त्यांच्या रोजनिशा, त्यांचे लिहून ठेवलेले स्वगत विचार किंवा आत्मचरित्र, सारांश त्यांच्या लेखणीतून निघालेले प्रत्येक वाक्य ललितवाङ्मय पदाप्रत पावते. पण हा त्यांच्या प्रतिभेचा प्रभाव आहे. त्याचा प्रकाश सर्वत्र