स्वाध्याय संदेश

प्रबोधनचे गठ्ठे बांधण्यासाठी दादरच्या खांडके बिल्डिंगमधे तरुणांची गर्दी व्हायची. ते सगळे प्रबोधनकारांनी भारावलेले होते. त्यातून स्वाध्याय आश्रम सुरू झाला. याच स्वाध्याय आश्रमातील कार्यकर्त्यांनी गोविंदाग्रज मंडळाची स्थापना करून काही पुस्तकं छापली. प्रबोधनकारांच्या निवडक लेखांचा हा संग्रह त्यातलाच एक. प्रबोधनम आणि अन्य ठिकाणी लिहिलेले तेवीस निवडक लेख यात आहेत.

पहिली आवृत्ती (१९२३)

000 ।। काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् ।। गोविंदाग्रज ग्रंथमाला, पुष्प ५ वे स्वाध्याय-संदेश अथवा श्री. केशव सीताराम ठाकरे, यांचे निवडक निबंध संपादक मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख, बी.ए. प्रकाशक गोविंदाग्रज मण्डळ, दादर, मुंबई नं. १४. किंमत १ रुपया Printed by M. N. Kulkarni at Karnatak Press, 434 Thakurdwar, Bombay And\Published by M. B. Deshmukh, B. A., Honorary Secretary, Govindagraj Mandal, Dadar, Bombay 000 संपादकीय बोल वाचका, आपण हाती घेतले आहे हे गोविंदाग्रज-ग्रंथमालेचे पांचवे पुष्प! मालेत प्रथमच काव्यलतेची चार पुष्पे गुंफून मालाकाराने यथाशक्ति कविजनांचा सत्कार केलाच आहे. आजपर्यंत पद्यपुष्पांनी रसिकांची पूजा बांधिली; आता जनताचरणी हे पहिलेच गद्यकुसुम अर्पित आहे. कल्पनामय काव्याचा पद्यप्रदेश सोडून आज काव्यमय कल्पनांच्या गद्यप्रदेशांत प्रवेश करिताना, रसिका, आपल्याला नवख्या अनोळखीपणाने गांगरून जाण्याचे मुळीच कारण नाही. ``स्वाध्याय-संदेश’’ हे सुंदर कल्पनांनी खच्चून भरलेले एक गद्य-काव्यच आहे! पद्यजनक काय, किंवा सुंदर गद्याचा कर्ता काय, कल्पनेच्या करामतीवर `कवि’ या संज्ञेला दोघांचाही सारखाच हक्क पोहोचतो. फरक एवढाच की कलेच्या मंदिरांत कवितेला कायमचे माहेर मिळाल्यामुळे, फक्त सौंदर्योत्पादनाशिवाय इतर कोणताही कायदा कवि बेगुमानपणे मोडू शकतो, व म्हणून त्याचा मार्ग सुकर असतो. गद्यलेखकाला तसे करणे शक्य नसते; म्हणून त्याचा मार्ग दुष्कर असतो. कल्पनेच्या भरारी बरोबरउंचावता उंचावता कवि स्वतःला कोठेही हरवून बसला तरी ते त्यास भषणास्पदच होते. काल्पनिक अस्मानात गद्यलेखकाने मात्र स्वतःला विसरणे नेहमी दूषणास्पद असते. `हे सारे मनि आणुनि मग -’ स्वाध्याय संदेश हाती धरा. `स्वाध्याय-संदेश’ हे श्रीयुत ठाकरे यांच्या पंधरा वर्षांच्या लेखकी आयुष्यांतील निरनिराळ्या विचारस्थितीचे चित्र आहे! आरंभीचा आवेश, रंगाचा भडकपणा, आणि कल्पनांचा स्वैर विहार, मध्यमावस्थेतील स्थिरावलेला विचार, आणि सुसंघटित कल्पना व परिणतावस्थेतील गंभीर विचार, योजक मांडणी व पूर्ण विकसित कल्पना, आणि आरंभापासून अखेरपर्यंत नवमतवादी सत्यप्रेमी तडफ व ओजस्विता वगैरे छटा, वाचका, आपण निरखून घ्यावयाच्या आहेत. असो! संदेशातील सुंदर संग्रह प्रसिद्ध करण्याची परवानगी दिल्याबद्दल श्रीयुत ठाकरे यांचा व अतिशय अल्पावधीत त्याकरिता विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल प्रि. भाटे यांचा, मंडळाच्या वतीने मी अत्यंत आभारी आहे. वक्तशीर सुंदर छपाई हा श्रीयुत कुळकर्णी यांच्या कर्नाटक छापखान्याचा विशेषच आहे. मंडळाच्या तर्फे त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. श्रीयुत शंकरराव किर्लोस्कर, श्री. सुंदरराव वैद्य व श्रीयुत दत्तोपंत देशमुख या कुशल चित्रकार बंधुंनी स्वाध्याय-संदेशच्या सौदर्यात घातलेली भर केवळ आभार प्रदर्शनाने भरून येणे नाही! स्वाध्यायाश्रम दादर, मुंबई २३-१-१९२३ माघ शु. शिवशक, २४९ सर्वांचा नम्र सेवक, मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख 000 प्रिन्सिपाल गो. चिं. भाटे, एम्. ए. (विलिंग्डन कॉलेज, सांगली) यांची प्रस्तावना वाङ्मयक्षेत्रांत नेहमी वावरणा-या माणसाला वाङ्मयाची व्याख्या काय, असे विचारल्यास तो सुद्धा चटकन उत्तर देण्यास कचरेल. कारण `वाङ्मय’ हा शब्द जरी अलीकडे लोकांच्या फार तोंडी आहे, तरी वाङ्मयाच्या स्वरूपाकडे फारच थोड्यांचे लक्ष गेलेले असते. आधी या शब्दाला व्यापक व विशिष्ट असे दोन अर्थ आहेत, हे पुष्कळांच्या ध्यानात येत नाही. यामुळे या दोन अर्थांचा मनात गोंधळ होतो व वादविवाद करताना वाङ्मयाचा एकदा एक अर्थ मनापुढे असतो तर दुस-यांदा दुसराच अर्थ मनात येतो. व्यापक अर्थी वाङ्मय म्हणजे एखाद्या भाषेत जे जे काही लिहिलेले असते व म्हणून ज्याला ज्याला बोलण्यापेक्षा टिकाऊपणा आलेला असतो ते ते सर्व होय. जुने कागदपत्र, जुने जमाखर्च, जुनी टिपणे, जुन्या बखरी, जुने करारनामे, सारांश जी जी