टाकलेलं पोर: Page 10 of 40

धा. आस्ताईच्या एकाच थपडीत तुझा अंत्रा उघडून टाकीन. हिरडा : अरे जा गुलाबकळीच्या. नादिर्दिर्दिर तुंदिर्दिर्दिर तुंदिर्दिर्दिर तननन तननन तदारें तुंद्रे दानी, तूं मला मारणार? कुरुक्षेत्रावर जमलेल्या एकाही रथीमहारखीची माझ्या तम्बोऱ्याला हात लावण्याची छाती झाली नाही, तो तूं चामडकुट्या मृदंग्या मला मारणार? ‘‘कोण येतो तो पाहातो मजसी माराया-याया-अधि त्याचा प्राण घेतो कोप शमवाया.’’ महायुद्धाची जयश्री पांडवांवर भाळते का कौरवांवर फिदा होते. याचा निकाल लागेल तेव्हा लागो, आवळकटी, भीमपलासाची शपथ घेऊन मी आज हमिरी प्रतिज्ञा करीत आहे की तुझ्या गांधारी पाणिग्रहणासाठी हा हिरडा या बेहड्याच्या झुंबऱ्याचा दादरा केल्याविना राहाणार नाही. [दोघे अस्तन्या सारून एकमेकांवर धावतात.] आवळकटी : चला व्हा दूर मेल्यांनो. द्रौपदीमुळं कौरव-पांडव युद्धाच्या वर्दळीवर आले. आवळकटीमुळं हिरड्या बेहड्याचं पीठ पडून त्यांचं त्रिफळाचूर्ण झालं, हा बदलौकिक मला साफ नको. हिरडा : बदकर्मानं बदलौकिक होतो. या हिरड्याच्या प्रेमाचं पीठ करून त्याची तीट तू कपाळी लावशील तर बदाचा प्रश्न तेव्हाच बाद होईल. बेहडा : आवळकटी, काय तू या निरेधसा धसाड्याचं ऐकतेस! गवयी लोक मुळचेच बदफैली. या हिरड्यानं शेकडे वोळे रांगाचा बदरंग केलेला मी पाहिला आहे. मृदंग्यापुढं गवयाची मिजास? दुग्गण चौगणीत देईन कुठच्या कुठं भिरकावून – आवळकटी, तू मलाच आपलं प्रेमदान कर. हिरडा : अग, मृदंगी म्हणजे थापाडे, तू काय लागतेस या थापाड्याच्या नादी. मृदंगाच्या वाद्या आवळून आवळून याच्या साऱ्या नाड्या आखडल्या आहेत. बेहडा : रात्रंदिवस घसा फोडफोडून याच्या आळ्याच्या घाम मळ्याला गेला आहे. हिरडा : म्हणूनच माझ्या प्रेमाचा मळा फुरफुरला आहे. आवळकटी, तू याच्याशी लग्न लावशील तर एका वर्षात मेल्या नवऱ्याची जिवंत विधवा होशील. बेहडा : आणि तू या सुरावट्याची बायको होशील तर तारवट नवऱ्याचं लोढणं गळ्यात अडकवून कुमारीच्या कुमारीच राहशील. खरं सांग, तुझं कुणावर प्रेम आहे? हिरडा : तुझ्या कौमार्याची तुला शपथ. माझ्यावर तुझं प्रेम आहे ना? माझ्या नावानं तू कुंकू लावशील ना? आवळकटी : बोलून चालून मी दासी, त्यातून कुमारी, भेटेल तो तरुण मला आवडतो. सगळ्यांच्याच नावानी कुंकवाचे टिकले लावीत सुटले, तर मळवटीखालीच माझं कपाळ बेपत्ता व्हायचं! हिरडा : मळवटासारखी दुसरी राजरोस पळवाट नाही. लांब रूंद मळवटाच्या फरफाट्यामागं गोंदले नोंदलेले, लागले लावलेले, सगळे काळे डाग बेमालूम छपले जातात. आवळकटी : मळवटाचा पट्टा ओढून, त्रेकम् टिकली बनण्यापेक्षा, एकच छान बारीकशी टिकली लावून --- बेहडा : दोघांचा बायको होत असशील तर हिरडयाशी एकतालाची सम दाखवून, तुला अर्धी अर्धी वाटून घ्यायला मी तयार आहे. कायरे हिरज्या, सूचनेला सम देतोस, का कालात लय करतोस? आवळकटी : म्हणजे? मेल्यांनो, टरबुजासारखी मला उभी चिरणार की काय? हिरडा : उभी चिरून कुणाला काय मिळणार? अग, पाच पांडवांनी नाही का एक द्रौपदी वाटून घेतली? बेहडा : त्यांनी काय तिच्या चिरफाळ्या केल्या थोड्याच? आवळकटी : तुम्हा दोघांची एकदम बायको होऊन द्रौपदीसारखं पाच नवऱ्यांचं उघडं दुकान नाही मला थाटायचं. हिरडा : द्रौपदीसारखं उघडं दुकान थाटायचं नसेल, तर कुन्तीसारखा झाकल्या प्रेमाचा व्यापार कर. आवळकटी : तो कसा काय? हिरडा : पण्डु राजाच्या, नावानं कुंकू लावून, तिनं नाही का तीन निरनिराळ्या देवांकडून --- बेहडा : किंवा देवमाणसांकडून --- हिरडा : तीन पोरांची कमाई केली आणि आपल्या सवतीला-माद्रीला सुद्धा – दोन जुळ्या पोरांसाठी या भारतीय पातिव्रत्याचा ओनामा शिकवला? बेहडा : गुपचूप प्रेमाची गोडी काही औरच असते बुवा. हिरडा : पण सासूपेक्षा सून निधड्या छातीची. आवळकटी : एका बाईला एकच नवरा असं शास्त्र असता, द्रौपदीचा नि कुंतीचा हा उघड गुप्त नवऱ्यांचा बाजार लोकांना कसा मान्य झाला? हिरडा : मोठ्यांनी शेण खाल्लं तर ते औषधासाठी आणि गरिबानं चुकून चाटलं