टाकलेलं पोर: Page 9 of 40

माझ्या पित्याच्या नि माझ्या अपमानाबद्दल, आता माझी हीच प्रतिज्ञा, ‘‘हा सूताधम कर्ण शत्रूच्या हातून ठारला मारला जाईपर्यंत, हा आचार्यपुत्र अश्वत्थामा शस्त्रसंन्यास करीत आहे.’’ [शस्त्र फेकून देतो.] कर्ण : वडलांचंच बाळबोध वळण गिरवलं. यात विशेष काय केलंस? अश्वत्थामा : विशेष काय? कर्ण : तुझ्यासारख्यानं शस्त्र हातात ठेवलं काय न् टाकलं काय, दोहींची किंमत एकच? अश्वत्थामा : आणखी आगीत तेल ओतू नकोस, पांडवांच्या हातून जेव्हा हा नराधम मारला जाईल तेव्हा राजा, तुला या अश्वत्थाम्याचीच आठवण होईल. (जातो.) दुर्योधन : त्यावेळी मी तुला सेनापती करीन. अंक १ला] [प्रवेश २ रा [हातात फुलांची परडी घेऊन एका बाजूने आवळकटी झपझप पावले टाकीत येते. तोच समोरून हिरडा ताना मारीत प्र. क.] हिरडा : तुजविण मी हैराSSण!—याचं नाव प्रेमाचा झटका. झटक्यासरशी भेट आणि भेटीसरसा झटका. माझ्या जिवाला तुझाच चटका! आवळकटी : तुझी नाही का अझून भरली घटका? हिरड्या, सगळीकडे लढाईची धामधूम, आपल्या राजासाठी लढाईवर जाण्याऐवजी, माझ्यामागं कशाला भटकतोस? हिरडा : मी ताना मारणारा गवई, माना मारणारा मारेकरी थोडाच आहे. आवळकटी : ततुला राजकारणाची तरी काही चाड? हिरडा : राजकारण? या लढाईत कसलं आलं आहे राजकारण? हव्या त्या गावगुंडाला आपली गुंडगिरी झाकायला, राजकारणाची गोधडी आजकाल छान सापडली आहे! आवळकटी, या कौरव-पांडव युद्धात राजकारणापेक्षा, स्त्रियश्र्चरित्रं पुरुषस्य भाग्यमचा मामला मुळाशी आहे, हे तुला समजावून सांगितलं तरी उमजणार नाही. आवळकटी : का उमजणार नाही? हिरडा : कारण तू बाई आहेस, बुवा नाहीस. आवळकटी : बायांच्यापेक्षा बुवांना अक्कल जास्त असते की काय? हिरडा : हे तर ब्रह्मदेव बोलला. आवळकटी : तो तरी मेला बुवाच! बायका जर बेअकक्ल, तर अकलेबुवा बायांच्या मागं कशाला लाळ घोटीत फिरतात? हिरडा : तेच कोडं सोडविण्यासाठी ही लढाई आहे. एकापेक्षा एक वरचढ, असे पाच नवरे करूनसुद्धा, कर्ण महाराजावर डोळा मारणारी महापतिव्रता द्रौपदी, आता जर कर्णाला कवटाळण्याचा जाहीरनामा काढील, तर एका क्षणात ही लढाईची धामधूम थंडगार पडेल. आवळकटी : द्रौपदीमुळं ही लढाई चालू झाली म्हणतोस? हिरडा : ओदतन देर्ना तान्, तुंदिर धिक्तां तेरे दान्! पाच नवऱ्यांचा उघडा बाजार थाटणाऱ्या द्रौपदीसाठी आज किती तरी वीर महावीर जिभल्या चाटीत आहेत. निःपांडवी पृथ्वीच्या अश्वत्थाम्याच्या वल्गना द्रौपदीसाठी आणि कर्ण महाराजांची अर्जुनवधाची प्रतिज्ञा तिच्याच प्राप्तीसाठी. अर्जुन मेला की पाच नवऱ्यांच्या सरावाची ती रसाळ पतिव्रता अर्जुनाच्या रिकाम्या जागेवर कर्णाचीच नेमणूक करणार. हवेला पोकळी खपत नाही. तर द्रौपदीला एका नवऱ्याची कशी खपणार? द्रौपदीच्या डोळेमारणीत कर्णाचा कान अडकला की लढाई खलास. दुर्योधन महाराजांच्या साऱ्या उड्या कर्णाच्या जिवावर. तोच जीव द्रौपदीनं घेतला की कौरवपक्ष आटोपला. हे सगळं लुगड्याचं राजकारण आहे. लुबऱ्याशिवाय यात कोण भाग घेणार? आवळकटी, मला तू हवीस. लढाई नको. द्रौपदी नको, काही नको – तू माझी पूर्वी, मी तुझा यमन. तू माझी रामकळी, मी तुझा हिण्डोल. तू माझी भैरवी, मी तुझा भैरव. (बेहडा प्र. क.) बेहडा : अहो भैरव, वेताळ, म्हसोबा, खैसोबा बस करा आपलं एरंडाचं गुऱ्हाळ. आवळकटी : [स्व.] गजकर्ण नायट्याची ही जोडी छान जमली. हिरडा : हा दुष्टा भरतकुलाधमा, आवळकटीशी मी एकान्त करीत असता, मध्येच येऊन आकान्त करण्याची तुला लाज कशी रे वाटली नाही. बेहडा : आवळकटीशी लघळपणा करणाराचा एकाच मुरदंगी थापेत घात्रक धिन्ना कडान् धा केल्याशिवाय हा बेहडा राहणार नाही. आवळकटीवर माझं प्रेम आहे. आवळकटी : प्रेम असेल! पण तू काही माझा नवरा नव्हस! बेहडा : मी तुझ्यासाठी जीव देईन. हिरडा : तुझ्यासाठी मी या बेहड्याचा जीव घेईन. बेहडा : अरे जा सोनामुखीच्या. ताकिट धाकिट तक् तक् धिग धुनुनुनु नकधिग धुनुनुनु, धिलांग धुमकिट, किटतक गदिगन