टाकलेलं पोर: Page 8 of 40

: जातिधर्माचा संन्यास करणाऱ्या सोंगाड्या क्षत्रिया, युद्धाच्या आवाहनाला पाठ दाखविणारा हा कर्ण नव्हे. चल, ही घे पहिली सलामी. [दोघेही तलवारी सरसावून पवित्रे धरतात. दुर्योधन अश्वत्थाम्याला आणि शल्य कर्णाला आवरून धरतात.] दुर्योधन : हात आटोपा. आचार्यपुत्रा-कर्णा, काय हा अविचार! दोघेही आपापली शस्त्रे आवरा. कौरवेश्वराच्या शिबाराततरी असली दांडगाई तुम्हाला शोभत नाही. अश्वत्थामा : राजा, या पापाधम गुरुनिंदकाला पाठीशी घालून, तू आपल्या ऐश्वर्याची नि कौरवसाम्राज्याची हानी करून घेत आहेस. सोड तू मला. या सूताधमाची खांडोळी केल्याशिवाय भारतीय महायुद्धाची यशश्री तुझ्यावर खास भाळणार नाही. कर्ण : भटी बुद्धीलाच असले तोडगे छान सुचतात. शल्या, यावेळी तरी मला आडवू नकोस, या नाटकी क्षत्रियाचा शस्त्रास्त्राचा दिमाख किती फोलकट आहे, याचं प्रत्यन्तर मी आत्ताच दाखवतो. अश्वत्थामा : अश्वत्थामा नाटकी क्षत्रिय? राजा, सोड माझा हात. या नीचकुलीन सूताधमाला नाटकी क्षात्रतेजाचा तडाका मला दाखवलाच पाहिजे. दुर्योधन : अश्वत्थामन् कर्णा, आपापली शस्त्रे आवरून धरा. अशी हा कौरवेश्वर तुम्हाला आज्ञा करीत आहे. कर्ण : [तरवार म्यानात घालून] कौरवेश्वराची आज्ञा शिरसावंद्य. [अश्वत्थाम्यास] राजाच्या इच्छेनेच तुला जीवदान मिळाले! अश्वत्थामा : असले जीवदान मला साफ नको आहे. राजा, कर्णवध झाल्याशिवाय हा अश्वत्थामा या खड्गाला मुळीच आवरणार नाही. नीच कुलोत्पन्नांना कशाही अवस्थेत मारले तरी पाप नाही. सूतपुत्रा हो मरणाला तयार! [कर्णाच्या अंगावर धावून जातो.] शल्य : [अश्वत्थाम्याला उद्देशून] आचार्यपुत्रा, काय ही दांडगाई? राजाज्ञेचा अपमान? अश्वत्थामा : या सूतपुत्रानं माझ्या पित्याचा केलेला अपमान राजाला खपतो. शल्य : म्हणून तू राजाज्ञेचा अपमान करणार? महापाप, राजाज्ञेला कःपदार्थ मानणाऱ्यावर तरी सेनानीपदाचा विश्वास राजानं कसा टाकावा? अश्वत्थामा : विश्वास टाकून तर पहा. राजा – अतिनीच पापकर्मा हीनकुलोत्पन्न सूतज साहाय। शशिवंश भूषणाला तुज गुणवंतास योग्य हा काय।। मला सेनानीपदाचा अधिकार दे म्हणजे -- मारीन अर्जुनातें मी राजा काळजी नको वाहूं। क्रोधें अकर्ण विजया पृथ्वी करितोचि बोल बापा हूं।। दुर्योधन : अश्वत्थामन् मला कर्णार्जुनशून्य पृथ्वी पाहण्याची इच्छा नाही. मला निःपांडवी पृथ्वी करायची आहे. अर्थात् आपल्या पक्षातल्या प्रधान वीरांनी एकमेकांशी विरोध करण्याचा हा समय नव्हे. शल्य : असल्या विरोधानं राजमंडळावर आणि सैन्यावर केवढा विपरीत परिणाम होईल, याचा नको का काही विचार करायला? शिवाय उद्याचा सूर्य मध्यान्हीला येताच, दुःशासनाच्या रक्तानं माखलेल्या हातांनी, द्रौपदीची मोकळी वेणी मी बांधीन, अशी भीमानं आज प्रतिज्ञा केली आहे. अश्वत्थामा : हा आचार्यपुत्र जिवंत असेपर्यंत, युवराजाच्या केसाला स्पर्श करायची त्या वृकोदराची छाती नाही. कर्ण : राजा, सेनानीपदाचे अधिकार मला तू दे अथवा देऊ नकोस. उद्या मी अर्जुनाशी द्वैरथ युद्ध करून, त्याला ठार मारीन किंवा मी मरेन, हीच माझी प्रतिज्ञा. अश्वत्थामा : राजा, सेनानीपदाच्या अधिकाराशिवाय कर्ण जर अर्जुनवधाची प्रतिज्ञा करीत आहे, तर मला तू आपला सेनापति कर. उद्या सूर्यास्तापूर्वी निःपांडवी पृथ्वी करून, पितृवधाचा मी कसा कचकचीत सूड उगवतो, तो पाहून घे. दुर्योधन : गुरुबंधो, व्यक्तीपेक्षा कार्याचं महत्त्व मला अधिक आहे. भीष्माचार्य शरतल्पी पडल्यावर, कर्णाच्या आग्रहावरूनच द्रोणाचार्यांना मी सेनापतिपद दिले. आता कर्णालाच मी सेनापती करण्याचं ठरवलं आहे आणि धारातीर्थात पतन पावलेल्या त्या प्रधान वीरांनीसुद्धा कर्णाच्या पराक्रमाची आधीच प्रशंसा केलेली आहे. शल्य : कौरवेश्वराच्या योजनेला राजमंडळाच्या वतीनं प्रणिपातपूर्वक मी अनुमती देतो. दुर्योधन : कोण आहे तिकडे? आण ते साहित्य [बेहडा आणतो] अंगराज, कौरव सैन्याचं अधिपत्य या किरिटाच्या चिन्हानं आपल्या पराक्रमी मस्तकावर मी स्थापन करीत आहे. [कर्णाला किरीट, खड्ग व पुष्पहार अर्पितो.] कर्ण : कौरवेश्वरा, मी माझं कर्तव्य चोख बजावीन. दुर्योधन : यात मला तिळमात्र शंका वाटत नाही. अश्वत्थामा : राजा, माझ्यासारख्या उच्चकुलीन वीराला डावलून, या सूतपुत्राला तू सेनापती केलंस? मर्जी तुझी. सत्तेपुढं शहाणपण चालत नसलं, तरी