टाकलेलं पोर: Page 7 of 40

या संज्ञेला विशेष पात्र समजले पाहिजेत.

अश्वत्थामा : जाती तशी पुती न् खाण तशी माती. हा सनातन सिद्धान्त, उर्मट कर्णा, विसरू नकोस.

कर्ण : जन्मप्राप्त थोरवीवर जगणाऱ्या बड्या बेट्यांसाठीच हा सिद्धान्त निघालेला आहे. मनगटाच्या जोरावर स्वतःचा न् स्वकुलाचा उद्धार करणाऱ्या आत्मतेजस्वी वीरांसाठी मुळीच नाही. हे तू पण विसरू नकोस. या अधिरथ-राधा-पुत्राला अंगाधिपती बनवून, कौरवेश्वरानं प्याद्याचा फर्जी करण्यापूर्वीच, स्वभावजन्य क्षात्रतेजाच्या जोरावर, दुर्योधनाच्या विश्वासाचा किल्ला, या सूतपुत्र कर्णानं आधीच काबीज केला होता, ही गोष्ट नजरेआड करू नकोस. सूतकुलाच्या गारगोटीत जन्मलेल्या या हिऱ्याला उत्तेजनाचे पैलू पाडून, पारखी दुर्योधनानं आत्मतेजाचा उजाळा दिला. जन्मप्राप्त श्रेष्ठपणाच्या भांडवलावर जगणाऱ्या ब्राह्मण क्षत्रियांनी, असल्या हिऱ्याच्या तेजापुढे आपल्या आत्मस्तोमाची निशाणं आता बिनशर्त खाली वाकवली पाहिजेत.

अश्वत्थामा : सूर्याच्या प्रकाशावर चमकणाऱ्या परप्रकाशी चंद्रानं आत्मतेजाच्या वल्गना करू नये. अशा वग्लनांना बाचकण्याइतकं ब्रह्मतेज आजच काही हिणकस झालेलं नाही.

शल्य : आणि क्षत्रियांचं क्षात्रतेज सुद्धा निस्सत्त्व झालेलं नाही.

दुर्योधन : कोणाचंच तेज हिणकस नाही आणि कोणी कोणाच्या तेजाला हिणकस ठरवण्यात शहाणपणा नाही. स्वयंभू पराक्रम आणि लौकिक समजुती यांचा झगडा मानवी इतिहासाइतकाच जुनाट दिसतो. कर्णासारखे वीरच काय ते या झगड्याला दाबात ठेवून, धोरणी आत्मविश्वासानं स्वकुलाचा न् स्वराष्ट्राचा उद्धार करतात. उच्चनीचत्वाच्या लौकिकी कल्पना स्वयंभू पराक्रमाच्या विकासाला दडपून टाकतात. केवळ लोकोत्तर मनस्सामर्थ्याचे धीरवीरच त्या दडपणाला प्रतिकाराची टक्कर मारून, लौकिकी कल्पनांचा खोडसाळपणा सिद्ध करतात. असं करताना समर्थांशी अहंता करण्याचा प्रसंग त्यांच्यावर पुष्कळदा येतो, नाही असं नाही. पण आत्मविश्वासाच्या जोरावर जगात ते आणखी कशाचीच पर्वा ठेवीत नाहीत. कर्ण : मानीव नीच कुळांत स्वपराक्रमी पुरुष जन्माला येऊन, या असल्या वरचढ लोकांच्या मगरूरपणाला, त्यांनी आपल्या स्वयंभू कर्तबगारीचे पायबंध वरचेवर ठोकले नसते, तर या घमेंडानंदनांनी मागासलेल्या सर्व समाजांना कृमिकीटकांपेक्षाही अत्यंत नीच दशेला नेऊन चिरडले असते! अश्वत्थाम्या, पोट भरण्यासाठी क्षत्रियाचा पेशा आणि जनतेवर वजन पाडण्यासाठी ब्राह्मणाची दीक्षा, असली दुतोंडी वृत्ती या कर्णाजवळ नाही. मी सूतपुत्र आहे आणि स्वयंभू क्षात्रतेजानं मी साऱ्या सूतकुलांचा उद्धारक आहे. अश्वत्थामा : खेचराला पुष्कळ शृंगारसाज चढविला म्हणून त्याला काही पंचकल्याणी अबलक घोड्याची पात्रता येत नसते. शल्य : स्वयमेव मृगेन्द्रता काही निराळीच असते! कर्ण : तर-तर! ते काय विचारायचं! दोन सेनापतींनी गेल्या पंधरा दिवसांत आपली स्वयमेव मृगेन्द्रता किती ठणठणीत वठवली, ती सर्वांनी पाहिलीच आहे. पहिले भीष्माचार्य! उघड उघड पांडवांचे पुरस्कर्ते. पण करतात काय बिचारे! अर्थस्य पुरुषो दासः न्यायनां, नाइलाच म्हणून, कौरवांच्या मिठाला कसेबसे जागले आणि अखेर वेदान्ती सबबीवर शरपंजरी पडले. दुसरे आमचे द्रोणाचार्य! त्यांचा थाट काय विचारता! शापादपि शरादपि! पण अखेर शापही उपयोगी पडले नाहीत आणि शरही कामाला आले नाहीत! वृत्ती ब्राह्मणांची न् कृती क्षत्रियाची! सांसारिक मोहाचा एक फटका येताच, क्षात्रधर्म गडबडला आणि पोटासाठी धनुर्धारी बनलेला ब्राह्मण अखेर दर्भदारी बनून हकनाहक कुत्र्याच्या मोतानं प्राणाला मुकला! अश्वत्थामा : राजा, माझ्या स्वर्गस्थ पित्याची इतकी बेलगाम निंदा मला आता मुळीच सहन होणार नाही. या तुझ्या पाळीव लाडक्या कुत्र्याच्या तोंडाला तोंडबेडी घाल. नाही तर --- कर्ण : नाही तर काय? अश्वत्थामा : नाहीतर लाथेच्या टोकरीनं टाळक्याची कवची उखडून हातात देईन. कर्ण : कर्णाच्या मस्तकावर लाथ? अश्वत्थामा : हो हो. कर्णाच्या मस्तकावर लाथ. कर्ण : (तलवार उपसतो.) ब्राह्मणाधमा, तंगडी छाटून टाकीन जातीचा ब्राह्मण पडलास, म्हणूनच जिवंत राहिलास, नाहीतर उभा खापलून ठार केला असता. अश्वत्थामा : मूर्खा, केवळ जातींमुळे मी तुला अवध्य झालो काय? तर मग हे घे. ही पहा मी माझी जात टाकली. [गळ्यातले जानवे ताडकन तोडतो.] जातीच्या सबबीवर प्राणदान मिळविण्याची मला मुळीच इच्छा नाही. चल, सामर्थ्य असेल तर शस्त्र घेऊन हो सामन्याला तयार. [तरवार उपसतो.] कर्ण