टाकलेलं पोर: Page 6 of 40

बापानं केला, पांच दिवस झुंजला, पण एक पांडवसुद्धा ठार मारता आला नाही! म्हणे शापादपि शरादपि! अश्वत्थामा : हरामखोरा, माझ्या बापाची निंदा? कल्पान्त करीन, राजा, या कर्णाच्या टकळीला लगाम घाल.

 

दुर्योधन : अंगराज, भूतकाळाच्या गोष्टींचा नसता वितंडवाद कशाला? भविष्यकाळाकडे नजर देऊनच वर्तमानकाळाचे कर्तव्य आपल्याला चोख बजावलं पाहिजे.

शल्य : म्हणूनच मी म्हणतो, राजा, तातवधानं असो किंवा कशानंही असो, अश्वत्थाम्याच्या या प्रक्षुब्ध शौर्यसागराचा आत्ताच सदुपयोग करून घे. यांतच तुझ्या संगरकुशलतेची सिद्धी आहे. द्रोणाचार्यांचा मागं कौरव सैन्याचं अधिपत्य आपल्या शिरावर घ्यायला, अश्वत्थामाच सर्वतोपरी योग्य आहे. निःपांडवी पृथ्वी करायला या योजनेसारखं दुसरं अस्त्र नाही.

अश्वत्थामा : अलबत्, राजा या महासंग्रामाचा भार तू माझ्यावर टाक, म्हणजे – राजा आजचि अ-केशव। त्रिभुव करीन अपांडव। सोमक पांचाळांचं नांव। शेषमात्र राहील।।१।। दाऊनिया शौर्यधाटी। महावीरांचीया थाटी। संपवीन संग्राम गोष्टी। आजि सर्वांसमक्ष।।२।। पाणी पांडवांनो --- ज्या ज्या शस्त्रधरीं तुम्ही नृपशुंनी दुष्कर्म आरंभिले। केलें वा अनुमोदिलें दुरुनियां दोषास या पाहिलें। त्यांची भीम-किरीटिं-कृष्ण-सकटां काढोनि मांसे पहा। देतों मी सकळां दिशांस बळि हें मत्कर्म आतां सहा।।१।।

कर्ण : वाहवा-वाहवा! केवढा हा ब्राह्मणी वल्गनांचा गडगडाट! ब्राह्मणांचं सारं शौर्य त्यांच्या जिभलीच्या पट्ट्यात साठवलेलं असतं म्हणतात ते काही खोटे नाही! बापाला जे पांच दिवसांत साधलं नाही ते हे चिरंजीव एका दिवसात करून दाखवणार! ब्राह्मणी धर्मानं असले मुकाबले पार पडते तर क्षात्रधर्माचा जन्मच कशाला झाला असता?

शल्य : नीच कुलोत्पन्न कर्णा, स्वतःच्या पायांखाली काय जळत आहे ते पहा न् मग ब्राह्मणांच्या शौर्यवीर्याची चिकित्सा कर.

कर्ण : नादान क्षत्रियच काय ते बोलभांड ब्राह्मणांच्या आशीर्वादावर क्षात्र पेशाचा डौल मिरवतात आणि क्षात्रवृत्तीचा रंग चोपडलेले भटजी अखेर ऐन अवसानात, भर समरांगणावर, समाधीचा सोहळा साजरा करतात.

अश्वत्थामा : नीच सूतपुत्रा, अधमाधमा, तुझ्यासारख्या रथकार कुलोत्पन्नाला तरी क्षात्रवृत्तीची एवढी मिजास कशानं आली?

कर्ण : स्वभावजन्य गुणकर्माच्या पुण्याईनं समजलास?

अश्वत्थामा : शुद्रातिशूद्र रथकाराला कसली आली गुणकर्माची पुण्याई?

दुर्योधन : आचार्यपुत्राला असलं विधान मुळीच शोभत नाही. त्रैवर्णिकांच्या गुणकर्माच्या सनदा ब्राह्मणांकडून घ्यायच्या नसतात; त्या स्वभावजन्यच असतात. म्हणूनच आचार्य जन्मानं ब्राह्मण होते तरी कर्मानं क्षत्रिय म्हणून धारातीर्थी मोक्षाला गेले ना? अंगराज कर्णाच्या क्षात्र पराक्रमाचा जिवंत इतिहास साऱ्या जगाचे डोळे दिपवीत असता, त्याला सूतपुत्र म्हणून हिणवण्यात अर्थ काय?

कर्ण : राजा, अश्वत्थाम्यानं सूतपुत्र म्हणून माझा मोठा सन्मान केला, असं मी समजतो. सूत किंवा सूतपुत्र कोणी तरी असेन मी ।। दैवाधीन कुलीं जन्म, मनगटाधीन पौरुष ।।१।।

दुर्योधन : सत्य आहे. मनुष्याचा पराक्रम त्याच्या जन्मावर, जातपातीवर किंवा कुळाच्या लौकिकी उच्च-नीचपणावर मुळीच अवलंबून नसतो.

कर्ण : राजा, वंशकुलाची बेगडी पुण्याई नामर्द षंढांना न् बोलभांड ब्राह्मणांना; मला नाही. जन्म न् कुल या अपघाताच्या गोष्टी. असल्या अपघातांची महती, अश्वत्थाम्या, तुझ्यासारख्या जन्माभिमानी ब्राह्मणाला आणि असल्या भटाब्राह्मणांच्या पोकळ स्तुतिपाठानं फुगणाऱ्या नामधारी क्षत्रियांनी, मला नाही. या कर्णाचा पराक्रम न् त्याच्या क्षात्रचारित्र्याची थोरवी, या-या टरारलेल्या मनगटांत साठवलेली आहे. क्षत्रियत्वाची लटकी घमेण्ड मारणाऱ्या ब्राह्मणपुत्रा, सूतपुत्र असा तू माझा कितीही उपहास केलास, तरी माझ्या सूतकुलाचा मला मोठा अभिमान वाटत असतो, हे नीट ध्यानात ठेव.

शल्य : गदर्भाला उकीरड्याचाच मोठा अभिमान! अश्वत्थामा : तसा या सूतपुत्राला सूतकुलाचा वाटत आहे.

कर्ण : का वाटू नये? कुलाचा अभिमान नाही, त्या माणसानं जन्मून तरी काय केलं? शिंदळीच्या पोटी यद्दच्छेनं जन्माला येणाऱ्या पुरुषानंसुद्धा आपल्या कुळाचा अभिमान धरून, त्याच्या उद्धारासाठी आत्मतेजाच्या पराक्रमाने साऱ्या दुनियेचे डोळे दिपवून टाकले पाहिजेत. दगलबाजीने व्यवहारात वरचढ बनलेल्या तुमच्यासारख्या सत्ताबाजांनीच कुलांचा उच्चनीचपणा ठरविण्याचे कारस्थान केल्यामुळे, लक्षावधी समाजांच्या माणुसकीचा उकिरडा होऊन बसला आहे आणि या उकिरड्यावर आपल्या जन्मदत्त आत्मस्तोमाचा बाजार थाटणारे गब्रूच वास्तविक ‘गाढव’