टाकलेलं पोर: Page 5 of 40

तुला तेव्हाच पटेल.

शल्य : राजा, भीष्मद्रोणाच्या पांडव-पक्षपाताबद्दल तुला काही शंका आली की काय? दुर्योधन : तशी शंका तर मला आलीच आहे; पण विशेषतः द्रोणाचार्य झाले का, किंवा अश्वत्थामा झाला काय, त्यांनी बाह्यात्कारी जरी क्षत्रियाचा पेशा पत्करला असला, तरी त्याच्या आवरणाखाली त्यांची ब्राह्मणी पिंडप्रकृती धमधमत आहे, ही गोष्ट नजरेआड करून मला भागणार नाही. मूळचा स्वभाव सुटत नाही म्हणतात, ते अक्षरशः खरं आहे. पुत्रवधाच्या नुसत्या बातमीनं आचार्यांचं अंतःकरण शोकमोहानं व्याकूळ होताच, तात्काळ त्यांनी कडव्या क्षात्रधर्माचा न् शस्त्राचा संन्यास करून, ब्राह्मणस्वभावाला शोभेसा मनाचा मवाळपणाच अखेर स्वीकारला ना?

शल्य : होय, ही गोष्ट मला पटली. पण अश्वत्थाम्यानं मात्र आपला क्रोधाग्नी भडकवून क्षात्रतेजाची बूज राखली ना? मग त्याच्या त्या तेजस्वी संतापाचा फायदा तू घेऊ नयेस?

दुर्योधन : संताप? मद्रराज, ब्राह्मणाचा संताप नेहमी स्वार्थी न बहिर्मुख असतो; क्षत्रियांप्रमाणे व्यापक न् अंतर्मुख नसतो. त्यांच्या स्वार्थाची भूक भागली की संतापाची आग शमलीच! मग त्यांना कोणत्याही कार्याचं महत्त्वच वाटत नाही. अशा वृत्तीच्या अश्वत्थाम्यापेक्षा आज सतत तेरा वर्षे कौरवांशी बिनतोड निष्ठेनं वागणाऱ्या महारथी कर्णाची सेनानीपदासाठी मी केलेली योजनाच दूरदर्शीपणाची आहे, असं नाही का तुला वाटत? शल्या --- हा प्राकृत पुरुष नव्हे सांगावें काय म्या तुला कविला। कणाच्या तेजें बहु वीरांकरवी स्वगर्व टाकविला ।।१।। [खवळलेला अश्वत्थामा प्रवेश करतो.]

अश्वत्थामा : राजा, कर्णासारख्या सूतपुत्राला राजनिष्ठेचं प्रशंसापत्र देऊन तू केवळ माझाच नव्हे , तर माझ्या स्वर्गवासी पित्याचाही घोर अपमान व्यक्त करीत आहेस. अरेरे! कौरवांच्या मिठाला जागून, गेल्या पांच दिवसांत, माझ्या पित्यानं पांचालसेनेला दे माय धरणी ठाय केलं आणि अखेर-अखेर-कृतघ्न राजा, श्रीकृष्णाच्या कपटनीतीनं त्यांचा अधर्मवध सुद्धा झाला, तरीही आमच्या राजनिष्ठेची तुला शंकाच अं? धिःक्कार असो या कौरवांच्या क्षुद्र मनोवृत्तीला!

दुर्योधन : अश्वत्थामन् परमपूज्य द्रोणाचार्यांच्या अधर्म वधानं माझ्या हृदयात पांडव-निःपाताचा केवढा ज्वालामुखी भडकलेला आहे, याची तुला कल्पना करून देण्यासाठी, मला माझं हृदय फाडून दाखवावं लागेल! गुरूपुत्राच्या सेनानिपदाच्या लायकीची या दुर्योधनाला स्वप्नातसुद्धा कधी शंका आलेली नाही आणि यापुढं ती कधी येणारही नाही. कौरवेश्वराच्या सार्वभौम सामर्थ्याच्या प्रभावळीत, कर्म, शल्य, अश्वत्थाम्यासारखे अनेक रथी महारथी आपल्या देदिप्यमान तेजानं चमकत आहेत. या एकाच आत्मविश्वासाच्या जोरावर मी या भारतीय महायुद्धाच्या समुद्र-मंथनाला हात घातला आहे. गुरुबंधो, पितृवधाच्या संतापानंच कौरवांवर क्षुद्र मनोवृत्तीचा आरोप करायला तुझी विवेकबुद्धी या घडीला धजली म्हणायला काही हरकत नाही.

अश्वत्थामा : का धजू नये? राजा, का धजू नये? अरे – प्रायोपविष्ट गुरु द्रोण। असतां केलें मौलिखण्डण। कोण्ही न केलें त्याचे वारण। धिःकार धिःकार सर्वांतें।।१।। सर्वांसमक्ष क्रूर हिंसन। करूनि चालिला धृष्टद्युम्न। सुखें करितसा शिबिरा गमन। कैसें तुम्हां पाहावलें ।।२।। कौरवेश्वरा, तुझ्या डोळ्यासमोर हा प्रकार घडावा? छान-छान, फार छान गुरुभक्ति दाखवलीस?

कर्ण : यांत गुरुभक्तीचा प्रश्नच कुठं आला? भारतीय महायुद्धाचा सेनापतीच जिथं शस्त्रसंन्यासाला प्रवृत्त झाला तिथं इतरांनी काय करावं अश्वत्थामा : काय करावं? लाज वाटत नाही हा प्रश्न विचारायला?

कर्ण : खऱ्या गोष्टी उघड बोलायला लाज कसली? गुरूनं आपलं क्षात्रधर्माचं गुरुत्व लाथाडून, साध्यासुध्या संसाऱ्यालाच शोभेल, अशा ब्राह्मणी हृदयाचं लघुत्त्व ऐन प्रसंगी प्रगट केलं, तर त्या अवसानघाताबद्दल जबाबदार कोण? अर्थात ज्याचा तो! भारतीय महायुद्धाचे मुकाबले, मोहाच्या किंचित् झळीनं वितळणाऱ्या सात्त्विक ब्राह्मणी पिंडासाठी खास नव्हत!

अश्वत्थामा : ब्राह्मण मनोवृत्तीची निंदा? राजा ही मला क्षणभरसुद्धा सहन होणार नाही.

कर्ण : क्षात्रधर्माचं भाडोत्री कवच फेकून देऊन हाती दर्भसमिधा घे, म्हणजे तुझ्या जन्मजात ब्राह्मण्याकडे ढुंकून पाहण्याचीसुद्धा आम्हांला जरूर पडणार नाही. पण मिजास क्षत्रियाची आणि करणी ब्राह्मणाची, या सरडेशाहीनं महायुद्धाचा झाला इतका विचका आता पुरे झाला.

अश्वत्थामा : काय? महायुद्धाचा विचका आम्ही केला?

कर्ण : तू नाही तुझ्या