टाकलेलं पोर: Page 4 of 40

शीलावर रखरखीत निखारे ओतावे? छे! आता वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकल्याशिवाय गत्यन्तरच नाही.

दुर्योधन : शल्या, तू पांडवांचा मामा; तेव्हा क्षात्रधर्माच्या तोंडाला कोळसे फासणाऱ्या तुझ्या भाच्यांची ही दगलबाजी पाहून, कौरवांचा पुरस्कार केल्याबद्दल तुला थोडेतरी समाधान वाटत असेल खास!

शल्य : राजा, या घडीचा प्रश्न हा नव्हे. प्रश्न इतकाच आहे की श्रीकृष्ण यादवाच्या मसलतीनं कपटी डावपेच लढवणाऱ्या पांडवांशी आम्ही सरळ धर्मयुद्धाचा सामना द्यावा, का शठ्यप्रति शाठ्यमचे टोले लगावून, खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव घालावा?

दुर्योधन : शल्या, कपटनीतीनं मिळणारा विजय या दुर्योधनाला मुळीच नको. युद्धाला तोंड लागलं की यशापयशाच्या प्रश्नाला काही महत्त्वच उरत नाही. क्षात्रधर्मानुसार कोण कसा न् किती कसोशीनं लढला. यातच श्रेयाचं सारं महत्त्व आहे. साऱ्या कौरवांचा संहार झाला. तरी या श्रेयाला पारखे होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. आधीच व्यासासारख्या पोटाळ पंडितांना हातीशी धरून, यादव कृष्णानं कौरवांविरुद्ध लोकमताची आग चांगलीच भडकावून ठेवली आहे.

शल्य : या सगळ्या क्षत्रिय-संहाराला हाच नाटक्या कारण आहे. दाणे टाकून कोंबडे झुंजवायची याला फार खोड; पुन्हा आपण मात्र नामानिराळा! पांडवांनी देव देव म्हणून याचा उदोउदो करावा आणि या पाताळयंत्री डोंबाऱ्याने, लोकमताच्या भुलभुलावणीवर, स्वतःचं माहात्म्य थाटून घ्यावं, असा हा साट्यालोट्याचा कारखाना आहे.

दुर्योधन : पांडवांनी आणि लोकांनी माजवलेलं कृष्णाचं हे स्तोम, आम्ही कौरवांनी कधीच मान्य केलं नाही; म्हणून आमच्यावर त्यांनी लोकमताची कुत्री भुंकायला सोडली. सत्याच्या न् धर्माच्या वल्गना थकल्यावर, ‘‘स्वराज्य आमचा जन्मसिद्ध हक्क; त्यासाठी हे महायुद्ध.’’ अशी नवीन हाकाटी आता चालली आहे. वास्तविक शल्या, पांडव जन्मापूर्वीच पंडुराजानं राज्यसंन्यास करून वनवास पत्करला. हे कुंतीपुत्र पांडव नियोगाची संतती. यांना राज्यावर हक्क सांगताच येतो कसा? तरीही आमच्या विरोधांना न जुमानता, धृतराष्ट्र महाराजांनी यांना खांडवप्रस्थाच्या राज्याची देणगी देऊन, आपलं बंधुप्रेम व्यक्त केलं आणि यांच्या खऱ्याखोट्या जन्मसिद्ध स्वराज्याची तक्रार मिटवली. यादव कृष्णाच्या भगतांकडून याबद्दल चुकूनसुद्धा आम्हाला दुवा मिळाला नाही. आमच्या मेहरबानीची ही देणगी, त्यांनी हक्काच्या सदरात खेचली, चोर तर चोर आणि वर शिरजोर!

शल्य : फुकटाफाकट मिळालेलं ते स्वराज्य त्या जुगारी धर्मानं जुगारात पणाला लावून दोनदा गमावलं.

दुर्योधन : तरीही पुन्हा तोंड वर करून आमच्याशी तंटा आहेच. या भेकडांना जुगार खेळण्याची तर मोठी आग. पण प्रतिपक्षावर मात करण्याच्या अकलेचा पुरा खडखडाट! स्वराज्य आणि सर्वस्व जुगारीत पणाला लावणाऱ्या माथेफिरू जुगाऱ्यांच्या धर्मनिष्ठेची आणि राजकारणी अकलेची फक्त कृष्णपंथी मूढांनीच तारीफ करावी!

शल्य : स्वतःच्या व्यसनापायी राज्याचा न् प्रजेचा, खाजगी मालमत्तेसारखा विक्री करणाऱ्या पांडवांचा हा जुगार भारतीय नृपनीतीच्या कल्पनेला कीड लावल्याशिवाय राहणार नाही. पण राजा, हव्या त्या वाममार्गांनी तुझे दोन सेनापती पांडवांनी ठार केले. तरी सैतानावर सैतान सोडण्याची बुद्धी तुला होत नाही, तुझं धोरण चुकत आहे.

दुर्योधन : ते कसं काय? शल्य : बापाच्या अधर्म वधानं नखशिखांत खवळलेल्या अश्वत्थाम्याला डावलून. कर्णासारख्या सूतपुत्राला कौरवांचा सेनानी करण्याचा तुझा विचारस्पष्टोक्तीची क्षमा कर – मला चतुराईचा दिसत नाही. दुर्योधन : चतुराईचा दिसत नाही?

शल्य : मुळीच नाही. पांडवांनी द्रोणाचार्यांचा कपटानं घात करताच त्या खवळलेल्या अश्वत्थाम्यानं नारायणास्त्र सोडून, पांचाळांची केवढी दाणादाण उडवून दिली, ते तू प्रत्यक्ष पाहिलंस ना? पांडववधाच्या तिरमिरीनं भडकलेल्या त्याच्या त्वेषाग्नीत, सेनानिपदाच्या उत्तेजनाचं तेल ओतण्याचा धोरणीपणा अजूनही दाखवशील, तर उद्याचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच, ही वसुंधरा निःपांडवी झालेली पाहशील.

दुर्योधन : शल्या, स्वार्थी जिव्हाळ्याच्या चकमकीनं घेतलेला क्रोधाग्नी, नवपरिणत दाम्पत्याच्या कामाग्नीसारखाच अल्पप्रभावी असतो. अस्त्रसागर द्रोणाचार्याचा पुत्र – वीरमणी अश्वत्थामा – कितीही पराक्रमी असला, तरी त्याची आजची संताप-सौदामिनी पितृवधाच्या स्वार्थी तिडकेनं कडाडली असल्यामुळं तिच्या या तात्पुरत्या न् तात्कालिक कडकडाटावर भाळून आपलं भागणार नाही. शिवाय शल्य, आणखीही थोडा विचार करशील, तर सेनानीपदासाठी केलेल्या कर्णाच्या योजनेचं महत्त्व