टाकलेलं पोर: Page 3 of 40

क्षत्रिय म्हणा हो’ असे प्रत्येकाला आळवीत रडणारा आणि अभिमन्यूचे भूत पाहताच भेदरून बोबडी वळलेला कर्ण महाभारतात तरी खास आढळणार नाही. मग असला रडका भेदरट कर्ण कल्पनेच्या कुंचल्याने रंगवण्यात, लेखकाला कोणत्या चळवळीवर काळ्या शाईचे शिंतोडे उडवायचे होते, हे महाराष्ट्र नाटक मंडळींच्या धांदरट बावळट चालकांना जरी समजले नाही, तरी जाणत्यांनी त्या टिंगलीचा वा बदनामीचा ठाव तेव्हाच घेतला होता.

या बदनामीच्या निषेधार्थ प्रस्तुत नाटकात कर्णाच्या तोंडी मी घातलेले उद्गार, खुद्द नाटकात योग्य स्थळ न मिळाल्यामुळे, मी बाजूला काढून ठेवले होते. ते याच ठिकाणी उपटून ठेवण्याची संधी मी साधीत आहे. कर्ण – मला पहिला पांडव ठरविण्याचा उपद्व्याप करणारे काही पंडित माझ्या बीजशुद्धीचं संशोधन करण्याच्या दिमाखानं, मी माझ्या हीन कुलाबद्दल फार खंति करीत असतो, लाजेनं व्याकूळ होत असतो, मनातल्या मनात झुरत असतो, रात्रन् दिंवस एकांती रडत असतो, अशा बदनामीची नाटकं रंगवण्यात दंग असल्याचं माझ्या कानी आलं आहे. पांडवपक्षपाती भाटांचा हा कट मी ओळखून आहे. असल्या मतिमंदांना या कर्णाच्या चारित्र्याचा नि आत्मविश्वासाच्या कमावणीचा रतिमात्र ठाव उमगलेला नाही, इतकंच मानून मी तिकडं दुर्लक्ष करीत असतो. डबक्यांतल्या बेडकांनी महासागरातल्या देवमाशाच्या चारित्राची कहाणी सांगण्याचं धाड करू नये आणि परोपजीवी बांडगुळांनी स्वयंप्रभावी पुरुषाच्या पौरुषत्वाचा ठाव घेण्याचा दिमाख मिरवू नये. ‘पहिला पांडव’ नाटकाची भाषा नि रचना नीट पाहिली तर मात्र असे स्पष्ट दिसते की काळकर्ते परांजपे यांच्या नावाचा दुरुपयोग करून अनेक अलबत्या गलबत्या लेखकांनी हे भारूड महाराष्ट्र नाटक मंडळींच्या गळ्यात बांधले आणि त्या वेंधळ्यांनी कै. शिवरामपंताची ही ढोबळ बदनामी बिनदिक्कत रंगभूमीवर नाचवली. टाकलेलं पोर या नाटकात अपत्यहत्येचा प्रश्न तर प्रधान आहेच आहे. पण त्याहीपेक्षा, मागासलेल्या नि पददलित समाजातील स्वाभिमानी उद्धारकांना आत्मोन्नतीचे शिखर गाठण्यासाठी कसकसल्या सामाजिक विकल्पांना नि अडचणींना तोंड देऊन आपला मार्ग आक्रमावा लागतो, याचे दृश्य रंगवण्याचा कर्णाच्या मूळ कथेनुसार मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हिंदुजनांची सामाजिक आचारविचारक्रांती आज विसाव्या शतकाच्या मैदानावर येऊन थडकली, तरी अपत्यहत्येच्या पापाला बसावा तसा आळा अजून बसत नाही. कुमारी नि विधवा यांना फूस लावून फशी पाडणारे, इतकेच नव्हे तर इं. पि. कोडाच्या ३१२ कलमान्वये त्यांना फासावरही लटकवायला कारण होणारे नराधम बिनशर्त बिनबोभाट मोकळे नि नामानिराळेच राहतात आणि त्या अबागणी जन्मठेपीची किंवा मुदतबंद सक्तमजुरीच्या शिक्षेला जाऊन माणसांतून उठतात. या अन्यायाविरुद्ध विधिनिषेध नाटिकेने मी हिंदुमत जागृत करण्याचा अट्टहास केलेला आहे. तो कितपत साधला आहे, हे रसिकांनीच ठरवलेले बरे.पहिल्या अंकाचा पहिलाच प्रवेश कै. परशुरामपंत गोडबोले यांच्या सुप्रसिद्ध मऱ्हाठी ‘वेणीसंहार’ नाटकातल्या एका उत्तम प्रवेशाची सुधारलेली आवृत्तीच असल्यामुळे त्यांचे काही श्लोक नि आर्या मी जशाच्या तशाच नकलल्या आहेत, हे कृतज्ञपणे सांगणे अगत्याचे आहे. वेणीसंहारासारखी जुनी नाटके आता रंगभूमीला कायमची मुकल्यामुळे, जुने ते सारे सोन न मानणाऱ्या आधुनिकांना जुन्यातही काही सोने असते, एवढेच या प्रवेशाने मला दाखवायचे आहे.

मुंबई सर्वांचा नम्र सेवक

केशव सीताराम ठाकरे

ता. ५ मार्च १९३९

टाकलेलं पोर

अंक १ला] [प्रवेश १ ला [स्थळ, स्थिति व पात्रे : सम्राट दुर्योधनाचे शिबीर, द्रोणाचार्यांचा वध झालेला आहे. नवीन सेनापतीच्या निवडणुकीचा प्रश्न. दुर्योधन व शल्य बोलत प्रवेश करतात.]

शल्य : जयघोष चालले आहेत! पांडवांच्या छावणीत जयघोष चालले आहेत! द्रोणाचार्यांच्या अधर्म वधाची शरम वाटण्याऐवजी, यांना जयघोष सुचतात अं? राजा, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे त्रैलोक्याला भारी, असे आपले दोन सेनापती पांडवांच्या कपटनीतीला बळी पडले. आम्ही युद्धधर्माचे नियम कडकडीत पाळावे आणि या पांडवांनी मात्र हवी ती कपटयोजना करावी?

दुर्योधन : शल्या, श्रीकृष्ण यादवासारखा मसलती, मुत्सद्दी, पांडवांच्या भल्याबुऱ्या वर्तनाचा जोवर पुरस्कार आहे तोवर त्यांच्याकडून धर्मयुद्धाची अपेक्षा करणं चुकीचं आहे.

शल्य : युद्धिष्ठिरासारख्या सत्यव्रत महात्म्यानंसुद्धा, धडधडीत खोटं बोलून आपल्या