टाकलेलं पोर: Page 2 of 40

जमले आहे, माझ्यापासूनच ती गर्भवती आहे, आमचे लग्न लावून टाका नि तंटा मिटवा.’ असे सगळ्यांना पुकारून सांगितले. पण नाक्षर नि अडाणी जमात-पुढाऱ्यांना ते पटे ना. मुलीला आधी घराबाहेर घालवा, मग पुढचे पुढे, एवढाच त्यांचा हट्ट, तेवढ्यात तेथला एक तरुण मुसलमान गुंडही पुढे झाला आणि म्हणून लागला की त्या तरुणीचा नि त्याचा संबंध आहे. ती घराबाहेर पडताच निका लावायला तो तयार आहे. फैजपूरच्या मुसलमान मंडळींनीही तसा जोर धरला. मुलीचा बाप गांगरून गेला. पंचाच्या कटकटीला कंटाळून त्याने अखेर त्या मुलीला घराबाहेर हाकलली. चटकन त्या भावसार तरुणाने तिला आपल्या घरी नेऊन ठेवली. ‘घराबाहेर घालवा’ असा निकाल देऊन पंचमंडळींतले चार पाच इसम, तापलेले डोके थंड करण्यासाठी, टाकलेलं पोर नाटकाचा प्रयोग पहायला थेटरात पिठावर बसले.

नाटक पाहताच त्यांचे माथेताळ्यावर आले. आपण केली ती मोठी घोडचूक केली. महापाप केले. आता ते निस्तरायचे कसे? ते अगदी बेचैन झाले. थेटरात यावल तालुक्यातले सगळेच मोठमोठे वकील आयतेच आलेले पाहून, त्या पंचांनी आपली भानगड त्यांना सांगितली नि हे पाप कसे निस्तरायचे, याचा सल्ला विचारला. वकिलांनी प्रथम फौजदाराची मदत घेऊन त्या तरुण जोडप्याला आपल्या ताब्यांत घेतले आणि पंचासंह सगळेजण मोटारलॉरीत बसून यावला गेले. तेथे मसूरकर संन्यासी आणि इतर यावलकर शास्त्रीमंडळींचा सल्ला घेऊन त्या जोडप्याचे सार्वजनिक खर्चाने आणि थाटाने सकाळी नऊ वाजता वैदिक विधीने लग्न लावून टाकले आणि नाट्यप्रयोगाच्या परिणामाचे श्रेय जाहीर रीतीने स्वीकारण्यासाठी मला तेथे बोलावून नेले. मला केवढा आनंद झाला असेल? माझ्या डोळ्यांतून घळघळा आसवे वाहू लागली! ज्या मंडळींनी हे कार्य घडवून आणले, त्या सर्वांच्या पायावर मस्तक ठेवण्याच्या निश्चयाने मी उठलो, पण मसूरकर बुवांना प्रणाम केला म्हणजे आम्हा सगळ्यांना तो मिळाला, असा पुकारा झाल्यामुळे मी त्या संन्यासी महाराजाच्या चरणांवर मस्तक ठेवले. टाकलेलं पोर नाटकाच्या पहिल्याच जाहीर प्रयोगाचा हा असा इतिहास घडलेला आहे. चित्तरंजन नाट्यसमाजाने पंधरा-वीस प्रयोग केल्यानंतर, लालबाग परळचे काही हौशी कल्ब मधूनमधून दामोदर हॉलमध्ये याचे प्रयोग नेहमीच करीत असतात. मागासलेल्या पण महत्त्वाकांक्षी समाजातल्या नाट्यप्रेमी मंडळींना कर्णासारख्या धनुर्धराच्या चरित्राची विशेष चटक लागावी, हे साहजिकच आहे. मराठी रंगभूमीला मर्त्य पृथ्वीवरून स्वर्गीय ऐश्वर्याचे आनंदसाम्राज्य देण्यासाठी आपल्या कलावंत जीवनाचे पापड भाजणाऱ्या पांढरपेशा शहरी शहाण्यांनी काय म्हणून या नाटकाची दखल घ्यावी? त्यात पाश्चिमात्य इबसनी तंत्र नाही किंवा शॉचे मंत्रही नाहीत.

परशरामपंती वेणीसंहार नाटकाच्या धाटणीवर लिहिलेले जुन्या दिमाखाचे हे नाटक! तशात ते ठाकऱ्यांचे! असणार काय त्यात शिव्यांशिवाय आणखी? शुद्ध सात्विक पवित्र ओव्यांचेच आमरण सुस्कारे सोडीत जगणाऱ्या शहरी नि संभावित नाट्योत्कर्ष-साधकांना या नाटकात काही राम दिसला नाही, तरी गिरण गावातल्या बहुजनसमाजातल्या भगिनी बांधवांना माझ्या टाकलेल्या पोराने चांगलीच चटक लावली आहे, यातच मी धन्यता मानतो, त्यांच्याच विचार-क्रांतीसाठी मूळ मी हे लिहिले. बलवन्त ग्रंथ भाण्डाराचे मालक सेन्ही महाशय परचुरे यांनी स्वयंस्फूर्तीने या दुसऱ्या प्रकाशनाचे कार्य अंगावर घेतले. याबद्दल मी त्यांचा खरोखरच फार आभारी आहे. जोशी बिल्डिंग, रानडे रोड, महाराष्ट्राचा नम्र सेवक एक्स्टेन्शन मुंबई नं. २८ केशव सीताराम ठाकरे ता. १ ऑगस्ट सन १९४९ पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना महाभारत महाकाव्याचा चिकित्सक स्वाध्याय करीत असताना, त्यातल्या कर्णाच्या भूमिकेने मला चटका लावला होता. तशातच सन १९३० साली कर्जत (जि. कुलाबा) मुक्कामी महाराष्ट्र नाटक मंडळींचा कै. शिवरामपंत परांजपेकृत पहिला पांडव नामक नाटकाचा प्रयोग पहाण्याची संधी लाभली. कर्णासारख्या उदारचरित पुरुषोत्तमाचे कथानक आणि शिवरामपंत परांजप्यासारखा तर्ककुशल रसाळ लेखक! फार मौज अनुभवायला मिळेल, अशा आशेने मी नाटकाला गेलो पण – निराशेने नि संतापाने घरी परत आलो. इतक्या अर्कट ‘भटो’ वृत्तीने कर्णचरित्राची विटंबना शिवरामपंतासारख्या स्वाभिमानी नि स्वदेशाभिमानी माणसाला करवली तरी कशी? याचा अजूनही मला अचंबाच वाटत आहे. ‘मला कोणीतरी