टाकलेलं पोर

कर्णाच्या जीवनावरचं नाटक. कर्णाला हिरो बनवणारं राधेय आणि मृत्यूंजय या कादंब-या जन्माला येण्च्या फार पूर्वी आलेले हे नाटक. कुमारी मातांच्या प्रश्नावर अप्रत्यक्ष प्रकाश टाकते.

 

(तीन अंकी पौराणिक नाटक)

लेखक – ‘प्रबोधनकार’कार केशव सीताराम ठाकरे

प्रकाशक - बलवन्त पुस्तक भाण्डार गिरगांव नाका, मुंबई नं. ४

आवृत्ति २री १ ऑगस्ट, १९४९ [किंमत १।। रुपया]

Censored and licensed For Stage Performance by The Commissiner of Police Bomaby, under License No. 40 of 1939 20th February 1939

या नाटकाच्या प्रयोगाचे नि प्रकाशनाचे हरएक हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.

प्रयोगासाठी लेखी परवानगी घेतलीच पाहिजे.

जोशी बिल्डिंग, रानडे रोड, केशव सीताराम ठाकरे एक्स्टेन्शन मुंबई नं. २८

प्रकाशक मुद्रक त्रिंबक विष्णु परचुरे

कृष्णाजी नारायण सापळे बलवन्त पुस्तक भंडार,

रामकृष्ण प्रिं. प्रेस जुडेक्स बिल्डिंग, गिरगांव, मुंबई नं. ४ त्रिभुवनरोड, मुंबई ४

दुसऱ्या आवृत्तीचे प्रास्ताविक

बोल माझे नाट्याभिनय-कुशल दिवंगत स्नेही विठोबा झावबा यांच्या जिव्हाळ्याच्या खटपटीने, त्यांच्या चित्तरंजन नाट्य समाजाने हे नाटक मुंबई शहरात प्रथम ता. ५ मार्च सन १९३९ रोजी सकाळी ९ वाजता रॉयल ऑपेरा थिएटरात रंगभूमीवर आणले. यापूर्वी सन १९३३ साली डेक्कन स्पार्क्स नाट्यसंस्थेने या गद्य नाटिकेच्या दोनच अंकांचा पहिला रंगी प्रयोग खानदेशातल्या फैजपूर मुक्कामी केला होता. या प्रयोगाच्या प्रसंगी तेथे घडलेली एक घटना नमूद करून ठेवण्यासारखी आहे. त्या वेळी यावल येथे माझे स्नेही रावसाहेब रामचंद्र हरि मिरजकर बी. ए. एल्एल्. बी. सबजज्ज असल्यामुळे तथल्या सर्व वकीलमंडळीचा नि इतर सरकारी अधिकाऱ्यांचा माझा स्नेह जमला, अर्थात टाकलेलं पोर नाटकाच्या पहिल्या मंगल प्रयोगाला येण्याचे मी सगळ्यांना निमंत्रण दिले. मिरजकरही सर्व अधिकारी नि वकील मंडळी अगत्याने आली. थेटरही चिक्कार भरले, स्त्रीवर्गही बराच आला होता. पडदा वर गेला. प्रयोग एकसारखा रंगत गेला, प्रेक्षकांनी फार वाहवा केली. प्रयोग संपल्यानंतर निमंत्रित पाहुणे मंडळींना चहापान देण्याची गडबड चालली असताना, गावातले चारपाच लोक एक दोन वकिलांना खुणा करून बाहेर घेऊन गेले. आस्ते आस्त सगळेच वकील थेटराबाहेर कसल्यातरी गंभीर चर्चेत गुंतल्यासारखे दिसले, मामलतदार मुसफ रजिस्ट्रार एवढ्याच मंडळींशी मी बोलत बसलो, बाहेर काय भानगड चालली आहे, याचा आम्हाला काही अंदाजच लागे ना. तेथल्या घोळक्यात लवकरच फैजपूरचे फौजदारही सामील झालेले दिसले, थोड्याच वेळाने ‘चला चला निघा’ असा बाहेरच्या वकील मंडळींचा निरोप येताच, मिरजकरादि अधिकारी मंडळी उठली आणि सगळेजण लॉरीत बसून आमचा निरोप घेऊन परत यावलला गेले. दुसरे दिवशी रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला यावलहून मिरजकरांचे तातडीचे पत्र घेऊन एक इसम मोटार घेऊन मला यावलला नेण्यासाठी आला. ‘पत्रदेखत निघून यावे’ एवढाच मजकूर त्या चिठ्ठीत होता. यावलला पोहोचताच एका शृंगारलेल्या सार्वजनिक दिवाणखान्यात माझा प्रवेश झाला. अधिकारी, वकील मंडळी आणि नागरिक तेथे थाटाने बसले होते.

पानसुपारीची तबके, अत्तर-गुलाब, हार तुरे वगैरे थाट होता. सर्वांच्या वतीने मुसफ मिरजकर यांनी माझे स्वागत करून एका प्रमुख ठिकाणी बसवले. शेजारीच मसूरकर महाराजांच्या संप्रदायातले एक संन्याशी बसले होते, हे काय प्रकरण आहे, याची मला काही अटकळच होईना! इतक्यात एक नवविवाहित जोडपे दिवाणखान्यात आले. ‘‘हां, पडा आधी यांच्या पाया’’ असे संन्याशीबुवांनी सुचविताच, त्या वधुवरांनी माझ्या पायांवर आपापली मस्तके ठेवली. संन्यासी म्हणाले - ‘‘ठाकरेसाहेब, हा आपल्या टाकलेलं पोर नाटकाच्या प्रयोगाचा शुभमंगल परिणाम; द्या वधूवराला आशीर्वाद.’’ मी आशीर्वाद दिला. पण अचंब्यात पडलो, नंतर पानसुपारी अत्तर गुलाब हार तुरे समारंभ आटोपल्यावर, जमलेल्या मंडळींनी सगळा खुलासा केला. तो असा --- फैजपुरातल्या भावसार समाजातली एक अविवाहित तरुणी गरोदर असल्याचे उघडकीला आले. जमातीत चर्चा चिकित्सा चालू झाली. मुलीला घराबाहेर काढली नाही तर बापावर बहिष्कार घालण्याच्या जमात-पंचांच्या धमक्या चालू झाल्या. एका भावसार तरुणाने थिटाईने पुढे येऊन, ‘माझे तिचे