शिवाजीचा वनवास : Page 4 of 4

वाघांचा सर्वत्र दणदणाट उडाला, सगळीकडे साखरा वाटल्या गेल्या, असे बादशाही थाटाचे चित्रण दाखविले आहे. बोला, इतिहास खरा का हा बोलपट खरा? का या नाटक सिनेमावाल्यांना नि कथा कादंबरीकारांना इतिहास म्हणजे आपली खासगत इस्टेट वाटते? हवी तशी उधळावी, माधळावी, आमचा कान कोण पकडणार? इतिहासात घालघुसड करणारे नतद्रष्ट करंटे आजवर काय झालेच नाहीत? रगड झाले नि होत आहेत. दस्तऐवजी स्पष्ट मजकुरावरही हवा तो व्युत्पत्ती अर्थ बसविणारे तथाकथित चिकित्सक राजवाडे होतेच ना? चित्पावन या शब्दातला चितेचा संदर्भ दडपण्यासाठी, राजवाड्यांनी (पावन चित्त झालेले) आणि क्षितिपावन (पृथ्वीला पावन करणारे) असे दोन नवे शब्द ठासून रूढ केलेच ना? हे कशाला?

अगदी ताजे उदाहरण देतो. शाहीर कविवर्य नारायण रामचंद्र मोरे यांनी अनेक वर्षे श्रमून, ‘शिवायन महाकाव्य’ रचिले. त्याला प्रस्तावना लिहिण्याचे आणि प्रुफे तपासण्याचे काम ठाणे येथील श्री. रा. म. आठवले या गृहस्थाकडे सोपवले. शिवाजीच्या प्राथमिक उद्योगात फक्त मावळातले मराठे, कायस्थ प्रभू आणि दादोजी कोंडदेवासारखा एकादा देशस्थ ब्राह्मणच काय ते सहभागी होते. त्या काळी घाटमाथ्यावर चित्पावनांचे नावही ठावे नव्हते आणि तेथे त्यांची वस्तीही नव्हती. तरीही रोहिडेश्वराच्या देवळात तरुण शिवाजीने स्वराज्याची शपथ घेताना जे निष्ठावंत सहकारी बोलावले, त्यात तानाजी, येसाजी, बाजी कदम, घाटगे आंग्रे रणदिवे पालकर, कीर इत्यादींच्या यादीत पटवर्धन घुसडलेला (पान ७७) आढळतो. हा चित्पावन एकाकी याच बैठकीला कसा काय अवतीर्ण झाला? हा जबरदस्त शोध खुद्द मोरे शाहिराचा का प्रुफे तपासणाऱ्या ‘पट्टीचे इतिहास संशोधक’ महाशयांचा, याचा आता शोध घेणे जरूर आहे.