शिवाजीचा वनवास : Page 3 of 4

निघून गेले. तेथल्या गडावर तिला नजरकैदेत ठेवण्यात आले, आणि शिवाजी? जिजाबाईच्या एका निष्ठावंत सेवकाने बालशिवाजीला आधीच चोरमार्गाने शिवनेरीपार केला होता. तो सेवक नि त्याची बायको या दोघांनी त्याला पोटच्या पोरापेक्षाही अधिक आपुलकीने सांभाळीत, तब्बल दोन वर्षे मावळांतल्या खेड्यापाड्यांतून वनवासातला काळ लपतछपत काढला. खेडोपाडी मोगली लुटारूंच्या टोळ्या कसकसले उत्पात करीत असत, व त्याचे भयानक देखावे बालशिवाजीला प्रत्यक्षच अनुभवता आले. महाराष्ट्र ही मऱ्हाठ्यांची मायभूमी आणि तिथे या परक्या जुली इस्लामी सत्ताधऱ्यांचा असला अमानुष हंगामा जातिवंत मऱ्हाठ्यांनी का चालू द्यावा? कोणीच कसा प्रतिकार करीत नाही? मावळातले अधिकारी मराठे देशमुख. त्यांच्याकडे लोकांनी तक्रारी केल्या तर ते म्हणायचे, ‘‘काय करणार? आज ते सत्ताधारी आहेत ना?’’ या विचारांनी बालशिवाजी अगदी भारून जात असे. दोन वर्षांनी काहीतरी हिकमत करून जिजाबाई बंधनातून निसटली आणि आपल्या पोराच्या शोधासाठी तिने मावळप्रांत पायदळी तुडविल्यावर, मायलेकाची एका खेड्यात गाठभेट झाली.

या अवधीत दिल्ली नि विजापूर यांच्यातील तंटा मिटला होता आणि लढाया छापे हल्ले थांबले होते. तेव्हा शहाजीने जिजाबाई नि शिवाजी यांना जंगली जीवनातून शहरी जीवनात आणण्यासाठी मेणे-पालखी नि स्वार रवाना केले. विजापुराकडे जात असताना, मोगली फौजांनी महाराष्ट्र देश किती उजाड नि उद्ध्वस्त करून टाकला आहे, मंदिरे पाडून टाकलेली आहेत, गावेच्या गावे जाळली आहेत, याचे देखावे बालशिवाजी पाहत होता. विजापूर जवळ येत चालले तसे त्याला इस्लामी राजधानीच्या ऐश्वर्याचे काही न्यारेच दर्शन होत गेले. शहरातील देखाव्यांनी त्याच्या विचारात संतापाचे तुंबळ मंथनच चालू झाले. मऱ्हाठ देशाला लुटून मारून या इस्लामी शास्त्यांनी आपले ऐश्वर्य असे वाढविले आहे काय? जन्मल्यापासून तब्बल आठ वर्षांनी शहाजीसमोर बालशिवाजी प्रथमच उभा राहिला. ‘हा तुझा बाप’ म्हणून कोणी कितीही प्रस्तावना केली, तरी तेथे जिव्हाळ्याचे नि आपुलकीचे बीजारोपण थोडेच होणार? पण वडिलांचा मान राखला पाहिजे हा हिंदु संस्कृतीचा उपदेश मानून शिवाजी शहाजीबरोबर वागत असे. शिवाजीच्या विजापुरी जीवनाचा या पुढचे इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच. फक्त तेथल्या एकाच घटनेचा उल्लेख करतो. बालशिवाजीला शहाजीने सुलतानाच्या दरबारात नेले असता, इतरांप्रमाणे नि बापाप्रमाणेही सुलतानाला ढोपरे टेकून मस्तक जमिनीला टेकून मुजरा करायला बालशिवाजीने स्पष्ट नकार का दिला? या ‘कां’तच त्याच्या मनोधारणेची कमावणी कसकशी होत गेली, याचे गूढ साठविलेले स्पष्ट दिसते. हा वनवासाचा इतिहास का दडवला जातो? अत्यंत हीनदीन दारिद्र्यग्रस्त अवस्थेत जन्माला येऊन, पुढे स्वपराक्रमाने शककर्ते सिंहासनाधीश्वर झालेले नरवीर जगाच्या नि भारताच्या इतिहासात कोणी झालेच नाहीत की काय? मग शिवाजीच त्याला अपवाद ठरविण्यात संशोधकांना लाज का वाटावी? पण येथे ‘ठरविण्याचा’ प्रश्नच नाही. हा सत्य परिस्थितीचा खराखुरा इतिहास आहे.’

डेनीस किंकैड (हा सी. ए. किंकैड या सुप्रसिद्ध आंग्ल इतिहासकाराचा पुत्र ) या आंग्ल इतिहासकाराने तो आपल्या ग्रॅण्ड रेबल या इंग्रजी ग्रंथात विस्तृतपणे नमूद केलेला आहे, आणि ज्येष्ठ नि श्रेष्ठ रियासतकार सरदेसाई यांनी या शिवाजीच्या वनवासाच्या सत्याला पाठिंबा दिलेला आहे. आंग्ल इतिहासकाराने कितीही संशोधनपूर्वक लिहिले, तर ते मानायचेच नाही, असे दुष्टचक्र आमच्या इतिहास-संशोधकांनी केले आहे. कथा कादंबरीवाल्यांना सोडा. ते आपल्या स्वैर कल्पनांच्या बाजारात मनसोक्त वावरणारच. पण इतिहास संशोधनात हयात घालविणारेही जेव्हा हा इतिहास छापून, त्यावर एखाद्य रसाळ कादंबरीकाराच्या अवसानात निराळ्यात मनोरंजक कल्पित घटनेचा आकर्षक देखावा निर्माण करतात, तेव्हा मात्र…..? मिरजेचे इतिहास-तपस्वी खरे यांनी आपल्या ‘शिवसंभव’ या नाटकात जाधवरावाने आपल्या ‘लाडक्या जिजा-कन्येला’ स्वतःच्या राजेशाही वाड्यात श्रीमंती थाटाच्या वाड्यात ओटीभरणासाठी आणून, शिवरायाचा जन्म तेथेच दाखवला आहे. मग शिवनेरीची हकिकत खोटीच का मानायची की काय? सिनेमावाल्यांचा हात कोण धरणार? सर्व क्षेत्रांत ते पडले मुक्तेश्वर! कोल्हापूरच्या श्री. भालजी पेंढारकरांनी शिवचरित्रावर एक आकर्षक बोलपट काढला. त्यात शिवनेरीवर मोठमोठे महाल होते. दासदासींच्या टोळ्याच्या टोळ्या जिजामातेच्या दिमतीला हजर होत्या, शिवजन्म होताच