शिवाजीचा वनवास

प्रबोधनकारांच्या खासगी संग्रहात सापडलेले हे एक अप्रकाशित टिपण. हा एक सविस्तर लेख आहे की एखाद्या पुस्तकाची सुरुवात, याचा काहीच संदर्भ आहे. आज नव्या संशोधनानंतरच्या शिवरायांच्या इतिहासाशी विशेषतः राजे शहाजींविषयक मजकूर नव्याने तपासून पाहणं गरजेचं आहे, पण हे वाचताना हे टिपण अधिक सविस्तर आणि पूर्ण झालं असतं तर... अशी रुखरूख लागून राहते. प्रबोधनकारांनी अगदी शेवटच्या दिवसांत हे टाइप केलं असावं. छत्रपती शिवाजी हा प्रबोधनकारांचा जीव की प्राण आणि इतिहास हा त्यांचा ध्यास. त्यामुळे हे टिपण वाचण्यात एक वेगळाच आनंद आहे.

जन्मापासून दहाव्या वर्षापर्यंत शिवाजीचा वनवास सत्याचा शोध असा आहे महाराष्ट्र हा बुद्धिवाद्यांचा देश आहे, असे म्हणतात. बुद्धिवाद म्हणजे रॅशनलिझम् म्हणा अथवा इंटलेक्चुएलिझम् म्हणा, पण त्यालाही दोन बाजू आहेत. बुद्धिवाद हा आशीर्वाद असतो आणि शापही असतो. आमचा बुद्धिवाद शाप असावासे वाटते. शिवाजीच्या जन्मक्षणापासून तो तो विजापूरची सफर करून, मातोश्री जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांसह पुनवडीला (खेडुती पुण्याला) येऊन राहीपर्यंतच्या काळातल्या इतिहातील घटनांचा मऱ्हाठी इतिहास-संशोधकांनी, नाटके कादंबरीकारांनी, सिनेमावाल्यांनी अगदी मन मानेल तसा विचका करून टाकला आहे. आजकाल नाटके, कादंबऱ्या कथा कविता करणारे स्वतःला खंदे साहित्यिक म्हणवीत असतात आणि त्यांचीच संख्या सध्या फुगतच चालली आहे. प्रत्येक साहित्यिक स्वतःला एक स्वतंत्र अधिकृत संस्था समजून आपली विधाने ठणकावून लिहीत बोलत असतो. आम्ही सांगतो तेच गाळीव सत्य सगळ्यांनी मानले पाहिजे, असा त्यांचा दंभ असतो. ही हट्टवादी परंपरा महाराष्ट्रात राजवाडे या हेकेखोर इतिहास पंडिताने चाल केली. सामान्य जनांचे काय? हे मोठमोठे साहित्यिक सांगतात लिहितात, तेच ब्रह्मवाक्य मानून चालतात. गैरसमजांचे डोंगर उभारले जातात आणि त्याखाली ऐतिहासिक सत्ये, कायमची गाडली जातात. साहित्यिकांचा अथवा लोकांच्या मतांची पर्वा न करता. त्या सत्याचा पुरेपूर शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिवजन्म-तिथीचा वाद संशोधकांच्या वैयक्तिक हट्टवादाने बिचाऱ्या शिवाजीच्या जन्मतिथीलाच काळेकुट्ट ग्रहण लावायला सोडले नाही. सन १६२७ पासून तो सन १६३०पर्यंत यांच्या वादावादीचा खेळखंडोबा सारखा धुमाकूळ घालीत आहे. त्यातल्या त्यात १६३०वाल्यांचा हट्ट आणि शहामत फार दांडगी. लोकमत अनुकूल असो वा नसो, त्यांनी शालेय पुस्तकाच्या धड्यांतून आणि इतर कादंबऱ्यांतून त्या सनाचा मनस्वी छापील प्रसार करण्याचा धूमधडाका चालविलाच आहे. पण १६२७चा भरभक्कम पुरावा नि साक्ष द्यायला दादरचा शिवाजी पार्क खडा उभा आहे. सन १९२७च्या प्रारंभाला छत्रपति शिवाजी महाराजांची त्रिशतसांवस्तरी साजरी करण्याचा बूट निघाला आणि त्याच वेळी शिवाजी पार्क तयार होऊन त्याचे नाव काय ठेवावे याचा खडाजंगी वाद झाला.

१६२७च्या बाजूने राजवाडे, सरदेसाई, जदुनाथ सरकार, वाकसकरादि मोठमोठे योद्ध उस्तन्या सरसावून उभे राहिले. १६३० वाल्यांची लुडबूड त्यांनी मुळीच चालू दिली नाही आणि सन १९२७ सालच त्रिशतसांवत्सरीला बिचूक बरोबर आहे, असा स्पष्ट निकाल देऊन, पार्काचे नाव ‘शिवाजी पार्क’ असे ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर, तसा संगमरवरी चुबतराही तेथे उभारण्यात आला. यापूर्वीही सन १९२५ मध्ये नरसोपंत केळकर पोस्टर परिषदेसाठी बडोदे येथे आले असताना, रियासतकार सरदेसाई यांच्या घरी वाङ्मयमंडळाच्या सभेमध्ये, त्यांच्यासमोर १६२७ का १६३०, या वादाचे पूर्वपक्ष उत्तरपक्ष करण्यात आले. दोनही बाजूला खंदे वीर आपापले पुरावे मांडायला सिद्ध होते. शेवटी नरसोपंत केळकरांनी निकाल दिला की, ‘‘एकंदरीत या वादाचा जुनी तिथी (१६२७) चुकीची असून, नवी तिथी खरी असल्याबद्दल शाबितीचा बोजा फाल्गुन पक्षावर (१६३०) जबरदस्त असल्याने, तो समाधानकारक रीतीने आदा करण्यात आला आहे, असे मला वाटत नाही.’’ सन १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या मराठी रियासतीच्या २ऱ्या विभागात ‘वैशाख शु. २ शके १५४९ ता. ५ एप्रिल सन १६२७ रोजी मध्यरात्री शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला……’ जेधे शकावलीत फाल्गुन व. ३ शके १५५१ ही शिवाजीची जन्मतिथी नमूद आहे. या तिथीपेक्षा वर दिलेल्या (१६२७) तिथीने पुढील