शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 10 of 23

नंतर लवकरच शिवाजी महाराजांनी सुरू केल्या. ३. भाऊबंदकीच्या खटल्यासाठी या राजकीय कीर्दीच्या नकलांचा उपयोग होऊ लागला. आमच्या ज्या सिद्धांताची दत्तोपंतांनी टर उडविण्याच्या हेतूने बेंद्र्यांना पुढे केले, तोच आमचा सिद्धांत बेंद्र्यांनी जवळ जवळ आमच्याच शब्दांत ठासून सांगितला! म्हणजे आता त्याबद्दल दत्तोपंतास कुरकुर करण्यास जागाच नाही. शकावल्या इ. स. १६५८ च्या नंतरच जर अस्तित्वात आल्या असतील, तर त्यांत असलेले सन १६५८ च्या पूर्वीचे उल्लेख माहिती मिळवून टिपून ठेविले असतील, यांत मुळीच शंका नाही. आणि भाऊबंदकीसाठी जर या शकावल्या नकलल्या गेल्या असतील, तर शिवाजी व व्यंकोजी यांचे भाऊबंदीचे भांडण होतेच विशेषतः वडीलकीसुद्धा सर्व वाटा व्यंकोजीने पचविला होता तो पुराव्याने सिद्ध करण्यासाठी त्यानेच ही नवी शिवजन्मतिथी गणित वगैरे करवून, तिथिवारांचा मेळ घालून आपल्या शकावलीत लिहून ठेविली असेल व प्रचलितही केली असेल. या तर्कास बृहदीश्वर शिलालेखांत सुद्धा आधार आहे. ‘‘तदनंतर शिवाजीराजास वडील सावत्र मातुश्री तुकाई आऊसाहेब यांचे उदरी जन्म पावले वकोजी महाराज यांस पेसजी शहाजी राजांनी येकोंजी राजे वडील, संततीकरिता कुलदैवत व आपली पहिली बिरुदें……त्यांस देऊन….ब्यंगळूर राज्यास पाठविले.’’ सारांश आपण वडिल आहोत हे दाखविण्याचा व्यंकोजी प्रयत्न करीत होता, हे निःसंशय आहे त्या अर्थी ही फाल्गुनातील तिथि त्याने अथवा त्याच्या भक्तानेच बनविली असली पाहिजे. मात्र तिची सत्यासत्यता पारखण्यास व्यंकोजीची जन्मतिथि संशोधकांनी पाहून काढिली पाहिजे. गद्रे - हा तर्क संभवनीय आहे, परंतु तंजावर शिलालेखात याच्या उलट प्रतिवादन दिसते तेथील वाक्ये देतो ‘‘इतक्यांत जिजाबाईसाहेब यांस पूर्ण गर्भ होता तो शालिवाहन शके १५५१ त्यास इंग्रजी वर्ष सन १६२८ इसवी प्रमोदूत संवत्सरी प्रसव होऊन पुत्रोत्छव जाहला – सवेच शाहजीसाहेब यांचे पोटी पुत्रसंतान जाहाले! त्या पुत्रास येकोजी राजे नाम ठेविले!’’ यावरून येकोजीचा जन्म शके १५५१ मध्ये झाला असे तो शिलालेख स्पष्टच सांगतो. शिवाजीच्या जन्माचा शक त्याला माहीत नव्हता. पण इसवीसन सांगून शकही सांगण्याचा त्याने प्रयत्न केल्याने इ. स. १६२७ हाच सन त्यावेळी सुद्धा मान्य असे दिसते. कारण त्याने इ. स. १६२८ असा शिवजन्मसन दिला आहे. व्यंकोजी जन्मतिथि मात्र दिली नाही. ती मिळाली तर बरे होईल. कारण एकोजी शिवाजीपेक्षा लहान होता. म्हणून ती तिथी शके १५५१ च्या फाल्गुन वद्य तृतीयेनंतरची असावयास पाहिजे.

आपटे - कितीतरी इंग्रजी लेखकांनी शिवाजीचा जन्म इ. स. १६३० मध्ये झाल्याचे पर्यायाने म्हटले आहे. गार्डा नावाच्या पाश्चात्त्याने शिवाजीसंबंधाने जे लिहिले आहे त्यावरून शिवजन्म इ. स. १६३०मध्ये झाला असेच सिद्ध होते. वाकसकर - गार्डाच्या इतिहासाचा विचार माग प्रकरण २मध्ये [पृष्ठ ४४] केला असल्याने पुनः त्याचे नाव काढू नये. त्याने आपले शिवचरित्र इ. स. १६९५मध्ये लिहिले असले तरी ते प्रत्यक्ष अनुभवाचे नसून कर्णोपकर्णी दंतकथांच्या आधारे रचिलेले आहे. खरे ले. ६१४८ व ६१९० ही पत्रे इ. स. १८०१ मध्ये लिहिली असून त्यात शिवजयंती मिळविण्याच्या प्रयत्नाचा उल्लेख आहे. ती मित्ती व सन इ. स. १६२७हून भिन्न असती तर त्यांचा निर्देश त्या पत्रांच्या नंतर तरी झालाच असता. तो नाही त्या अर्थी श्री. आपटे यांची तोतया मिती खरी म्हणून तोपर्यंत तरी पुढे आली नसावी. सरदेसाई - शहाजी शके १५४८ मध्ये निजामशाही सोडून विजापुरास गेला व पुढे तीन चार वर्षे त्याची व जिजाबाईची भेट नाही, त्यामुळे शके १५५१मध्ये जिजाबाईला मुलगा होणेच शक्य नाही. दत्तोपंत - शहाजीच्या हालचालाची तक्ता अद्यापी ठरवावयाचा आहे. ईलियट व डॉसनवरून मी तो ठरविला असून तो शके १५५१च्या शिवजन्माशी उत्तम जुळतो. किंबहुना जाधवराव व शहाजी यांची लढाईसुद्धा सके १५५१च्या शिवजन्मापूर्वी जुळविता येते. मात्र असे करताना जाधवरावाचा खून शके १५५१च्या श्रावणात दिला आहे तो चुकीचा मानून व जदुनाथ सरकार म्हणतात त्याप्रमाणे शके १५५२ मध्ये तो खून