शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 7 of 23

येते. असे असता ही वजाबाकी ४६ वर्षेच येते असे सांगणाऱ्याची धन्य होय! दिवेकर - अहो तुम्ही अगदी दिवसामासांची कसली वजाबाकी करीत बसला! यांत एखाद्या वर्षाचा घोटाळा होतो हे आम्हांला कबूल आहे. पण माणूस साधारण ठोकळ मानानेच आपले वय सांगतो, असे समजूनच आम्ही हा वयाचा मेळ बसविला आहे. तुम्ही आता साखरेची साल उगीच काढीत बसू नका. मुकाट्याने ही फाल्गुन तिथि मान्य करा झाले! दत्तोपंत - तंजावर येथील बृहदीश्वराच्या शिलालेखांतही शिव-जन्मशक १५५१च दिलेला आहे. म्हणजे शके १५५१ चे साक्षीदार दोन झाले. दाजीसाहेब - शिलालेख सन १८०३मध्ये कोरलेला आहे. त्यांत शके १५५१ ला इ. स. १६९८ दिलेला आहे. जिजाबाई ही शहाजीची प्रथम पत्नी असून शिलालेखांत तिला दुसरी पत्नी म्हटलेले आहे. व व्यंकोजीची मातुश्री तुकाबाई हीच प्रथम पत्नी असल्याचे सांगतले आहे. अशा अनेक चुका त्यांत आहेत. म्हणून बृहदीश्वरशिलालेखाचे प्रमाण अगदीच त्याज्य आहे असे तुम्हांसही नाही का वाटत? राजवाडे – ‘शके १५५१ श्रावणी पूर्णिमेस लखुजी जाधवराव निजामशहानी मारिले’ असे जेधे म्हणतो. आता लखुजी जाधवराव जर शके १५५१ च्या श्रावणी पूर्णिमेस मारला गेला, तर त्याच सालांत त्या नंतरच्या फाल्गुनात त्या मेलेल्या लखुजी जाधवरावाने शहाजीचा पाठलाग केला कसा? त्या पाठलागात शहाजीने जिजाबाईस शिवनेरीस ठेविली कशी व तेथे शिवाजी जन्मला हे तरी कसे संभवावे? लखुजी जाधवराव श्रावणी पौर्णिमेला मारला गेला ही गोष्ट उभयसंमत आहे, तेव्हा अर्थात जेधे शकावलीतील शिवजन्माचा उल्लेख चुकीचा असला पाहिजे; कारण शहाजीवरची जाधवरावाची स्वारी शके १५४८ च्या पावसाळ्यानंतर सुरू होऊन जाधवरावाच्या रेट्यापुढे शहाजी माहुली, जुन्नर, पारनेर, करकंब, मंगळवेढे या रस्त्याने आदिलशाहीत शके १५४९ च्या चैत्राच्या सुमारास रेटला गेला या बाप-आज्यांचा रेटारेटीनंतर शिवाजीराजे यांचा जन्म शिवनेरीस १५४९ च्या वैशाखात झाला असे बहुतेक नव्याजुन्या इतिहास लेखकांचे म्हणणे आहे.

जेधे शकावली व बृहदीश्वर शिलालेख शिवाजीचा जन्मकाल शके १५५१ फाल्गुन वद्य ३ देतात. या दोहोंतून खरे साल कोणते ते ठरविण्यास निश्चित प्रमाण उपलब्ध आहे, त्यावरून शके १५४९ हे साल शिवजन्माचे धरणे योग्य दिसते, का की शके १५५१ च्या चैत्रापासून आश्विनापर्यंत शहाजीवर जुन्नर-माहुली प्रांतांत कोणीही स्वारी केली नाही व स्वारी करणारा म्हणून म्हटलेला जो लखुजी जाधवराव त्याचा खून मूर्तिजाने शके १५५१ च्या श्रावणी पूर्णिमेस केला होता. दत्तोपंत – पण जाधवरावाच्या या स्वारीची कथाच काल्पनिक आहे असे मानिले म्हणजे हा वाद आपोआप मिटतो. ही स्वारी झाली असे सांगणारा समकालीन असा एकही साक्षीदार नाही ही साक्ष बखरींची आहे आणि सगळ्या बखरी अठराव्या शतकात उत्तरार्धात व एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रचल्या गेल्या आहेत असे सहज सिद्ध करता येते. दाजीसाहेब - नाना फडणविसाने सवाई माधवरावासाठी तयार करविलेली बखर राजवाज्यांच्या चौथ्या खंडात असून तिच्यात ही लखुजीच्या स्वारीची कथा आहे. नानासारख्या चौकस माणसानेही बखरीत गप्पाच संग्रहीत करणे शक्य नाही. वाकसकर – शिवदिग्विजय ही बखर शके १६४० म्हणजे सन १७१८ मध्ये लिहिली असून तिच्यातही या जाधवरावाच्या स्वारीचा उल्लेख आहे. दत्तोपंत - शिवदिग्विजय बखर शके १६४० मधली नसून शके १७४० म्हणजे सन १८१८ मधील आहे हे दीक्षितांनी संवत्सराच्या नावावरून सिद्ध केले असून तो शक राजवाड्यांनाही मान्यच झालेला आहे. राजवाडे – छे! असा भलताच आरोप माझ्यावर करून लोकांचा बुद्धिभेद करू नका. चिटणीसांच्या बडोदे येथील घराण्यापैकी कोणीतरी ही बखर लिहिली असावी असा अंदाज आहे, किंवा लिहिली म्हणण्याच्या ऐवजी उतरून किंवा नक्कल करून किंवा जुळवाजुळवी करून घेतली असेही म्हटले तरी चालण्यासारखे आहे, का की, ह्या बखरीतील भाषा सन १८१८तल्या सारखी बिलकुल दिसत नसून तिजवर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धाची झाक मारीत आहे, मल्हार रामराव चिटणीस ह्यांनी इ. स. १८१० त लिहिलेल्या शिवाजीच्या चरित्राची भाषा ह्या बखरीहून