शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 5 of 23

चालली आहे, दरसाल शिवरायाच्या नावाने पंथभेदाचा शिमगा खेळला जात आहे, इतर प्रांतीय लोक तो पाहून कुचेष्टेने गालांतल्या गालात हासत आहेत, हा सारा प्रकार थांबावा, ही एकच माझी प्रामाणिक इच्छा या पुस्तकाच्या प्रकाशनामागे आहे, हे लक्षात ठेवूनच वाचकांनी आता श्री. वाकसकरांनी थाटलेल्या वादाच्या बैठकीच्या दालनात प्रवेश करावा. शिवजन्मतिथीच्या – वैशाख फाल्गुन वादकांची बैठक अध्यक्ष – नरसिंह चिंतामण केळकर सभासद – (१) दत्तोपंत आपटे *(पुणे), (२) ज. स. करंदीकर (पुणे), (३) रावबहादुर गोविंदराव सरदेसी, (रियासतकार) कामशेत, (४) दाजीसाहेब आपटे (बडोदे), (५) सर जदुनाथ सरकार (पाटणा), (६) विनायक सदाशिव वाकसकर (बडोदे), (७) दिवेकर (कल्याण), (८) आबा चांदोरकर (पुणे), (९) इतिहासाचार्य राजवाडे *(धुळे), (१०) शंकरराव जोशी (वाई), (११) वा. सी. बेन्द्रे (पुणे), (१२) गद्रे (वाई), (१३) वेणीप्रसाद, (१४) गौरीशंकर ओझा, (१५) चिंतामणराव वैद्य* (कल्याण) दत्तोपंत - +आजपर्यंत वैशाख शुद्द २ ला शिवजयंती करीत असत, पण आता ती तिथि टाकून देऊन फाल्गुन व. ३ला शिवजयंती केली पाहिजे, असे मी म्हणतो. कारण जेधे शकावलीत शिवजन्माची मितीवार नक्षत्रांसह दिली असून, गणिताने तो तपशील बरोबर मिळतो, जेधे शकावलीत असा शेकडो मित्या दिल्या असून त्या अगदी बरोबर हेत. वैशाख शु. २ ही तिथि बखरीतील असून शिवाय बखरीत १, २, ३, ५, १५ अशाही विविध तिथ्या दिलेल्या आहेत. शिवाय बखरीत शक संवत्सर मिति, वार यांचा मेळ नाही. म्हणून मी म्हणतो बखरीतील तिथि त्याज्य आहे व ही जेधे शकावलीतील तिथीच ग्राह्य आहे. *हे आज दिवंगत आहेत. + दत्तोपंत पोतदार नव्हेत. दत्तोपंत आपटे. सध्या फाल्गुन पक्षाचे अध्वर्यु मात्र म. म. दत्तोपंत पोतदारच आहेत. करंदीकर – फाल्गुन व. ३ला शिवजन्म झाला हे ग्रहांवरूनसुद्धा मी सिद्ध करू शकतो. आजपर्यंतची शिवरायाची पत्रिका अगदीच गचाळ आहे. ही फाल्गुनातील तिथीची पत्रिका मी पांच पंचवीस ज्योतिष्यांच्या सहाय्याने बनविली आहे आणि शिवचरित्राशी ती तंतोतंत जुळते. म्हणून फाल्गुन व. २ ही शिवजन्माची मिती असल्याबद्दल बालंबाल खात्री पटते. सरदेसाई – जेधे शकावलीतील काही मित्या विश्वसनीय आहेत यांत संशय नाही, पण शिवजन्माबद्दलची तिच्यातील मिती आम्हाला पटत नाहीत. वैशाख शु. २ आणि फाल्गुन व. ३ यांतील अमुकच खरी व अमुकच खोटी असा बिनतोड पुरावा पुढे आलेला नाही. म्हणून उत्सवाची तिथि बदलण्याची घाई करू नये असे मला वाटते. आपण या बाबतीत संशोधन करू या. दाजीसाहेब – ग्रहांवरून फाल्गुनात शिवजन्म झाला असे मला मुळीच वाटत नाही. तात्यांनी बनविलेली पत्रिकाच इतकी अपयशी आहे की तिला शिवजन्म झाला असे म्हणणे म्हणजे फलज्योतिषच खोटे आहे, असे म्हणावे लागेल. जीवनराव चिटणीसांनी वैशाख शु. २ ची शिवरायाची केलेली पत्रिका सर्वोत्कृष्ट आहे. तिच्यावर एकही आक्षेप येऊ शकत नाही. नरसोपंत – ऐतिहासिक वादांत ज्योतिष घालणे बरोबर नाही हा वाद फक्त ऐतिहासिक प्रमाणावरच चालावा असे माझे मत आहे. जदुनाथ – हे अगदी बरोबर आहे. जेधे शकावलीतील पुष्कळ मित्या बरोबर आहेत, पण शिवजन्माची मिती चुकीची आहे असे मला आता वाटते.

माझ्या शिवाजीच्या पहिल्या आवृत्तीत मी जेधे मिती घेतली होती, पण दुसऱ्या आवृत्तीत ती चुकीची म्हणून टाकून दिली आहे. जेधे मिती चुकीची आहे याला कारण असे की, जेधे शकावलीत शके १५५१ मध्ये शिवजन्म, इभराहिम इदिलशहाचा मृत्यु आणि जाधवरावाचा खून अशा तीन बाबती दिलेल्या आहेत. त्यापैकी इदिलशहाचा मृत्यु आणि जाधवरावाचा खून या दोनही बाबती निखालस चुकलेल्या आहेत त्याअर्थी शिवजन्मही चुकलेला असावा असे मला वाटते. दत्तोपंत – इदिलशहाचा मृत्यूचे विधान चुकलेले आहे असे म्हणता, पण ते खरे नाही. त्या कलमाची संगती मी तुम्हाला लावून दाखवितो. सबंध कलम असे आहे. ‘चैत्रमासी इभराम इदिलशहा परलोकास गेला, सुलतान महंमदशहा तख्ती बैसले, खवासखान