शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 4 of 23

तिथीचे मूळ कोठे असावे? ४. शहाजीच्या हालचाली कोणत्या शकास मिळत्या आहेत? ५. नवीन तिथीच्या साक्षीदारांची योग्यता काय? ६. समकालीन लेखांचा आधार कोणास किती आहे? ७. फलज्योतिषाच्या पुराव्यास महत्त्व कितपत द्यावे? ८. ब्रह्माच्या सनदेचे साल कोणते? ९. भिन्न भिन्न शकावल्यांचे प्रामाण्य स्वतंत्र समजावे काय? श्री. वाकसकरांच्या संभाषणात्मक बैठकीच्या वाचनात प्रस्तुत विषय अगदी सुटसुटीत आणि बालबोध केलेला वाचकांना आढळेल. आता कै. प्रो. भानू यांच्या लेखाविषयी थोडक्यात खुलासा करतो. सन १९२७ साल उजाडताच, छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा त्रिशत सांवत्सरिक जयंती महोत्सव साजरा करण्याची कल्पना निघाली. या वेळी फाल्गुनवादी एकदम विरोधाला उभे राहिले. तो महोत्सव १९२७ साली न करता, पुढ ३ वर्षांनी म्हणजे सन १९३० साली आणि तोही फाल्गुन वद्य ३लाच साजरा करावा, असा त्यांचा हेका चालू झाला. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीत वाद निघाला नाही तर आम्ही डोकेबाज मऱ्हाठे हो कसले? त्या वेळीही चर्चा चिकित्सेची रणधउमाळी माजली आणि इतिहासतज्ज्ञांच्या जोरदार बहुमताने फाल्गुवाल्यांना हार खावी लागली आणि सन १९२७ सालीच तो महोत्सव महाराष्ट्रभर मोठ्या स्फूर्तीने साजरा करण्यात आला. दादर (मुंबई) येथे याच सन १९२७ साली शिवाजी पार्क तयार झाला आणि तसा शिलालेखाचा स्तंभही तेथे उभा आहे. त्या सुप्रसंगाला उचित असा इंग्रजी मऱ्हाठी आणि गुजराथी भाषांतील अनेक इतिहास-पंडितांच्या संशोधकी लेखांचा ‘‘शिवाजी सुव्हेनिअर’’ नावाचा एक मोठा ग्रंथ प्रहसिद्ध करण्यात आला. त्यात के. प्रो. भानू यांचा ‘शिवजन्म तिथी खरी कोणती?’ हा त्कृष्ट स्पष्टवाची लेख समाविष्ट केलेला होता.

खऱ्या खरे आणि खोट्याला खोटे बिनदिक्कत म्हणण्यात प्रो. भानू चांगले प्रख्यात पावलेले संशोधक होते. त्यांनीही आपल्या लेखात जुन्या नव्या तिथीविषयी सप्रमाण केले खंडन मंडन विद्यमान पिढीला अभ्यासनीयच वाटेल, असा मला भरवसा आहे. श्री. वाकसकरांचा ‘जुळे तोतये’ हा ग्रंथ काय, अथवा ‘शिवाजी सुव्हेनिअर’ हा त्रिभाषी ग्रंथ काय, सामान्य वाचकांच्या वाचण्यात फारसे येणारे नव्हेत. मग त्यातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील लेखाकडे लक्ष जाणारच कोणाचे? शिवाय रहस्य कथा कादंबरीसारखे ग्रंथ ५-५ रुपये किमतीचे असले तरी आजकालचे त्यांचे रसिक ऋण काढून तेही विकत घेतील, पण इतिहास हा विषय त्यांच्या मोजमापाने रूक्ष! त्याची पुस्तके कोण कशाला विकत घेऊन वाचणार? आज मी हे दोनही लेख त्या मोठ्या ग्रंथांच्या तुरुंगवासातून सोडवून अल्प किमतीच्या स्वतंत्र पुस्तकाने भगिनी बांधवांच्या हाती देत आहे. त्यांचे त्यांनी आदराने स्वागत करावे. ऐतिहासिक संशोधनाच्या वादात पक्षाभिनिवेशाचा भाग बराच असला, तरी दोनही पक्षांतील विद्वानांची ती वादपद्धती अभ्यासू नि जिज्ञासू विद्यार्थ्यांनी अभ्यासण्यासारखी असते. शालेय पुस्तकांत निरनिराळ्या ऐतिहासिक घटनांविषयी जे लिहिलेले असते, ते कितपत खरे खोटे, याची चिकित्सा मननपूर्वक वाचण्यात बुद्धीला चोखंदळपणाची धार येते, दिसते तसे नसते म्हणून माणूस फसते, या व्यवहारी तोडग्याचा अनुभव पटतो आणि खऱ्याखोट्याची पारख करताना कसकसल्या कसोट्यांवर प्रत्येक मुकाबला, प्रत्येक मुद्दा कचकचीत घासून घ्यावा लागतो, याचे ज्ञान प्राप्त होते. पण काय करावे? चालू जमान्यात शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या अभ्यासाची अतोनात हेळसांड चालली आहे आणि जुन्या इतिहासतल्या (विशेषकरून मऱ्हाठ्यांच्या इतिहासातल्या) बऱ्याच सिद्ध घटना उलट्यासुलट्या करून नवा इतिहास चलनी करण्याच्या खटपटी चालू आहेत. या वादात पुणेकर आणि इतर असा जो विकल्प दर्शविण्यात येतो, त्याच्याशी मी मुळीच सहमत नाही. दोनही पक्षांतील वादकांच्या संशोधन-तपस्येबद्दल आणि पांडित्याबद्दल मला फार आदर आहे.त्यापैकी बहुतेक माझे स्नेहीत होते आणि आहेत.

परस्पर विचार-विनिमयाचे आणि मतवैशिष्ठ्यांबद्दल, स्नेहाला धक्का न लावता एकमेकांची खरपूस हजेरी घेण्याचे अनेक योगही आम्ही अनुभवले आहेत. मतभिन्नता म्हणजे शत्रुत्व, हा आजकालचा दण्डक आम्हा दोघांनाही मानवलेला नाही. सारांश, वैशाख किंवा फाल्गुन पक्षीय कोणाही वादकाच्या मताच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात कसलाही संशय अथवा विकल्प नाही, हे येथे मला कटाक्षाने नमूद केले पाहिजे. पण या वादाने लोकमताची जी निष्कारण चाळवाचाळव