शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 23 of 23

कागदावरून ती माहिती उपलब्ध झाली, तो अस्सल कागद प्रकट होत नाही, तावत्काल चिटणीसासारख्या स्वामिनिष्ठ पुरुषाचे ही वचन संशयित आणि त्याला अनुसरणाऱ्या ‘बहुसंख्य’ बखरकारादिकांचेही म्हणणे संशयग्रस्तच असणार. मग करावयाचे काय? संशयाकुल जन्मतिथीच पाळू नये असेच मी म्हणत नाही. जन्मतिथी पाळावी, उत्सव साजरे करावेच करावे. केव्हा? सर्व शिवभक्तांनी स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारा ‘भारत-इतिहास-संशोधक मंडळासारख्या अधिकारी मंडळांत एकत्र जमून शांत, निराभिमान मनाने ऊहापोह करावा आणि एकमताने वैशाखाचा किंवा फाल्गुनाचा महिना ठरवावा. आधी वाद मिटवावा.

प्रामाणिक वादाने संशोधन होईल, हे खरे आहे. पण अभिनिवेश नसेल तरच ‘वादे वादे जायते सत्यबोध’ हा न्याय सार्थ होईल. प्रस्तुतचा वाद अभिमान संवलित आहे. हा नको आजला तर्क वितर्क, वकिली कोट्या, उपालंभ, द्वेष यांची गर्दी मला दिसते. काळाचा श्रमाचा अपव्यय होतोसे वाटते. इतिहासाच्या दृष्टीने आपल्यास केवढाली तरी मोठमोठी कामे करावयाची आहेत? ‘तुटे वाद संवाद तो आदरावा’ या अर्थाची समर्थोक्ति पूज्य मानून हितकर, पथ्यकर, लोकसंग्राहक इतिहास-विषय हाती घेणे आज अत्यंत आवश्यक आहे. फाल्गुन नको, वैशाख नको, असेल तर शिवराज्यारोहणतिथि निःसंशय ठरली आहे, त्या दिवशी किंवा शिवराय ज्या तिथीला निजधामास गेले, तो दिवस संदिग्ध तिथि घेऊन शिवाजी महाराजांची पुण्यतिथि साजरी करू या. हेही नापसंत असेल तर इंग्लंडच्या वर्तमान राजाचा दिवस जसा राजाज्ञेने अमुक दिवशी पाळावा, असे ठरते, तसा एकमताने ठरविला गेला म्हणजे तोच दिवस पवित्र होईल. शिवरायाचे स्मरणच मंगलप्रद आहे. हेही जमत नसेल (परमेश्वर करो आणि असे न होवो!) तर ज्या पक्षाला जो दिवस ‘खरासा’ वाटेल, तो दिवस त्या त्या पक्षाने घ्यावा आणि उत्सव करावा. हल्लीच दोन पाडवे, दोन दसरे, दोन अधिक मास आपणा महाराष्ट्रीयांमध्ये रूढ होऊ पाहत आहेत ना? पण कसेही करावे आणि विनाकारण लेखण्यांची झोंबाझोबी होत आहे, ती गुण्यागोविंदाने मिटवावी. ‘भांडून भांडून आपण या दशेला आलो!’ हे सुप्रसिद्ध सखाराम बापू बोकील, पेशवाईतील पूर्ण शहाणे यांचे सुभाषित समजून घ्यावे आणि तदनुसार आचरण करावे. शुभं भवतु!! सरतेशेवटी श्री. वि. आपटे यांनी प्रेमभावाने मला हवी ती मदत दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो व त्यांस तत्सकाऱ्यांस ‘नमस्तेभ्य’ असे सविनय म्हणतो. या लेखांत कोठे कमीजास्ती अधिकउणा शब्द आला असेल, त्याबद्दल क्षमा मागतो आणि आपणा सर्वांस, महाराष्ट्रास व भारतवर्षास ‘शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चसन्त’ असे प्रार्थून हा लेख पुरा करितो.