शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 3 of 23

महत्त्वाची टीप देतात. ती अशी - ‘‘श्रीयुत (नरसोपंत) केळकर हे एप्रिल सन १९२५ मध्ये बडोद्यास पोस्टल परिषदेसाठी आले असताना रा रा. गोविंद सखाराम सरदेसायी (रियासतकार) यांच्या घरी महाराष्ट्र वाङ्मय मंडळाच्या सभेमध्ये त्यांच्या समोर या वादाचे पूर्वपक्ष उत्तरपक्ष करण्यात आले होते. त्या वेळी या वादासंबंधाने जो पुरावा उपलब्ध होता, तेवढाच आज मितीला आहे. त्यांत काही भर पडली नाही. जेधे शकावली, शिव भारतातील श्लोक व बृहदीश्वर शिलालेख, हे सर्व श्री केळकर यांच्यासमोर विवेचिले गेले होते. त्या वेळी ‘एकंदरीत या वादाचा सर्व बाजूंनी विचार करता जुनी तिथी चुकीची असून, नवी तिथी खरी असल्याबद्दल शाबितीचा बोजा फाल्गुन पक्षावर जबरदस्त असल्याने, तो समाधानकारक रीतीने आदा करण्यात आला आहे, असे मला वाटत नाही.’ असा श्री. केळकरांनी स्वतःचा निर्णय सांगितला होता.

सन १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या रा. ब. गो. स. सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या मराठी रियासतीच्या २ऱ्या विभागात, ‘वैशाख शुक्ल २ शके १५४९ ता. ६ एप्रिल सन १६२७ रोजी मध्यरात्री शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला.’ असे निश्चित सांगून खाली एक टीप दिली आहे. ती अशी - ‘शहाजीची मुले केव्हा व कोणत्या ठिकाणी जन्मास आली हे निश्चितपणे ठरविण्यास लागणारा पुरावा अद्यापि अपुरा आहे. जेधे शकावलीत फाल्गुन व ३ शके १५५१ शुक्रवार ता. १९-२-१६३० ही शिवाजीची जन्मतिथि नमूद आहे. या दोन प्रचलित तिथिंपैकी वर दिलेल्या पहिलीचीच (सन १६२७) संगती तत्कालीन घडामोडींशी जुळते.’ पुणेकर आपटे प्रभृती संशोधकांपेक्षा इतिहास संशोधनात दहा पावसाळे अधिक घातलेल्या इतिहास-महर्षींचे निर्णायक विधान आहे हे.’’ इतके झाले तरी फाल्गुनपक्षाचा हेका काही सुटता सुटत नाही. फाल्गुन व ३ला दरसाल एकांडी शिवजयंती साजरी करण्याच्या त्यांच्या चिथावण्या चालूच आहे. इतकेच नव्हे पण अनेक शालेय क्रमिक पुस्तकात शिवजन्माचा नवा १६३० तोतया सन घुसडण्याचीही कारवायी त्यांनी साधलेली आहे. या सगळ्या खटाटोपात सत्यनिश्चितीपेक्षा अहंपणाचा भाग विशेष आढळतो. हा प्रकार थांबवा, लोकांना तो जुना वाद तपशीलवार समजावा आणि त्याचा ज्याने त्याने आपल्यापरीने निर्णय घ्यावा, हा हे पुस्तक प्रसिद्ध करण्यातला हेतू आहे. बडोदे येथील ख्यातनाम इतिहास-पंडित श्री. विनायकराव वाकस्कर यांनी आपल्या ‘जुळे तोतये’ या गंर्थात समाविष्ट केलेला ‘तोतया शिवजयंती’ हा संभाषणात्मक पद्धतीने लिहिलेला लेख आणि सन १९२७ साली शिवरायाच्या त्रिशतसांवत्सरिक जन्मोत्सवाच्या वेळी प्रसिद्ध झालेल्या ‘शिवाजी सुव्हेनिअर’ मधला कै. प्रो. चिंतामण गंगाधर भानू यांचा ‘शिवजन्म तिथी खरी कोणती?’ हा लेख, असे दोन लेख या पुस्तकांत छापले आहेत. दोघाही लेखकांचा संशोधकी अधिकार फार मोठा. सन १९२४-२५ साली अनेक नियतकालिकांतून गाजलेल्या त्या वादाचे आस्तिनास्ति सर्व लेख एकत्र जमा करून, ज्या १०-१५ लेखकांनी त्यांत भाग घेतला होता, त्यांची एक बैठक जमली आहे आणि अध्यक्षस्थानी कै. नरसोपंत केळकर आहेत, अशी रचना करून, श्री. वाकसकरांनी संभाषण-पद्धतीने तो सगळा वाद बालबोध रीतीने तयार करण्यात बुद्धीचे फार चोखट कौशल्य वापरले आहे.

संभाषण पद्धतीने (CATECHISM) विषयाला जिवंतपणा येतो. ज्याच्या त्याच्या लेखातले क्वचित उतारे व सारांश प्रत्येकाच्या तोंडी घालून निर्विकार बुद्धीने ही संभाषणात्मक बैठक रंगविलेली आहे यामुळे वाचकांपुढे दोनही पक्षांतील वादक मंडळी प्रत्यक्ष एकत्र हजर होतात. खंडित मुद्दे कोणते, निरुत्तर कोणते हेही वाचकांस एकदम पाहायला मिळते एखाद्या मुद्याला उत्तर दिले गेले असूनही ते या बैठकीत गाळले आहे, असा प्रकार जाणूनबुजून तरी मुळीच केलेला नाही. मात्र वितंडवाद आणि चर्वितचर्वण किंवा गैरलागू मुद्दे हे प्रकार कटाक्षाने बाजूला ठेवणेच योग्य होते. वादाला फाटे फुटून नयेत आणि अप्रधान मुद्यांचे विवेचन अज्जिबात टाळता यावे, म्हणून पुढील ९ मुद्यांपुरतीच विवेचन मर्यादा राखली आहे. १. पुराव्याचा बोजा कोणत्या पक्षावर असावयास पाहिजे? २. दोन भिन्न भिन्न तिथि अस्तित्वात येण्याचे कारणच काय? ३. नवीन शिवजन्म