शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 2 of 23

लोकशाही तत्त्वाप्रमाणे बहुजन समाजांचे हेच मत अखेरचे निर्णायिक असल्यमुळे, या वादाची बालबोध रूपरेखा, श्री. वाकसकर आणि कै. प्रो. भानू यांच्या तत्कालीन चिकित्सक लेखांनी जनतेपुढे ठेवीत आहे.

शिळ्या कढीला आता ऊत कशाला आणावा? होय. प्रश्न सोपा नि सुटसुटीत आहे. शिवजयंतीचशी काय, टिळक पंचांग जन्माला आल्यापासून दोन गुढी पाडवे, दोन दसरे. दोन दिवाळ्या आणि दोन शिमगेही साजरे होत असतात. एकवाक्यता ही चीजच आम्हा मऱ्हाठ्यांना पारखी झाली आहे. लोकांचा शिमगा चालू असतो, गावोगावच्या आळीबोळात एकाद दुसऱ्या भटजीच्या घरावर गुढी उभारलेली दिसावी आणि लोकांच्या भाद्रपदात भटांनी आपली एकांडी दिवाळी साजरी करावी, हे देखावे काय कोणी आजवर कधी कोणी पाहिलेच नाहीत? शिळ्या कढीची सवाल टाकणारांनी स्वदेशात नि स्वकियांत, केवळ मतभिन्नतेच्या हेकेखोरपणाने सालोसाल बळावत चाललेल्या आचारविचारांतली ही अढी नजरेआड करण्याइतकी क्षुल्लक बाब नव्हे. आजवर भाद्रपदाच्या चतुर्थीला गणेशोत्सव चालू होत असतो आता त्यातही एक नवा माघपक्ष निघत आहे. पडली आणखी एका वादात भर? भाद्रपदात गणेशोत्सव का नको? तर म्हणे पावसामुळे मंडपाचा खर्च निष्कारण होतो आणि कित्येक वेळा (आणि बहुधा नेहमीच) चांगल्या चांगल्या रंगदार ढंगदार कार्यक्रमांचा विचका उडतो, म्हणून सुक्याठाक माघातच गणेशोत्सव केलेला बरा. म्हणजे या बदलात गणेशदेवाच्या आगमन गमनापेक्षा, कार्यक्रमांच्या निर्विघ्न सांगतेची विवंचना अधिक आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. हा बदल सुचविताना, माघी चतुर्थी ही सुद्धा गणेश जयंतीची एक तिथि आहेच, हा शास्त्रीय पंचांगमान्य मुद्दा पुढे मांडण्यात येत असतो. माघवाद्यांच्या सौभाग्याने यंदा (सन १९५४) मेघराजाने भारताबरोबर महाराष्ट्रालाही आरपार सडकून काढल्यामुळे तर काही भाद्रपदवाले ‘माघाच्या माघारी गेलेले बरे’ असे बोलू लागले आहेत. ‘धनुर्धारी’च्या ‘जिवा’ने तर – गणपति बाप्पा मोरया। पुढल्या वर्षी माघांत या।। असे नवकाव्यच पुकारले आहे.

गणेशोत्सवाच्या माघी वादात सत्यासत्याच्या संशोधनाचा मुद्दा दुय्यम असून, उपयुक्ततावादाला प्राधान्य दिलेले दिसते. शिव-जयंतीच्या वादात सत्यशोधनाचा मुद्दा प्रमुख असून, बखरी पत्रे शकावल्या शिलालेख कुंडल्यादि पुराव्यांच्या सहाय्याने प्रत्येक पक्ष हमरीतुमरीवर आलेला आहे. आमचीच तीथ खरी, असा प्रत्येकाचा दावा आहे. या दाव्याने अनेक हेवेदावे निर्माण केले आहेत. दोन संशोधक पक्ष एकमेकांशी वाद घालू लागले म्हणजे मुद्दे थोडे नि पाल्हाळ फार, चिमूटभर संकेत त्यावर हाराभर चर्चा, असा प्रकार होतो. शिवाय पुराव्यांचे भांडे चाटून पुसून रिकामे झाल्यावर, एकमेकांच्या उणीदुणी काढण्यात शब्दांचा फापटपसारा माजतो तो वेगळाच. यामुळे, संशोधक पंडितांचे पांडित्यपूर्ण वादविवाद म्हणजे सामान्यांना एक निष्कारण माथेफोड वाटते आणि ते साहजिक आहे. खरे म्हटले तर शिवजन्म तिथिवादाचा निकाल ३० वर्षांपूर्वीच लागला. ज्या जेथे शकावलीवरून फाल्गुनी तिथीचा नवा प्रकाश दत्तोपंत आपटे प्रभृती संशोधकांना दिसला, ती मूळ लो. टिळकांना हस्तगत झाली. त्याबाबत भा. इ. सं. मंडळाच्या ४थ्या अहवालात पान १७५वर खुद्द लो. टिळक लिहितात - ‘‘शिव छत्रपतींचा जन्मकाल या शकावलीत शके १५५१ फाल्गुन वद्य ३ शुक्रवार असा दिला आहे. ही बाब खरोखरी चमत्कारिक आहे. सुमारे १६ वर्षांपूर्वी या बाबीची बरीच भवति न भवति होऊन, छत्रपतींची जन्मतिथि शके १५४९ प्रभव वैशाख शु. १ गुरुवार उत्तररात्र आश्विनी नक्षत्र ता. ६ एप्रिल सन १६२७ (ओल्ड स्टाइल) असल्याबद्दल मी ठरविले होते. (पहा केसरी वर्ष २० अंक १७ ता. २४-४-१९००) प्रसिद्ध व अप्रसिद्ध बखरीत या जन्मतिथीबद्दल अत्यंत विसंगतता आहे. सबब या बाबीचा जितका जास्त खल होईल तितका पाहिजेच आहे.’’ यावरून स्पष्ट होते की लो. टिळकांनी नव्या फाल्गुनी तिथीला मान्यता दिली नाही, तर तिचा शक्य तितका खल व्हावा असे दर्शविले.

जुन्या तिथीची विसंगतता त्यांनीच कबूल केली, अर्थात तिच्या खलाचे काही कारणच उरलेले नव्हते आणि या नव्या तिथीचा जेव्हा तपशीलवार खल झाला, तेव्हा तिच्या पुरस्कर्त्यांना आपला पुरावा सिद्ध करताच आला नाही. श्री. वाकसकर आपल्या तोतया शिवजयंती लेखाच्या शेवटी एक