शिव – जन्म – तिथीचा वाद

शिवजन्मतिथीचा वाद हा महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध वाद. अनेक विद्वान, इतिहासकार, अभ्यासकांनी हा वाद अगदी हिरीरीने लढवला. आपापले तर्क मांडले. पण प्रबोधनकारांची गोष्टच वेगळी. ढीगभर दाखले, मुलखाचे संदर्भ देत ते हा विषय समाजासमोर अभ्यासूपणे सादर करतात. प्रत्येक शिवप्रेमीने वाचावे असे हे प्रबोधनकारांचे या वादविषयावरचे हे लेखन...

उत्कट भव्य तेंचि घ्यावें। मळमळीत अवघेंचि टाकावें। निस्पृहपणे विख्यात व्हावें। भूमंडळी ।।

विवेकामध्ये सापडे ना। असे तों काहीच असे ना।। येकांती विवेक अनुमाना । जाणून सोडी ।। - श्री समर्थ रामदास

शिव – जन्म – तिथीचा वाद लेखक श्री. विनायकराव सदाशिव वाकसकर, बडोदे कै. प्रो. चिंतामण गंगाधर भानू प्रस्तावना प्रबोधनकार के.सी. ठाकरे, मुंबई- 28 प्रकाशक आणि मुद्रक वि. चा. नेहेते, संपादक – बातमीदार नेहेते प्रिंटिंग प्रेस, २८४, बळिराम पेठ, जळगाव, पूर्व खानदेश किंमत ८ आणे बातमीदार प्रकाशन संस्था, जळगाव पू. खा. प्रास्ताविक विचार (ले. प्रबोधनकार के. सी. ठाकरे) छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या नक्की जन्मतिथीचा वाद गेली ३० वर्षे चालू असून, जुना वैशाखपक्ष आणि नवा फाल्गुनपक्ष असे दोन तट पडले आहेत. अलम मऱ्हाठी जनता वैशाखात शिवजयंती साजरी करते, तर नव्या पक्षाचे मूठभर अनुयायी (त्यांना अभिमानी म्हणता येणार नाही.) एकांड्या शिलेदारीच्या तावातावाने फाल्गुनाच्या हंगामात ती गल्लीबोळात उजवतात. शिवजन्म तिथीचा हा वाद आहे तरी काय, कोणत्या मुद्यावर हे दोन पक्ष एकमेकांशी फटकून वागून हिंदूच्या संघटनेला सालोसाल दुहीचे कोलीत लावीत असतात आणि आपण वैशाख किंवा फाल्गुन का पत्करतो, कोणत्या मुद्यांवर, याची दोनही पक्षांतल्या अनुयायांना दाद असल्याचे दिसत नाही. सामान्यांची गोष्ट सोडली तरी चांगल्या शिकल्या सवरल्या लोकांनाही वैशाख-फाल्गुन वादातल्या मुद्यांचे किंचितही ज्ञान असल्याचे दिसत नाही. वैशाखपक्ष लो. टिळकांनी चालू केला, २५ वर्षे लोकांत रूढ झाला म्हणून बहुसंख्य जनतेचा तिकडे ओढा, तर नव्य पक्षाच्या धुरेवर पोतदार, करंदीकर, आपटे प्रभृती खास पुणेकर मंडळी असल्यामुळे, कित्येक गावचे त्यांचे चिमूटभर अभिमानी अंधानुकरणाने फाल्गुनाची कास धरतात.

या वादाची आस्तिनास्ति चर्चा सन १९२४ साली केसरीतून चालू झाली. दोनही पक्षाच्या रथी महारथीनी निरनिराळ्या वृत्तपत्रांतून नि मासिकांतून आपापल्या मुद्यांची मंडने नि प्रतिस्पर्ध्यांची खंडने केली. शेकडो छापील पाने खर्ची पडली. या वादाला आज ३० वर्षे झाली. एका पिढीचा जमाना गेला. शिमगा गेला तरी कवित्व उरते म्हणतात. या न्यायाने वाद पेटला आणि विझला, पण त्यातली हेव्यादाव्याची नि हेकेखोरपणाची गरम राख आजही जनतेला डोळे चोळायला लावीत हे. ३० वर्षांपूर्वींच्या त्या वादाची सगळी रद्दी एकवट जमा करून खरा कोण नि खोटा कोण, याचा आपल्या पुरता तरी निवाडा पाहण्याइतकी इच्छा फुरसद किंवा जिज्ञासा असणारच कोणाला? आणि कोणाला जिज्ञासा असलीच, तर ती वादाची वृत्तपत्री रद्दी हाती येणार कशी? मग काही इकडे तर काही तिकडे हकनाहक खेचले जातात आणि सुरुवातीला एक केवळ मतभेदाची असलेली क्षुद्र बाब पुढे दुहीच्या निखाऱ्याने द्वेषाची होळी भडकवीत चालली आहे. भावाभावात वितुष्ट माजते आहे दोस्त दुस्मान बनत आहेत आणि महाराष्ट्राचा परमेश्वर जो छत्रपती शिवराय त्याच्या जयंतीच्या प्रसंगीही मऱ्हाठ्यांतल्या पिढीजात दुही दुफळीचे घाणेरडे प्रदर्शन पाहून इतर भारतीय आमच्याकडे कुचेष्टेने पाहत असतात. जुने ते सारे सोने मानू नये, पण जुन्यातले सोनेही टाकू नये. तसेच नवे ते सारे सोनेच, हमखास त्याचा कस शंभर नंबरीच लागणार, हा हट्टवादही मूर्खपणाचा आहे. सत्यशोधक दिलदार नि मोकळ्या मनाचा असला पाहिजे. नवी तिथि आम्हा पुणेकरांना सापडेना, तेव्हा ती उभ्या मऱ्हाठदेशाने डोळे मिटून मान्य केलीच पाहिजे, असला आग्रह पूर्वीप्रमाणे आज कोण जुमानणार? प्रत्यक्ष वादाच्या हंगमातही वैशाखपक्षाने फाल्गुनवाद्यांना पळता भुई थोडी केली होती. आजच्या पिढीला तो मुकाबला कशाने समजणार? कोणीतरी तो सांगितला पाहिजे. उजेडात आणला पाहिजे. बहुजन समाजाला तो तपशीलवार अभ्यासता आला पाहिजे.