संगीत सीताशुद्धी: Page 10 of 48

विचार तो कसला? या दासीच्या शब्दावरील आपला भाव अगदीच उडाला ना? रावण०—असं होईल तरि कसं लाडके? अर्धांगीच्या शब्दाला मुळीच मान न देण्याइतका हा रावण अविचारी नाही. कारण असं पहा – पद० (स्फटिकाचे ते०) दैवकरीं जें सुख लाभतसे । श्रेष्ठ तयांतिल कांता विलसे ।। श्रांत मना करि शांतचि ललना । मधुर वचें हरवी हृच्छलना ।। प्रियकर दर्शन अर्धांगीचें। रमवित नित मन हें पुरुषांचें ।।१।। मंडोदरी० – पण नुसत्या या शास्त्रार्थावरच माझी समजूत नाहीं बरं व्हायची. रावण०- समजूत व्हावी असं कोण म्हणतो? तुझ्या म्हणण्याप्रमाणें जानकीची उदईक मुक्तता करतों मग तर झालं ना? मंडोदरी०- होय गडे. त्यातच आपलं कल्याण आहे. रावण०—बरं तर. कोण आहे तिकडं? दासी०—(प्र. क.) काय आज्ञा सरकार? रावण०- अशीच अशोकवनांत जा आणि तेथे बंदीत ठेवलेल्या सीतेचा काय समाचार आहे तो घेऊन ये. जा. दासी०—सरकारची आज्ञा शिरसावंद्य. [जाते.] मारुती०—(स्व०) मला शोध लागला. आतां या दासीच्या मागोमागच जावं झालं. जय जय रघुवीर समर्थ. [जातो.] रावण०—लाडके मंडोदरी, त्या स्फटिक गच्चीवर क्षणभर विश्रांची घेऊ चल. ही पाहिलीस का मध्यान्ह रात्रीची शोभा? ---- पद०- (रजनीनात हा-) गगनसागरीं शशि हा रमला ।। उड्डगणयूथीं जलक्रीडेला ।।धृ०।। अंबर-उपवन फुललें खासे । तारांगण-सुमनांच्या श्वासें ।। मन्मथ-शशि हा विहार भासे सज्ज करुनियां किरण-धनूला ।।१।। सौंदर्ये नटली रति-रजनी । उत्कंठित ती पतिमूखमिलनी ।। धन्वाकर्षणि लाजुनी स्वमनीं । दृढालिंगनी सुखवित पतिला ।।२।। अंक पहिला समाप्त. अंक दुसरा. प्रवेश १ ला. स्थळः- अशोकवन – लंका. [सीता ध्यानस्थ बसली आहे. जवळ त्रिजटा आहे. अधोमुख, शतमूर्ख, क्रूरवदन पहारा करीत आहेत. मारुती येतो.] मारुती० -- अहाहा! हीच ती माझी माता जानकी. आज माझ्या जन्माचं व रामभक्तीचं खरंखरं सार्थक झालं. येथे काय चमत्कार आहे पहा – वृक्ष, पंचभूतें, पक्षी वगैरे एकसारखी रामस्मरण करीत आहेत. एवंच या लंकाद्वीपातसुद्धा अयोध्यावासी रामाचा ध्यास करणारे प्राणी जन्मले आहेत. बाबांनो! तुमचा हा ध्यास त्या मदांध रावणाला सध्या जरि मानवत नसेंल तरि पण रामभक्तांनो धीर सोडूं नका. श्रीराम तुम्हांला अंती यशश्री दिल्यावाचून खास रहाणार नाही. हं:! हे तीन राक्षस माझ्या मुष्टीप्रहाराला बळी पडण्यायोग्य आहेत खास. मुष्टीनो, जरा थांबा उतावीळ होऊ नका. वेळ भरताचं हे तिघेही तुमच्या तडाख्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत. अहाहा! पुराणपुरुष श्रीरामचंद्राची पत्नी सती सीता ती हीच होय. कारण कर्पुराची दीप्ती, हिच्या शरीराचा मृगमदापेक्षा श्रेष्ठ सुवास इतर कोणत्याही स्त्रियेपासून निर्माण होणं शक्य नाही. तसंच राघवाच्या चरणी एकनिष्ठतेनं भक्ती करणा-या बिभीषणाची कन्या त्रिजटा जवळच उभी आहे. हा सर्व देखावा पाहून असं वाटतं— पद. (विराटवदनापासुनि॰) ध्यानस्थचि ही जनक कन्यका अचल शांत मननी गढली । वाटे रविच्या आगमनीं जणुं तेजोत्सुक प्राची वसली ।। किंवा पीडित तिमिरें रजनी शशिसाठीं उत्सुक झाली ।। राष्ट्रोन्नति या धर्मोन्नतिची विश्वशक्ति ही तपिं रमली ।। राघवरमणी मनीं विचारी पारतंत्र्यबंधनकालीं । स्वातंत्र्याचा भास्कर रघुपति कधीं उगवतो याच स्थलीं ।।१।। -- आतां आपण गुप्तरूपानं जवळ जाऊन मातेच्या चरणांचं वंदन करावं. [तसें करून जवळ मुद्रिका ठेवतो व आपण उडी मारून एका झाडावर बसतो.] क्रूरवदन०-- (मध्येंच थांबून) प्रख्यात शूरवीर रावणसैनिकहो ! बंदोबस्त तर नीट आहे ना? शतमूर्ख०-- क्रूरवदना, आपली बंदोबस्त ठेवण्याची शिस्त त्रिभुवनांतील कोणत्याही देवदानवांना आजपर्यंत साधली नाही. तेव्हां काळजी करण्याचं काहीं कारण नाही. का? अधोमुखा, तुझी बाजू कशी काय आहे? अधोमुख०-- अगदीं चोख, आपल्याला पहा-यावरचा आता कंटाळा आला बुवा. क्रूरवदन०-- ठीक, दूताची कामगिरी नको, म्हणून या पहा-यावरच्या कामावर प्रहस्त प्रधानजींनी तुझी नेमणूक केली. आतां याहि कामाचा तुला कंटाळा आला वाटतं? मग काय दे माय जोगवा करण्यात तुला सुख मिळणारसं दिसतं? अधोमुख० – तो जोगवा पत्करला पण