संगीत सीताशुद्धी: Page 9 of 48

दैदीप्यमान, प्रबळ आणि अजिंक्य म्हणून आपल्या साम्राज्यशक्तीच्या मर्दुमकीबद्दल शेखी मिरविणा-या देवदानवांच्या सर्व राष्ट्रांना एका क्षणात धुळीला मिळविण्याची ज्या या लंकापतीची शक्ती श्रेष्ठ आहे. क्रोधायमान होऊन भूतलावर माझा त्रैलोक्यपतित्वाचा लत्ताप्रहार आपटताच ज्या या प्रचंड भूगोलाचे खडपेच खडपे उडतील, अपमानाची क्षुल्लक झुळूक लागताच ज्या या लंकाधीशानं आपले खदिरांगारासारखे लालबुंद डोळे वटारताच या विश्वाची निमिषार्धात राखरांगोळी होईल त्या रावणाच्या पट्टराणीला कोण ताप देत आहे त्याचा नुसता नामनिर्देश कर. त्याला युद्धाचे आव्हान करून भर समरांगणात लाथ मारून जमीनदोस्त करितो. माझ्या मंडोदरीचा जो अपमान तोच माझा अपमान. तू काय स्वप्नात पाहिलंस ते सर्व सांग? मंडोदरी० – प्राणनाथ, कुंभकर्ण इंद्रजीतसह आपला – या माझ्या सौभाग्य तिलकाचा-वध करून तो विजयी झाला. लंकेचं संपूर्ण राज्य बिभीषण भाऊजींना देऊन तो दाशरथी सीतेला घेऊन दरबारासह अयोध्येला परत गेला. रावण० – हेच का ते स्वप्न ? मला वाटलं की आणखी काही चमत्कारिक व भयंकर प्रकार तू स्वप्नात पाहिलास अँ ! त्यात ग काय अर्थ? ही स्वप्न म्हटली म्हणजे अगदी क्षुल्लक किंमतीची! त्यांतील गोष्टी ख-या मानून त्यासाठी आपलं मन व्यर्थ दुखविणं तुझ्यासारख्या त्रैलोक्यापतिपट्टराणीला बिलकुल शोभत नाही, असं पहा— पद. (अघर वारुणी) चपल मानसीं चंचल प्रगती । भ्रम हा सारा शुष्कचि त्या गणुनी । सुजन ते त्यातें त्यागिती ।।धृ।। चंचल मन हें रिक्तचि असतां । विफल तरंगी ने मनसमता । व्यर्थ असे स्थिती ती ।।१।। सार्वभौमदिं वित्तहीन तो। स्वप्नी आरुढ वैभविं होतो । सत्य न त्या वदती ।।२।। मंडोदरी० – प्राणेश्वरा, हे स्वप्न क्षुल्लक नाही बरं ? हे केवळ ब्रम्हवचन समजा. महाराज, मी पदर पसरून मागणं मागते की त्या मंगलदायक रघुनंदनाला त्याची सीता परत नेऊन द्या आणि त्याला शरण जा. हेच सध्या इष्ट दिसतं. रावण० – काय शरण ? छेः हा तुझा सल्ला मला बिलकूल पसंत नाही. या रावणावर प्रत्यक्ष कल्पांतरुद्र जरी कोपला, जगातील सर्व ज्वालामुखींचा स्फोट होऊन त्यांनी या माझ्या मस्तकावर प्रखर अग्नीचा जरि वर्षाव केला किंवा हिमालयापेक्षा प्रचंड पर्वतांनी एकवटून या माझ्या मस्तकाचे चूर्ण केले तरी पण उदात्त राजकीय कल्पनांनी आणि वीरश्रीनं स्फुरण पावलेलं हे माझ थोर मस्तक तशाहि स्थितीत कोणाच्याहि पुढं एक केसभरसुद्धा वाकणार नाही. हे पूर्ण ध्यानात ठेव. मग शरण जाण्याची गोष्ट तर दूरच राहिली. मंडोदरी० – पण, महाराज, परस्त्रीचा अभिलाष धरून कोणाचं बरं चांगलं झालं आहे? त्यातून हा पुराणपुरुषाचा अवतार आहे बरं ? गळ्यात धोंडा बांधून कोणी कधी महासागर तरल्याचं पाहिलं आहे काय? मूर्तिमंत विषाचं प्राशन केल्यावर त्याचं कल्याण तरी कसं होणार ? म्हणून म्हणते, कसंहि करा पण या मंडोदरीची एवढी विनंती मान्य करून येत असलेलं भावी संकट दूर करा. नाही तर मीच रघुनंदनाला त्याची पत्नी अर्पण करून शरण जाईन नि मला चुडेदान मागून घेईन. पण श्रीरामचंद्रपुढं ही मात्रा नाही बरं चालायची. हा कोणी मानव नसून भक्तजनाला व सत्याला तारण्यासाठी हे पूर्णब्रह्म अवतरलं आहे. मारुती० – (एकीकडे) धन्य धन्य मंडोदरी, तू ज्ञानाची कामधेनू आहेस. रावण० – (स्व.) आता हिची समजूत कशीतरी करून वेळ मारून नेली पाहिजे. स्वयंवरसमयी भरसभेत एवढा अपमान सहन केला; अकटेविकट प्रयत्न करून हजारो मसलती लढवून अनेक वेषांतर करून लाखो प्राण्यांचे बळी घेऊन आणि सत्यासत्याचीही पर्वा न करिता ज्या सीतेला या रावणानं दंडकारण्यातून येथे आणली आणि यशप्राप्तीसाठी पाच कोटी कडव्याराक्षसांच्या कडक बंदोबस्ताखाली अशोकवनात ठेवली त्याच सीता सुंदरीला या मंडोदरीच्या प्रलापानं वितळून जाऊन मेषपात्राप्रमाणे त्या मानवी दशरथपुत्राकडे परत पाठविण्यासाठी काय? छेः मुळीच नाही. एकदा तरी त्या सुंदरीचा तारुण्स्वाद चाखून मी आपली महत्त्वाकांक्षा पुरी करून घेणार. मंडोदरी० – प्राणनाथ, एवढा