संगीत सीताशुद्धी: Page 8 of 48

मेल्याशिवाय जाते कशी? मत्सर – क्रुद्धभाषणी, तुझ्या टोमण्याचा भावार्थ न कळण्याइतकी मी काही दुधखुळी नाही बरं. रावण महाराजांची आवडती दासी असलीस म्हणून आमच्यावर काही इतकी सत्ता मिरवायला नको. समजलीस? क्रुद्ध – मत्सरनगनी नावांप्रमाणंच तुझी कृती असायची. मी नेहमी रावण महाराजांच्या खास महालात सेवेला असते म्हणून माझ्यावर मत्सराचा इतका काही पाऊस पाडायला नको. समजलीस? मत्सर – बोलूनचालून तूं पडलीस क्रुद्धभाषणी तेव्हा तुझ्याकडून गोड भाषणांची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण— पद. (तू श्रीमंतिण) पाहिलं वंध्या स्त्री सुतवदना । दिसेल शुष्कचि सागर अथवा पर्वतचलना ।। भूवरिं येइल रवि दिननृपती ।। अग्नी त्यागिल दाहकता जल स्वभावस्थिति ती ।। चुकेल दिनकर नियमित उदया । परि भाषण तव क्रुद्ध सदोदित चुके न समया ।।१।। क्रुद्ध – कविकल्पनांचं नुसतं पेंव फुटलंय. मत्सर – पण कवींची योग्यताहि तशीच असते. क्रुद्ध – काय पण मेली योग्यता? चोर आणि कवी अगदी एका माळेचे मणी. मत्सर – ते कसं? हा नवीन शोध दिसतो. क्रुद्ध – नवीन नाही बरं ! जुनाच आहे. ऐक – पद. (मजा देता है) कुणि उच्च नीचही नाहीं । कवि तस्कर सम हे पाही ।।धृ।। एकांत पसंतचि त्यांना ।। सावधशी मृदु पदरचना ।। कौशल्य अलंकारांना ।। वांछिती करि कृति समहि ।।१।। ("राजाधिराज रावण महाराज" शब्द ऐकू येतो.) क्रुद्ध० – बस झालं आपलं पांडित्य. मत्सर०– तुझं का माझं? मारुती० – (स्व.) सीता रावणाला वश झाली की काय? हा नीच रावणहिं इकडंच येत आहे. रावण० – (प्र. क.) राज्यकारभाराचं काम कितितरी बिकट आहे! पद. (केदार-दीपचंदी) किंवा (मालकंस) शिरीं किरिट ज्याच्या तया सौख्य नाहीं ।। वधाया अरी मन सदा दंग राही ।।धृ।। प्रजाद्वैत कोठें वसे त्या हराया ।। रक्षावया विभव मति सज्ज राही ।।१।। प्रभूच्या कृपें पात्र सिंहासना मी ।। चिरास्तित्व कैसें तया? काळजी ही ।।२।। -- असो. आता प्रियेच्या महालांकडं जावं झालं. अहाहा ! या नुसत्या महालाचें दर्शनच मला किती आनंद देत आहे. (महालात जाऊन) काय? ही आज अशी म्लान का दिसते? क्रुद्ध० – बाईसाहेबांची प्रकृति आज सकाळपासनं अगदी उदास झाली आहे. रावण० – याचं कारण काय बरं? मंडोदरी० – (झोपेत) अयाई! घात झाला! रावण० – (जवळ जाऊन) अरे! ही आज अशी का करते? मंडोदरी? मारुती० – (एकीकडे) एकूण ही रामपत्नी सीता नव्हे. मंडोदरी० – (ओरडत जागी होते) धावा हो धावा अयाई घात झाला ! रावण० – (तिला सावरीत) प्रिये मंडोदरी, काय झालं? अशी घाबरलीस कां? निद्रेतून एकदम जागृत होऊन अशी शोक का करू लागलीस? क्षणभर माझ्याकडं पहा. पंचमहाभूतादि सर्व तत्वें ज्याच्या सेवेला हजर आहेत असा लंकापति रावण-तुझा पती-प्रियकरणी तुझ्याजवळ असता थरथरा कापतेस का? बोलत का नाहीस? तुला कोणी स्वप्नात त्रास का दिला? सांग पाहू? असं गुप्त कारण तरी काय घडलं? मंडोदरी, प्राणविसावे! बोल बोल काय झालं तें? मंडोदरी० – महाराज, काय सांगू न् सांगू तरी कसं? प्राणनाथ, माझी सौभाग्यदर्शक गळसरी-अगबाई पण ही तर माझ्या गळ्यात आहे. हो पण, ती जळून गेलेली मी स्वप्नात पाहिली. एक मोठा बलवान वानरयोद्धा या लंकेत येऊन त्याने आपल्या लाडक्या अखयाला ठार मारून इंद्रजिताचा समरांगणात नाही नाही तो छळ केला. जनकराजाचा जामात शुभ मुहूर्तानं समुद्रावर शिलापथ करून अद्भुतदळासह या लंकानगरीवर चाल करून आला. रावण० – बरं मग? पुढं आणखी काय? सांग सांग तर खरी अशी स्फुंदू नकोस. मंडोदरी० – प्राणनाथ, कसे हो ते अपशब्द मी उच्चारूं! प्रियकरा, मला चांडाळणीला – हायहाय! ते दुःस्वप्न मला बोलवले तरी कसं आणि सांगू तरी कसं? रावण० – प्रिये मंडोदरी! त्रैलोक्यांतील