संगीत सीताशुद्धी: Page 6 of 48

रावणाची श्मश्रू करीत असतां त्याची एक मिशी त्याच्या हातून उतरली जाणं हा काय शुभ शकून वाटतं? विप्रभक्षक०—छेः हो अपशकुनच हा. पण याला आतां उपाय? सर्वभक्षी०—आता याला एकच उपाय, आन् तोहि – अयोध्यावासी रामाची बायको ती जानकी त्याला ताबडतोब परत नेऊन द्यावी हाच. विप्रभक्षक०—पण असल्या प्रकारचा उपदेश करणा-या दूताची काय त्रेधा रावणानीं केली? त्याचे नाक कान कापून गाढवावर धिंड काढली. असो काय होईल तें होवो. चला. आज अस्मादिकाच्या घरी मेजवानी आहे. अनमान न करता तुम्ही. पण हः! या झालं. मी तर केवळ विप्रमांस भक्षण करणारा – पण तुम्ही तर सर्वभक्षी आहांत. सर्वभक्षी०—मात्र लवकर सुटका करा. कारण रावण महाराजांची स्वारी आज मंडोदरी बाईसाहेबांच्या महालात येणार असून तिथें आज आमचा पहारा आहे. चला, अयाई! पाठीला कळा लागल्या हो. विप्रभक्षक०—विप्रमांस भक्षण करा कीं ताबडतोब गूण येईल. अरे बापरे, आपले प्रहस्थ प्रधानजी, तो क्रूरवदन आणि तो अधोमुख इकडंच येत आहेत. चला आपण दुस-या वाटेनं जाऊं. [जातात.] [प्रहस्थ प्रधान, क्रूरवदन, अधोमूख प्र.क.] प्रधान०—ते व्हायचं नाहीं. याचा शोध लागलाच पाहिजे. अशा मह्त्त्वाच्या गोष्टींत जर आम्ही लक्ष पुरविलं नाही, तर राज्यकारभाराचा गाडा सुरळीत चालायचा नाहीं. तुम्ही त्या माकडाचा नीट तपास केलाच पाहिजे. क्रूरवदन०—महाराज, याची सर्व माहिती या अधोमुखाला असलीच पाहिजे. कारण हा आर्यावर्ताला राहणारा आणि तो माकडहि म्हणे त्याच प्रदेशातला. प्रधान०—कायरे अधोमुखा, अशी खाली मान घालून काय उभा राहिलास? अधोमुख०—(स्व.) मी अधोमुख आहे म्हणून. प्रधान०—तुलाच त्या बंडखोराचा नीट तपास लावला पाहिजे. तुमच्यावर सोंपविलेली दूतवृत्ती अशीच बजावीत असता वाटत? दुस-या एका विश्वसनीय दूतानं आम्हाला अशी बातमी दिली आहे कीं काल एका अग्निहोत्री ब्राह्मणाकडे अग्नीपूजन प्रसंगी तो हजर होता, इतकंच नव्हे तर आमच्या सम्राटाच्या वृद्धिंगत साम्राज्यशक्तींच्या विरूद्ध कांहीं शब्द उच्चारल्याचें आम्हांला माहीत झालं आहे. तर तूं-अधोमुखा! या क्रुरवदनाच्या सहाय्यानं त्या माकडाचा तपास करून त्याला आमच्यासमोर हजर करा. अधोमुख०- तो माकड उत्सवाला जरि आला असेल-- प्रधान०—असेल म्हणजे? तो आलाच होता. अधोमुख०—बरं आला होता. परंतु त्याला उत्सवाचें आमंत्रण नव्हतं. सर्व लंका नगरींत प्रळय करतांना तो सर्वत्र संचार करीत होताच. त्यांत तो घटकाभर तिथं कोणाला दृष्टीस पडला असेल. क्रूरवदन०—कां? त्याची फारशी तरफदारी चालविली आहे प्रदेशाच्या वळणावर जातां वाटतं? महाराज, हें साफ खोटं आहे. त्या टवाळखोर माकडाचा पत्ता या अधोमुखाला लागला नाहीं, तर त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला सुळी चढवावा, नाहींतर हिंसक क्रूर पशूंकडून त्याचें शरीर फाडवावें. हा अधोमुख आपल्या प्रांताच्या लोकांची तरफदारी करतो. प्रधान०—खरं कां रे अधोमुखा? याद राखून ठेव. दूताची पत्करलेली वृत्ती जर नीट बजावली नाहींस तर त्या अग्निहोत्री ब्राह्मणाच्या ऐवजीं आम्ही तुलाच फाशी देऊं. [जातो.] अधोमुख०—(स्व.) धिःकार असो या अधोमुखाच्या जीविताला! पोट जळत नव्हतं म्हणून ही दूतगिरी पत्करली. या आत्मघातकी सुरीनं कोणकोणाचे गळे कापण्याचा प्रसंग मजवर येतो कोण जाणे? वेदांचा, विप्रांचा आणि गायित्रीचा अमानुष छळ पहातांच, इतक्या दिवस या दूतवृत्तीवर टिकण्याइतका कृतघ्न व निष्ठूर अंतःकरणाचा मी बनलों कसा, याचंच मला फार आश्चर्य वाटतं. (उघड) क्रूरवदना, प्रधानजीजवळ माझी नालस्ती करून तुलारे काय मिळालं? क्रूरवदन०—काय मिळालं? वाः! किती तरि मिळालं? माझ्या वृत्तीच्या वरच्या दजार्च्या वृत्तिमर्यादेत एक पाऊल पुढं पडलं. हें काय कमी झालं वाटतं? अरे बाबा, वरचे दर्जे मिळविण्यासाठी वरिष्ठ सत्ताधा-यांची हांजी हांजी करणं किंवा तुझ्यासारख्यांची निंदा करून त्यांची मनं कलुषित करणं यापेक्षा तिसरा मार्गच नाहीं. अधोमुख०—तुला माझा दर्जा पटकवण्याची इच्छा आहे कां? क्रूरवदन०—तो दर्जा मी तुझ्यापासून दान नाहीं घेणार, तो मी आपल्या मनगटाच्या जोरावर घेणार. अधोमुख०—मलाहि या दूतगिरीचा आतां कंटाळा आला बुवा. क्रूरवदन०—कांरे बुवा? आर्यावर्ताच्या अरण्यांत कंद मुळं खात, रानटी व अज्ञानी स्थितींत पडून होतास, त्या