संगीत सीताशुद्धी: Page 5 of 48

अंतरिक्षांतून खालीं पडून तिचा देह भस्मीभूत तर झाला नसेल? छेः रावणानें पळवून आणते वेळी तिच्या शरिराला वेदना लागून तिनं प्राण सोडला खास. नाहीं तर रावणाच्या इतर स्त्रियांनी सवतिमत्सरानं पाश घालून ठार मारली असेल! हर हर! माते जानकी, काय तुझी ही दुःस्थिती! हें माझें उड्डाण फुकटच होणार काय? राम राम राम! पण मी शोक कां करावा? विघ्नाची काय बिशाद आहे कीं रामकार्यात तें आडवें येईल. लाथ मारून शतचूर्ण करीन. पद. (मरण गणुनि०) स्मरण करूनि रघुपतिचें विघ्न तुडवितों पदीं।। अग्नि प्रखर पेटतसे। प्रबळ निधी शमवितसे। त्यापरि मम रामनाम तारिल मज संकटीं।।धृ।। रुप सूक्ष्म गुप्त धरुनि। लंका उध्वस्थ करुनी। रावणवध-संधि सुलभ करिन स्फूर्ति ही हृदीं।।१।। [जातो.] अंक] प्रवेश २रा [पहिला लंकेचा राजरस्ता विप्रभक्षक राक्षस घाब-या घाब-या धांवत येतो. विप्र०- पळा पळा. बस्. दुसरी गोष्ट नाहीं. आपले जीव वांचवा पळा, काय म्हणतां? अँ! पळतांना मस्तकांत शिळा येऊन पडताहेत? मोठाच चमत्कार! काय झालं असेल ते होवो. कालपासून या लंकेत प्रळ्यांचा अगदी सुळसुळाट उडाला आहे. देवळांची मोठमोठीं शिखरं, राजवाड्यांचे मजले, ध्वजा आणि पताकांचे स्तंभ धडाधड कोसळून खालीं पडत आहेत. राक्षसिणींची पोरं धरून आकाशात गरगरा फेंकलीं जात आहेत आणि ती खालीं पडून त्यांचा चक्काचूर होतानां राक्षसिणींचा आकांत काय विचारायचा? स्त्रीपुरुषांनीं एकत्र शयन् केलेले पलंग राजरोस कोणी रस्त्यावर आणून ठेवीत आहे. भांडारगृहें फुटली जाऊन त्यातील चीज वस्तूंची एकसारखी नासधूस होत आहे. होत आहे, पण ती कोण करीत आहे, कांही कळत नाहीं. तो-तो माझा मित्र सर्वभक्षी राक्षस इकडंच येत आहे. पाहूं त्याला कांहीं कळलं असल्यास. का? मित्रा सर्वभक्षे क्षेम आहे ना? सर्वभक्षी०-- [रडत प्र. क.] असेल बाबा असलें तर. इकडे पाठीवर फटकारे खाऊन जीव जाईल तर बरं असं झालय नि तुमचं आपलं चाललंय "क्षेम आहे ना"? विप्रभक्षक०-- चुकलों बाबा. ही, घ्या थोबाडीत मारून घेतली. पण हा प्रळय करतो तरि कोण? काहीं कळलं कां? सर्वभक्षी०-- अहो विप्रभक्षक, मी नुसताच राजद्वाराजवळ पहा-याला होतों. तेथें राजवाड्यावरून एक भलं मोठं माकड आलं नि टिवल्याबावल्या करीत द्वारावर उंच ठिकाणीं बसलं. इतक्याच ब-याच स्त्रियांचा घोळका डोक्यावर पाण्याच्या घागरी भरून घेऊन येत होता. त्या माकडानं आपल्या शेंपटीच्या फटका-यानीं त्यांचे सर्व कुंभ फोडले आणि त्या स्त्रियांच्या नाकाकानांतूनही तों आपलें शेंपूट वळवळऊ लागला. त्यासरसें त्या सर्व स्त्रिया फटाफट् शिंकावर शिंका देत आपला जीव घेऊन पळाल्या. याचा काहीं बंदोबस्त करावा म्हणून आमची स्वारी जरा पुढें सरसावली तों फटका-यांचा आमच्या पाठीवर एकसारखा वर्षाव होऊन त्याचं हे पहा-पहा तर खरं कसं अगदीं धिरडं झालं तें? विप्रभक्षक०—खरंच हो खरंच. अगदी धिरडंच धिरडं झालं कीं हो! काय करावं बुवा या प्रळयाला. सर्वभक्षे ! या प्रळ्यांनी तुमच्या आमच्या सारख्या हलक्यासलक्या राक्षसांवरच का बुवा हत्यार धरलं आहे? कांही कळत नाही. सर्वभक्षी०—आणि मोठ्या प्रस्थांना काय प्रसाद मिळाल्याशिवाय राहिला आहे वाटतं? नुकतेच आपले प्रहस्थ प्रधानजी पालखींत बसून राजदरबारात चालले होते. इतक्यांत त्या टवाळखोर व बंडखोर माकडानं शेंपटीचं टोक भोयांच्या कानांत खुपसलं. भोई जे म्हणता दचकले, त्यांनीं पालखी दिली धाडकन् जमिनीवर टाकून. प्रधानजी जे म्हणतां आपटले ते काय विचारूंच नका. रागारागाने उठले नि लागले त्या भोयांना धोपटायलां. भोई पण कसले बेटे खमंक. ते लागलेच म्हणाले ‘रावण महाराजांनी जानकी आणली पळवून, तिनं हें भूत उत्पन्न केलं. त्या भूतांनीं केली थट्टा मग उगीच आम्हाला कां देता रट्टा?’ विप्रभक्षक०—पण कायहो, आतं याला उपाय काय? हीं तर सर्व अपशकुनांची माळका लागली आहे. नगरद्वारी लक्षानुलक्ष घागरी फुटणं. गोपुरं. कळस, राजवाडे काहीं कारण नसतां कोसळणं; मंदिर जागच्याजागी जमीनदोस्त होणं, हीं चिन्हं कांहीं ब-यातली नव्हंत. सर्वभक्षी०—आणि नापित