संगीत सीताशुद्धी

प्रबोधनकार ठाकरे यांची वाणी अन् लेखणी रसाळ होती म्हणजे काय, याचा प्रत्यय या संगीत सीताशुद्धी नाटकात येतो. अत्यंत खेळकर शैलीत प्रबोधनकारांनी लिहिलेले हे नाटक मनोरंजन करता करता सामाजिक संदेशाचे इंजेक्शनही देते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सीताराम-पुस्तक-माला. पुष्प १ ले

केशव सीताराम ठाकरे कृत – साग्र संगीत सीताशुद्धी नाटक.

[रंगावृत्ति अंक १ ते ५.]

"चिरंजीव त्या अंजनी बालका । नसे भीति कालत्रयी आयका ।।

प्रतिकार त्या जो मदाने करी । अरी तो पडे सत्वरी यमकरी ।।

यशाची ध्वजा शोभते ज्या करी । यशवंत येईल तो लवकरी ।।"

प्रकाशक धी इंडिया पब्लिशिंग कं. लि.

५ कावसजी पटेल रोड. फोर्ट-मुंबई. सन १९०९ इसवी.

प्रस्तावना

पौराणिक कालांतील कथाभाग नाटकरचनेस घेतला असता, त्यात नीतिदर्शक अशी अनेक स्थळे सापडतात आणि मनोरंजनाच्या बरोबरच नीतिचाहि बोध होण्याला तशी नाटके वाचकांना व प्रेक्षकांना दोघांनाहि पसंत पडतात म्हणून माझ्या अल्पमतीने प्रस्तुतचे सीताशुद्धी नाटक तयार करून ते मी आज माझ्या सर्व रसिक देशबंधूंच्या पुढे ठेवीत आहे. रामायणातील मूळ आख्यान नाटक-रचनेच्या दृष्टीने बरेच नियमित व आकुंचित करावे लागलें खरें, तथापि ठिकठिकाणी होता होईल तों संदर्भ मात्र सोडला या, कांहीं प्रवेश काल्पनिक परंतु त्या काळाला अनुसरून घातले आहेत, नाटक लिहिण्याचा हा माझा प्रथमचाच यत्न आहे, तो कितपत साधला आहें हें पाहण्याचें काम मी रसिकांवर आणि टीकाकारांवरच सोंपवितों त्यांत कांही गुणलेश आढळल्यास त्याचें श्रेय सर्वस्वी माझे गुरुवर्. श्रीयुत कृ. ना. आठल्ये एडीटर ‘केरळकोकिळ’ व श्रीयुत राजाराम नारायण गडकरी वकील-देवास यांना आहे. नाटक प्रयोगाच्या दृष्टीने सुधारून लिहीत असतां श्रीयुत रा. रा. गोपाळराव हरी काशीकर-वकील यांची मला फार मदत झाली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

शेवटीं सर्व सहायकारी मित्रमंडळाची व पुरस्कर्त्यांची मजवरची कृपादृष्टी शुक्लेंदुवत् वाढत्या प्रमाणांवर राहो अशी त्या जगन्नियंत्या प्रभूपाशी करुणा भाकून हा प्रस्तावना लेख पूर्ण करितों. स्व. हि. चिं. नाटक मंडळी देशबंधूचा नम्र सेवक छावणी-उमरावती केशव सिताराम ठाकरे. ता. १ सपटंबर १९०९. प्रकाशकांचे उद्गार प्रस्तुत सीताशुद्धि नाटक महाराष्ट्र वाचकवर्गापुढें ठेवतांना त्यांतील गुणास्वाद हंसक्षीर न्यायानें त्यांनीं स्वीकारावा अशी विनंती आहे. या नाटकाची रचना एकदोन नाटकमंडळ्यांच्या तालमी मुद्दाम घेऊन प्रयोग दृष्ट्या होतां होईल तों अव्यंग करून सुधारली आहे. त्यामुळें प्रयोगाची परवानगी मिळालेल्या व मिळविणा-या नाटक मंडळ्यांना रंगभूमीवर प्रयोग करतांना अडचण पडणार नाही अशी आशा आहे. या पुस्तकासंबंधीं (प्रयोगाच्या परवानगीखेरींज) सर्व प्रकारचे हक्क आमच्या स्वाधीन आहेत. प्रयोगाची परवानगी मागणें झाल्यास केशव सिताराम ठाकरे-पनवेल, जि. कुलाबा या पत्त्यावर नाटकमंडळ्यांनीं पत्रव्यवहार करावा. नजरचुकीनें राहिलेल्या मुद्रणदोषांबद्दल क्षमा मागून, ज्या जगदीश्वर प्रिंटिंग् प्रेसनें छापण्याचें काम त्वरित करून दिलें त्यांतील सर्व कार्यकारी मंडळींचे आम्ही अत्यंत आभारी आहोंत.

धी इंडिया पब्लिशिंग् कंपनी लिमिटेड ५ कासवजी रोड, फोर्ट-मुंबई.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

केशव सिताराम ठाकरे कृत साग्र संगीत सीता-शुद्धी.

अंक पहिला स्थळः लंकेंतील विरुपाक्षाचें मंदीर.

[बिभीषण परिचारकांसह प्रार्थना करीत आहे.]

पद. (श्री नटनायक०)

मंगलदायक विश्वपतीला सद्भावें स्तवितो ।। ईशचरणिंचा प्रसादरज तो कार्य सुलभ करितो ।।धृ।।

विरुपाक्षा विषधरा नटविशी वसुंधरा सारी ।। कमलापति तूं दैवत आम्हां संसारीं तारी ।।

बलवंतचि तूं कविवर तूंची कुजनताप वारी ।। मनुज-जन्म हा प्रसाद ज्याचा तोची पूर्ण करितो ।।१।।

पद. (वंदी त्या त्रिगुणाला०)

ध्यातों त्या जगपाला।। प्रभुला, आदिजननिच्या त्या रमणाला।।धृ।।

मत्स्यस्वरूपा धारण करुनी।। चतुर्वेद-संरक्षणिं धांउनि।।

कच्छ वराहचि नृसिंह होउनि।। सत्या सद्धर्माला उचली करिं धरि अवताराला।।१।।

बिभीषण- एकाग्र चित्तानं परमेश्वराचं भजन केल्यामुळं मनाची स्थिती पहा कशी झाली ती

- पद. (राधाधर मधु०)

चित्त शांतिला वरी। मनाचा ताप सहज हो दुरी।।धृ०।।

प्रभुभजनें मन पुनितचि होतां।। ईशस्तवनिं ये मुक्ती होता।।